पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागातील दहशतवाद्यांचे रेल्वे अपहरणनाट्य संपुष्टात आले आहे. पाकिस्तानी लष्कराने तशी पुष्टी दिली आहे. ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली असून, ३३ दहशतवादी आणि २१ ओलीस मारले गेले आहेत. बलुचिस्तानमधील अस्थिरता आणि वाढते दहशतवादी हल्ले यांचा घेतलेला हा आढावा.
रेल्वे अपहरणात किती बळी?
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागातील दहशतवाद्यांचे रेल्वे अपहरणनाट्य संपुष्टात आले आहे. पाकिस्तानी लष्कराने तशी पुष्टी दिली आहे. ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली असून, ३३ दहशतवादी आणि २१ ओलीस मारले गेले. बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले वाढत असून, त्यामागे विविध कारणे आहेत. दहशतवाद्यांचे हे अपहरणनाट्य संपुष्टात आले असले, तरी बलुचिस्तानची समस्या संपलेली नाही. या अस्थिरतेचे आव्हान पाकिस्तान कसा पेलतो, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

जाफर एक्सप्रेस

पाकिस्तानमध्ये १६०० किलोमीटर अंतर कापत विविध महत्त्वाच्या शहरांना ‘जाफर एक्सप्रेस’ जोडते. क्वेटा येथून पेशावरपर्यंत ती जाते. या मार्गावर गेल्या २० वर्षांपासून ही रेल्वे धावत आहे. २०१७ मध्ये पेशावरपर्यंत ही रेल्वे नेण्यात आली. बलुच आदिवासी नेता मीर जाफर खान जमाली याचे नाव रेल्वेला देण्यात आले आहे. विविध महत्त्वाची शहरे या रेल्वे मार्गाने जोडली गेली आहेत. रेल्वे मार्गाला बलुचिस्तानमधील अस्थिरतेचा फटका वारंवार बसला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान या मार्गावर अनेक हल्ले दहशतवाद्यांनी केले. रेल्वे पूल आणि मूलभूत पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. नोव्हेंबर महिन्यात क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ६२ जणांचा मृत्यू झाला होता.

असे झाले अपहरण

‘जाफर एक्सप्रेस’मध्ये ५००हून अधिक प्रवासी होते. एका बोगद्यात रेल्वेचे अपहरण करण्यात आले. दहशतवाद्यांनी एका बोगद्यात रेल्वे मार्ग उडवून रेल्वेला थांबविले. या भागात रेल्वे मार्गावर १७ बोगदे आहेत. त्यातील आठव्या बोगद्यामध्ये हे अपहरणनाट्य घडले. ‘जाफर एक्सप्रेस’ला ९ डबे होते. क्वेटापासून पेशावरकडे रेल्वे निघाली होती. कच्छी जिल्ह्यात पेहरो कुनरी आणि गदालारदरम्यान रेल्वेला लक्ष्य करण्यात आले. अपहरणानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील बलुच कैदी, कार्यकर्ते, बेपत्ता व्यक्तींना सोडून देण्याची मागणी केली होती. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ५० सुरक्षा रक्षकांना मारल्याचा आणि २१४ प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा या संघटनेने केला होता. ओलीस ठेवलेल्यांमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

‘बीएलए’ संघटना

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात ‘बीएलए’ ही पाकिस्तानमधील सरकार निर्धारित दहशतवादी संघटना असून, तिच्यावर पाकिस्तानमध्ये बंदी आहे. स्वतंत्र बलुचिस्तान हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला ही संघटना अस्तित्वात आली. २००६ मध्ये या संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषणा केली. ‘बीएलए’चे ‘माजीद ब्रिगेड’ हे आत्मघाती पथक ‘जाफर एक्सप्रेस’वरील हल्ल्यामागे होते. गेल्या दशकभरात बलुचिस्तानमध्ये हजारो नागरिक, दहशतवादी, सुरक्षा रक्षक मारले गेले आहेत. बलुच अस्थिरतेला भारताची फूस आहे, असा दावा पाकिस्तानकडून केला आहे. भारताने त्याचे खंडन केले आहे.

हल्ल्यांची वाढती तीव्रता

बलुचिस्तानमधील पाकिस्तान सरकारी यंत्रणेविरोधात या संघटनेने सातत्याने हल्ले केले आहेत. आतापर्यंत बॉम्बहल्ले, हत्या अशा मार्गाने होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता आता वाढली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’मधील माहितीनुसार, बलुच दहशतवादी घटनांमध्ये ११९ टक्क्यांनी वाढ झाली असून, २०२४ मध्ये विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांची साथ या संघटनेला मिळत असल्याचे दिसून आले आहे.

बलुचिस्तानची समस्या

पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या चार प्रांतांपैकी बलुचिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा, पण लोकसंख्या अतिशय कमी असलेला प्रांत आहे. तेल, गॅस, सोने, तांबे आणि इतर खनिजांचे साठे या भागात आहेत. त्यामुळे सामरिक दृष्ट्या या भागाचे महत्त्व मोठे आहे. पाकिस्तान या भागातील नैसर्गिक संसाधने वापरतो, पण या ठिकाणी इतर प्रांतांच्या तुलनेत म्हणावा तसा विकास करीत नाही, अशी येथील नागरिकांची खदखद आहे.

१९४७ पासूनची खदखद

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर बलुचिस्ताननेही स्वतंत्र देश असल्याची घोषणा केली होती. खरन, मकरन, लास बेला आणि कलात ही चार संस्थाने या भागात होती. फाळणीदरम्यान, कलात भागातील खान मिर अहमद यार खान याने स्वतंत्र राहण्याचा पर्याय स्वीकारला. पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी सुरुवातीला त्याची ही मागणी मान्य केली होती. पण, ब्रिटिशांच्या दबावामुळे कलात भाग पाकिस्तानमध्ये विलीन करण्यात आल्याचे मानले जाते. मार्च १९४८ मध्ये खरन, मकरन, लास बेला हा भाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट केला गेला. अखेर उर्वरित भागाचाही समावेश पाकिस्तानमध्ये करण्यात आला. बलुचिस्तानची खदखद तेव्हापासूनची आहे.

चीनला विरोध

चीनचा चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (सीपेक) या भागातून जातो. त्यालाही स्थानिक बलुचींचा विरोध आहे. रेल्वेचे अपहरण झाल्याचा चीनने निषेध केला असून, पाकिस्तानला चीन आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे. चीनच्या पाकिस्तानमधील वाढत्या अस्तित्वाला विविध ठिकाणी विरोध झाला आहे. बलुचिस्तानमधील अस्थिरता हा चीनसमोरही डोकेदुखीचा विषय आहे. इराणबरोबरील विरळ सीमा आणि अफगाणिस्तानमधील तालिबान्यांची असणारी फूस हीदेखील मोठी समस्या आहे.

दहशतवादाच्या समस्येचे पुढे काय?

पाकिस्तानने दहशतवादाला कायमच फूस दिली आहे. दहशतवाद्यांच्या बाबतीत ‘गूड तालिबान’, ‘बॅड तालिबान’ असा दुटप्पीपणा करणारा हा पाकिस्तानच. या पाकिस्तानला तशाच प्रकारचा दुटप्पीपणा करणाऱ्या चीनची साथ आहे. याच चीनने मसूद अझरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यास संयुक्त राष्ट्रांत सातत्याने विरोध केला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना पाकिस्तानची फूस असली, तरी अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंध सौहार्दाचे नाहीत. वाढते दहशतवादी हल्ले, ही त्याचीच निशाणी! दहशतवाद्यांमध्ये भेदभाव करून सोयीने दहशतवादाकडे पाकिस्तान जोपर्यंत पाहत राहील, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे संकट गडद होत जाईल. दहशतवादाकडे दुटप्पी नजरेतून पाहणे पाकिस्तानने बंद केले, तरच पाकिस्तानसाठी कुठे तरी आशेचा किरण आहे!

prasad.kulkarni@expressindia.com

Story img Loader