अन्वय सावंत
गेल्या काही काळापासून मांडीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या केएल राहुलचे आगामी आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, या दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर असणाऱ्या राहुलला पुन्हा नव्या दुखापतीने घेरले आहे. त्यानंतरही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असून तेथील परिस्थिती आणि खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असणे अपेक्षित आहे. असे असतानाही निवड समितीने केवळ तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिले असून अनुभवी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलला संघाबाहेर ठेवले आहे. या निर्णयांचा भारताला फटका बसू शकेल का आणि अन्य कोणत्या खेळाडूंना संधी देण्याचा अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निर्णय घेतला आहे, याचा आढावा.
पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही राहुलला संघात स्थान का?
‘‘राहुलला जी मूळ दुखापत झाली होती, त्यातून तो सावरला आहे. त्याला वेगळी दुखापत झाली आहे. त्यामुळेच संजू सॅमसन संघासोबत श्रीलंकेला जाणार आहे. आशिया चषकाच्या सुरुवातीला किंवा किमान दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यापूर्वी राहुल तंदुरुस्त होणे आम्हाला अपेक्षित आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करताना सांगितले. ‘आयपीएल’च्या गेल्या पर्वात क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यानंतर राहुलने तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) कसून सराव केला. त्याने टप्प्याटप्प्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षणही सुरू केले. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त होतो तोच त्याला आणखी एक दुखापत झाली आहे. परंतु, ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे आगरकर म्हणाले. राहुल आमचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे असेही आगरकर यांनी सांगितले. परंतु, एकदिवसीय विश्वचषकाला आता फारसा कालावधी शिल्लक नसल्याने पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या राहुलला आशिया चषकात खेळवणे धोक्याचे ठरू शकेल.
अन्य कोणत्या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे?
पाठीच्या दुखापतीतून सावरलेले श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा यांचेही एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. बुमरा आणि प्रसिध या वेगवान गोलंदाजांनी बऱ्याच काळानंतर सामने खेळण्यास सुरुवात केली आहे. ते सध्या सुरू असलेल्या आयर्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळत आहेत. या दोघांनाही सूर गवसला असून ते चांगल्या वेगाने गोलंदाजी करत आहेत आणि ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. परंतु, आशिया चषकात प्रसिधला अंतिम ११ खेळाडूंत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. बुमरा मात्र अधिकाधिक सामने खेळणे अपेक्षित आहे. पाठीच्या दुखापतीमुळे मुंबईकर श्रेयसवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘एनसीए’मध्ये घेतलेल्या मेहनतीनंतर श्रेयसला तंदुरुस्ती मिळवण्यात यश आले आहे. श्रेयसच्या पुनरागमनामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. मात्र, तो तंदुरुस्ती राखतो का पाहणे महत्त्वाचे ठरेल.
चहलला संघातून का डावलण्यात आले?
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लेग-स्पिनर निर्णायक भूमिका बजावत असल्याचे गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी ॲडम झॅम्पा, इंग्लंडसाठी आदिल रशीद, श्रीलंकेसाठी वानिंदू हसरंगा आणि पाकिस्तानसाठी शादाब खान यांसारख्या लेग-स्पिनरनी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय उपखंडात, विशेषत: श्रीलंकेत फिरकीपटूंना नेहमीच साहाय्य मिळते. श्रीलंकेचा संघ मायदेशात अनेकदा तीन प्रमुख फिरकीपटूंना घेऊन मैदानावर उतरतो. त्यातच लेग-स्पिनरमध्ये मधल्या षटकांत बळी मिळवण्याची सर्वाधिक क्षमता असल्याचे मानले जाते. मात्र, भारताने अनुभवी लेग-स्पिनर चहलला वगळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. चहलला गेल्या दोन वर्षांत सातत्याने संधी मिळालेली नाही, असे असतानाही त्याने १६ सामन्यांत २४ गडी बाद केले आहेत. श्रीलंकेत सहा सामन्यांत १० बळी त्याच्या नावे आहेत. परंतु, दोन मनगटी फिरकीपटूंना संघात स्थान देणे अवघड असल्याने चहलला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचे आगरकर यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, भारताला या निर्णयाचा फटका बसू शकेल. आशिया चषकासाठी ‘चायनामन’ कुलदीप यादवसह रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या ऑफ-स्पिनरना संघात स्थान मिळालेले नाही.
तिलकला एकदिवसीय संघात संधी का?
प्रतिभावान डावखुरा फलंदाज तिलक वर्माला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातील ट्वेन्टी-२० मालिकेतून तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पदार्पण केले. तिलकने खेळण्याच्या शैलीने आणि कितीही दडपण असले तरी संयम राखून खेळण्याच्या मानसिकतेने सर्वांना प्रभावित केले आहे. तसेच इशान किशनचा अपवाद वगळता आघाडीच्या फळीत खेळणारा डावखुरा फलंदाज भारताकडे नाही. त्यामुळेच तिलकची एकदिवसीय संघात वर्णी लागली आहे. तिलकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये २५ एकदिवसीय सामन्यांत ५६च्या सरासरीने आणि १०१.६४च्या ‘स्ट्राइक रेट’ने १२३६ धावा केल्या आहेत. यात प्रत्येकी पाच शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळेच त्याला संधी देण्यात आली आहे.
सूर्यकुमारचे संघातील स्थान कायम कसे राहिले?
ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विश्वातील सर्वोत्तम फलंदाज असा लौकिक मिळवलेल्या सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र धावांसाठी झगडावे लागते आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्येही सातत्याने संधी दिली आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अपयश आल्यानंतर सूर्यकुमारला सहाव्या क्रमांकावर खेळवण्यात आले. जेणेकरून अखेरच्या षटकांत त्याची फटकेबाजीची क्षमता फायदेशीर ठरेल. मात्र, सूर्यकुमारला या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्याने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांत केवळ २४च्या सरासरीने ५११ धावा केल्या आहेत. त्याला केवळ दोन अर्धशतके करता आली आहे. मात्र, या निराशाजनक कामगिरीनंतरही त्याला आशिया चषकासाठी संघात स्थान मिळाले आहे. फटकेबाजी करून सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असल्याने त्याला इतकी संधी दिली जात आहे.
आशिया चषकासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा; राखीव : संजू सॅमसन.
- –