पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्संच्या तुकडीने इस्लामाबाद न्यायालयाबाहेर त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. इम्रान खान यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकरणात खटले दाखल आहेत. यातीलच दोन खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालायात हजर झाले होते. याच वेळी त्यांच्यावर ‘अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी’ अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. इस्लामाबाद येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अल कादिर प्रकरण नेमके काय आहे? इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे? पीटीआय पक्षाने या अटकेनंतर काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊ या.

इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान कोर्टात असताना बायमेट्रिक प्रक्रियेला सामोरे जात होते. यावेळी पाकिस्तानच्या पॅरामिलिटरी रेंजर्सनी खिडकीचा काच फोडला. तसेच इम्रान खान यांच्या वकिलांना तसेच सुरक्षा रक्षकांना मारहाण करत इम्रान खान यांना अटक केली. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांच्या अटकेविषयी पोलीस महानिरीक्षक अकबर नासीर खान यांनी सविस्तर माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नींवर कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. ५० अब्ज रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार कायदेशीर करण्यासाठी ही रक्कम इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!

न्यायालयात हजर न झाल्यामुळे इम्रान खान यांच्यावर कारवाई

इम्रान खान यांच्या अटकेविषयी केंद्रीय मंत्री राणा सनाउल्लाह यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायालयाने वारंवार नोटीस बजावूनही इम्रान खान हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई नॅशनल अकाऊंटॅबिलीटी ब्युरोने केली आहे. या भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानच्या तिजोरीचे मोठे नुकसान झालेले आहे,” असे सनाउल्लाह खान म्हणाले.

अटकनेनंतर इम्रान खान यांच्या समर्थकांनी काय भूमिका घेतली?

पीटीआय पक्षाने इम्रान खान यांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त केला आहे. पीटीआय पक्षाचे नेते तथा इम्रान खान यांच्या जवळचे सहकारी फवाद चौधरी यांनी ट्वीटद्वारे खान यांच्या अटकेवर भाष्य केले आहे. “इम्रान खान यांच्यावर न्यायालयाच्या परिसरातच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक वकील तसेच सामान्य लोकांचा छळ करण्यात आला. इम्रान खान यांना अनोळखी लोक अज्ञात ठिकाणी घेऊन गेले आहेत. या कारवाईनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अंतर्गत सुरक्षा आणि पोलीस महानिरीक्षकांना १५ मिनिटांच्या आत हजर राहण्याचा आदेश दिला आहे,” अशी प्रतिक्रिया फवाद चौधरी यांनी दिली.

हेही वाचा >> दिल्लीच्या तिहार तुरुंगाला तामिळनाडूचे पोलीस सुरक्षा का पुरवितात? बाहेरच्या राज्याला असे कंत्राट देता येते?

पीटीआयच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन

पीटीआय पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये इम्रान खान यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या कारवाईदरम्यान इम्रान खान जखमी झाल्याचा दावा पीटीआय पक्षाने केला आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानमधील विविध शहरांत हे आंदोलन केले जात आहे. तसेच पीटीआय पक्षाचे सरचिटणीस असद उमर यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल माहिती दिली आहे. या कारवाईनंतर काय करावे हे ठरवण्यासाठी पक्षातील सहा सदस्यांची एक समिती गठीत केली जाईल. ही समिती पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल निर्णय घेईल, असे असद उमर यांनी सांगितले.

अल कादिर ट्रस्ट प्रकरण नेमके काय आहे?

इम्रान खान यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यादेखील आरोपी आहेत. अल कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणात त्यांची नॅशल अकाउंटॅबिलीटी ब्यूरोकडून (एनएबी) चौकशी केली जात आहे. इम्रान खान तसेच त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनी बाहरिया टाउन (इस्लामाबाद येथील रियल इस्टेट कंपनी) या कंपनीला आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांत संरक्षण देण्यासाठी ५ अब्ज रुपये आणि जमीन घेतली आहे, असा एनएबीने आरोप केलेला आहे.

हेही वाचा >> karnataka election 2023 : प्रचार संपला आता मतदान आणि निकालाकडे लक्ष; ‘हे’ मुद्दे ठरवणार कोण जिंकणार?

पाकिस्तानचे तब्बल १९० दशलक्ष पौंडचे नुकसान?

एनएबीने केलेल्या आरोपांनुसार अल कादिर या संस्थेच्या मार्फत इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ही रक्कम देण्यात आली. अल कादीर या संस्थेचे इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी हे दोनच विश्वस्त आहेत. तत्कालीन पीटीआय सरकार आणि बाहरिया टाऊन कंपनीमध्ये जो करार झाला, त्यामुळे पाकिस्तानच्या तिजोराली तब्बल १९० दशलक्ष पौंडचे नुकसान झालेले आहे.

बाहरिया टाऊन कंपनीने पाकिस्तानी नागरिकाला ५० अब्ज रुपये दिले

याच आरोपाप्रकरणी केंद्रीय मंत्री राणा सनाउल्लाह यांनी मागील वर्षाच्या जून महिन्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी इम्रान खान यांच्यावरील आरोपांवर सविस्तर भाष्य केले होते. इम्रान खान यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली होती. “बाहरिया टाऊन या कंपनीने ब्रिटनमध्ये पाकिस्तानी नागरिकाला साधारण ५० अब्ज रुपये दिले होते. हा व्यवहार करताना ब्रिटिश नॅशनल क्राईम एजन्सीने (एनसीए) या पाकिस्तानी नागरिकाला पकडले होते. या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल ब्रिटनने तत्कालीन पीटीआय सरकारला सांगितले होते,” असे त्यावेळी सनाउल्लाह यांनी सांगितले होते.

हेही वाचा >> विश्लेषण : दुसऱ्या महायुद्धातील भारत आणि ‘कोका कोला’चे स्थान

इम्रान खान यांनी प्रकरण मिटवून टाकले

“त्यानंतर इम्रान खान यांनी शहजाद अकबर या माणसाला पुढे करून हे आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण मिटवण्यास सांगितले होते. अकबरने हे प्रकरण मिटवून टाकले. यामध्ये राज्याची मालमत्ता असलेले ५० अब्ज रुपये बाहरिया टाऊन कंपनीची लाएबलीटी म्हणून दाखवण्यात आले,” असा दावाही सनाउल्लाह यांनी तेव्हा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान डॉन या आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान यांना या कथित गैरव्यहाराच्या प्रकरणात १ मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.