आजकाल प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीला चष्मा असतोच असतो. चष्मा फार लवकर जात नाही. अनेकांना चष्मा वापरणे आवडत नाही. परंतु, चष्म्याशिवाय दूरचं किंवा जवळचं दिसणं शक्यही होत नाही. आता ही समस्या दूर करणारे औषध मिळाल्याचा दावा एका औषधनिर्मिती करणार्‍या कंपनीने केला आहे. मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने या औषधला मान्यताही दिली. ‘प्रेस्वू आयड्रॉप’ (PresVu Eye Drop), असे या औषधाचे नाव आहे. “हा आयड्रॉप प्रेस्बायोपियाने बाधित व्यक्तींसाठी चष्म्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विशेषतः विकसित केला गेला आहे,” असे ‘डीसीजीआय’चे सांगणे आहे. मात्र, मान्यता मिळाल्याच्या दोन दिवसांतच याऔषधावर कारवाई करण्यात आली आहे. काय आहेत प्रेस्वू आयड्रॉप? याचा खरंच फायदा होणार का? प्रेस्बायोपिया म्हणजे काय? आणि यावर कारवाई करण्याचे कारण काय? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेस्बायोपिया म्हणजे काय?

प्रेस्बायोपिया ही वाढत्या वयाशी संबंधित स्थिती आहे. या परिस्थितीत एका विशिष्ट वयानंतर जवळची दृष्टी कमकुवत होते. त्यामुळे जवळचे वाचायला किंवा दिसायला अडचण होते. साधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर लोकांमध्ये हे बदल जाणवू लागतात. त्यामुळे अनेकांना पॉझिटिव्ह नंबरचा म्हणजेच जवळचा चष्मा वापरावा लागतो. अशाच व्यक्तींसाठी हा नवा आयड्रॉप तयार करण्यात आला आहे. पायलोकार्पस इंडिकस या वनस्पतीपासून हे औषध तयार करण्यात आले आहे.

पायलोकार्पस इंडिकस या वनस्पतीपासून हे औषध तयार करण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : PresVu Eye Drop : चष्म्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित; कारण काय

‘प्रेस्वू आयड्रॉप’ कसे कार्य करते?

प्रेस्वू आयड्रॉपमध्ये पायलोकार्पिन नावाच्या औषधाचा वापर करण्यात आला आहे. औषधनिर्मिती करणाऱ्या ‘एन्टॉड फार्मास्युटिकल्स’ या कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे ड्रॉप डोळ्यांत घातल्यानंतर औषधातील घटक बुबुळाच्या स्नायूंना आकुंचित करतात; त्यामुळे डोळ्यांतली बाहुली लहान होते आणि जवळचे वाचतानाही अधिक स्पष्ट दिसू लागते. कंपनीने असेही म्हटले आहे की, ‘प्रेस्वू ड्रॉप’चा पीएच अश्रूंच्या पीएच पातळीइतका आहे. एखादा पदार्थ किती अम्लीय किंवा मूलभूत आहे हे मोजण्यासाठी पीएच स्केल वापरले जाते. ड्रॉप्स डोळ्यांत घातल्यानंतर या औषधाचा परिणाम कायम राहतो. मात्र, दूरच्या दिसण्यावर या ड्रॉपचा परिणाम होत नाही.

प्रेस्वू हे केवळ प्रिस्क्रिप्शनसाठीचे औषध आहे आणि डॉक्टरांच्या मते, त्याचा प्रभाव चार ते सहा तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही. ज्यांना बुबुळावर जळजळ होते, त्यांनी याचा वापर करू नये. ‘प्रेस्वू’चा नियमित वापर केल्याने डोळ्यांमध्ये खाज सुटणे, लालसरपणा, भुवया दुखणे व स्नायूंचा त्रास होऊ शकतो.

हेही वाचा : उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?

ही एक नवीन उपचारपद्धती आहे का?

‘एन्टॉड’ कंपनीच्या दाव्यांवरून असे दिसते की, प्रेस्वू ही नवीन उपचारपद्धती आहे. पायलोकार्पिन हे डोळ्यांच्या ड्रॉप्समध्ये वापरण्यात येणारे एक मुख्य कंपाऊंड आहे. अनेक दशकांपासून भारतात हे औषध उपलब्ध आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ‘सेंटर फॉर साईट’चे अध्यक्ष डॉक्टर महिपाल सचदेवा म्हणाले, “मोतीबिंदूच्या उपचारासाठी पायलोकार्पिनचा वापर केला जातो; मात्र या औषधात तात्पुरती सुधारणा करण्याचा गुणधर्म आहे. इतर देशांमध्येदेखील प्रेस्बायोपियासाठी औषध तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.” युनायटेड स्टेट्स अन्न आणि औषध प्रशासनाने २०२१ मध्ये प्रेस्बायोपियासाठी पायलोकार्पिन आय ड्रॉपला मंजुरी दिली होती. भारतात चार टक्के आणि दोन टक्के प्रमाणावर सरकार पायलोकार्पिनच्या कमाल मर्यादा किमतीबाबत निर्णय घेते. ‘प्रेस्वू’मध्ये १.२५ टक्के पायलोकार्पिन आहे.

विक्रीचा परवाना निलंबित करण्याचे कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून या ड्रॉपची बरीच चर्चा सुरू आहे. या आय ड्रॉपच्या वृत्तांनी लोकांचे लक्ष वेधले होते. मात्र, आता हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच त्यावर कारवाई केल्याचे चित्र आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटिशीपर्यंत निलंबित केला आहे. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर चुकीचा प्रचार केल्यामुळे आयड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presvu eye drops claim to reduce dependency on reading glasses rac
Show comments