scorecardresearch

विश्लेषण: ‘रोमियो अँड ज्युलिएट’च्या प्रदर्शनानंतर ५४ वर्षांनी कलाकारांचे गंभीर आरोप; फसवून न्यूड सीनचं चित्रीकरण केल्याचा दावा!

दिग्दर्शकाने हा सीन चित्रित करताना नग्नता पडद्यावर दिसणार नाही असं आश्वासनदेखील दिलं होतं

विश्लेषण: ‘रोमियो अँड ज्युलिएट’च्या प्रदर्शनानंतर ५४ वर्षांनी कलाकारांचे गंभीर आरोप; फसवून न्यूड सीनचं चित्रीकरण केल्याचा दावा!
फोटो : सोशल मीडिया

तब्बल ५ दशकांनी ‘रोमियो अँड ज्युलिएट’ या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी या चित्रपटाच्या निर्माते आणि स्टुडिओ पॅरामाउंट पिक्चर्सवर जबरदस्ती न्यूड सीन चित्रित केल्याचे आरोप लावले आहेत. या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्री ऑलिव्हिया हसी आणि अभिनेता लिओनार्ड व्हाईटिंग यांनी ते किशोरवयात असताना त्यांच्याकडून हा सीन चित्रित केला असल्याचा आरोप केला आहे.

१९६८ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल ५ दशकांनी या दोन्ही कलाकारांनी लावलेल्या आरोपामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. शिवाय या आरोपाबरोबरच त्यांनी अब्रूनुकसानी खातर ५०० मिलियन डॉलर्सची मागणीदेखील केली आहे. सध्या हे दोघे कलाकार सत्तरीच्या घरात आहेत.

नेमकं प्रकरण काय?

लॉस एंजेलीसमध्ये त्यांनी ही केस दाखल केली असून लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक असे गंभीर आरोप या दोघांनी लावले आहेत. ऑस्कर मिळवणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मात्यावर या कलाकारांनी तब्बल ५० वर्षांनी आरोप लावण्यामागचं कारण जाणून घेऊयात. खोटं बोलून आणि फसवणूक करून त्यांना हा न्यूड सीन करायला भाग पाडल्याचं या दोघांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा : “मला मंत्री व्हायचं आहे कारण…” अशनीर ग्रोव्हरचा राजकारणात येण्याबद्दल मोठा खुलासा

चित्रपटात रोमियो अँड ज्युलिएट यांच्या लग्नानंतरचा बेड सीन दाखवण्यात आला आहे. याचं चित्रीकरण करताना सर्वप्रथम दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली यांनी या दोन्ही कलाकारांना विश्वासात घेतलं. तेव्हा ते त्यांना म्हणाले की हा सीन करताना तुमच्या अंगावर तुमच्याच त्वचेच्या रंगाचे काही कपडे असतील, पण चित्रीकरण करतानाच्या दिवशी मात्र त्यांनी हा निर्णय बदलला आणि अंगावर कोणतेही कपडे न परिधान करता केवळ बॉडी मेकअप करून हा सीन चित्रित करण्यात आला.

दिग्दर्शकाने हा सीन चित्रित करताना कोणतीही नग्नता पडद्यावर दिसणार नाही असं आश्वासनदेखील कलाकारांना दिलं होतं, पण तरीही पडद्यावर दोघांनाही काही प्रमाणात नग्न दाखवण्यात आलं. हे सगळं या कलाकारांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे. त्यावेळी या दोन्ही कलाकारांचे वय १५ आणि १६ होते आणि म्हणूनच या किशोरवयात त्यांच्याकडून फसवणूक करून असे सीन चित्रित केल्याने त्यांनी हे आरोप लावले आहेत.

दिग्दर्शक फ्रँको झेफिरेली यांनी या दोघांना याविषयी आधीच पूर्वकल्पना दिली असल्याची गोष्टही समोर आली आहे. दिग्दर्शकाच्या सांगण्यानंतर समोर कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी हा सीन केला असं या दोन्ही कलाकारांचं म्हणणं आहे. शिवाय या गोष्टीचा त्यांच्या मनावर प्रचंड परिणाम झाला असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

५० वर्षांनी तक्रार का?

कॅलिफोर्नियामध्ये २०२० रोजी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. एखाद्या व्यक्तीचे बालपणात लैंगिक शोषण झाले असेल त्यांच्यासाठी तिथल्या सरकारने तक्रार नोंदवण्यासाठी ३ वर्षांची मुदत दिली होती. ती मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती, त्यानंतर ४० वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येणार नव्हती, म्हणून ऑलिव्हिया हसी आणि लिओनार्ड व्हाईटिंग या दोघांनी ही तक्रार दाखल केल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : शाहिद कपूर ओटीटी पदार्पणासाठी सज्ज; आगामी वेबसीरिजचा टीझर शेअर करत म्हणाला “नवं वर्षं…”

यांची केस लढणारे वकील सॉलोमन ग्रीसेन यांच्यामते जरी या चित्रपटाला बनवून बराच काळ लोटला असला तरी सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही लहान मुलाचे नग्न फोटो किंवा तत्सम व्हिडिओज कोणतीही निर्मिती संस्था वापरू शकत नाही, त्यामुळे पॅरामाउंट पिक्चर्स स्टुडिओला या चित्रपटातील या दोघांचे न्यूड सीन्स हटवावे लागतील. केवळ लिओनार्ड आणि ऑलिव्हियाच नव्हे तर या ३ वर्षांच्या कालावधीत बालपणात झालेल्या लैंगिक शोषणाच्या तब्बल २८००० केसेस दाखल करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 15:58 IST

संबंधित बातम्या