– गौरव मुठे

पतंजली समूहाचा भाग बनलेल्या आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या रुची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून बाबा रामदेव यांनी पहिल्यांदाच भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांना अजमावले. मात्र भांडवली बाजारातील पदार्पणातच भांडवली बाजार नियामक सेबीने रुची सोयाच्या एफपीओमध्ये बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पुन्हा बोली मागे घेण्यासाठी मुदत देण्यास सांगितले. सेबीने का असे करण्यास सांगितले याबद्दल जाणून घेऊया…

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

रुची सोयाने भांडवली बाजारातून किती निधी उभारला?

पतंजली समूहाचा भाग बनलेल्या रुची सोया इंडस्ट्रीजने गेल्या महिन्यात २४ मार्च ते २८ मार्च दरम्यान समभाग विक्रीतून ४,३०० कोटी रुपयांच्या उभारणीसाठी फॉलो अप पब्लिक (एफपीओ) ऑफर आणली होती. यासाठी रुची सोयाकडून गुंतवणूकदारांना रुची सोयाच्या २ रुपये दर्शनी मूल्याच्या समभागासाठी प्रत्येकी ६१५ ते ६५० रुपये या किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता.

भांडवली बाजारात रुची सोयाच्या समभागाच्या २२ मार्चच्या ९१०.१५ रुपयांच्या बंद भावाच्या तुलनेत २९ टक्के ते ३२ टक्के सवलतीत गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप करण्यात आले. इतक्या मोठ्या सवलतीत एफपीओ बाजारात आणल्यामुळे विद्यमान गुंतवणूकदारांमध्ये काहीशी नाराजी होती. कारण यामुळे बाजारातील सध्याच्या समभागाच्या किमतीत पुन्हा घसरण होण्याची भीती होती. त्याप्रमाणे १५ मार्च रोजी १०९० रुपयांवर असलेला समभाग २८ मार्चपर्यंत ८२० रुपयांपर्यंत खाली आला.

पतंजलीकडून रुची सोयाचे अधिग्रहण कसे झाले?

बँकांचे १२,१४६ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने नादारी आणि दिवाळखोरी संहिता (आयबीसी) प्रक्रियेला सामोरे गेलेल्या रुची सोया इंडस्ट्रीजवर ताबा मिळविण्यासाठी अदानी समूह आणि पतंजली समूहामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र ऐनवेळी अदानी समूह स्पर्धेतून बाहेर पडल्याने रुची सोया ४,३५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात पतंजली आयुर्वेदच्या पारड्यात पडली. या दिवाळखोर कंपनीचा जवळपास ९९ टक्के भागभांडवली हिस्सा यातून पतंजलीकडे आला. उल्लेखनीय बाब म्हणजे यात पतंजली आयुर्वेदची स्वत:ची गुंतवणूक ही केवळ १,००० कोटी रुपयांची असून, या ताबा व्यवहारासाठी उर्वरित ३,३५० कोटी रुपये तिने बँकांकडून कर्जरूपात उभे केले आहेत. 

पतंजलीने रुची सोयाचे अधिग्रहण केल्याने समभागावर काय परिणाम झाला? 

पतंजली समूहाकडून रुची सोया इंडस्ट्रिज ही कंपनी २०१९ मध्ये ताब्यात घेतल्यावर १६ रुपयांवर उतरलेल्या समभाग मूल्याने १,१०० रुपयांपर्यंतही मजल मारली होती. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत समभागात ८,७५० टक्क्यांची वाढ झाली.

पतंजलीने एफपीओ का आणला?

‘सेबी’च्या किमान सार्वजनिक समभाग मालकीच्या दंडकाचे पालन करण्याच्या उद्देशाने ही भागविक्री (एफपीओ) योजण्यात आली आहे होती. सेबीने पतंजलीला रुची सोयामधील हिस्सेदारी कमी करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी देऊ केला होता. ती तीन वर्षांची मुदत चालू आर्थिक वर्षात संपुष्टात येत असल्याने पतंजलीने मार्च महिनाअखेर एफपीओ बाजारात आणला. मात्र एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध, खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वाढलेला महागाई दर यामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये घसरण होत आहे. देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील प्रतिकूल परिस्थितीमुळे

केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाची गेल्या वर्षात अपेक्षित असलेली भागविक्री पुढे ढकलली. मात्र बाजारातील परिस्थिती प्रतिकूल असूनदेखील पतंजलीने समभागात मोठी सवलत जाहीर करत बाजारात भागविक्री केली. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीतून बँकांच्या ३,३५० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली जाणार असून, उर्वरित निधी रुची सोयाच्या आगामी विस्तारात उपयोगात आणला जाणार आहे.

रुची सोयाच्या एफपीओमधून गुंतवणूक मागे घेण्यास सेबीने मुभा का दिली?

रुची सोयाच्या एफपीओमध्ये सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना लावलेली बोली मागे घेण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने गुंतवणूकदारांना तीन दिवसांची मुदत देण्याचे आदेश रुची सोयाला दिले. कारण एफपीओ भाग विक्रीसाठी खुला झाला असताना लाखो गुंतवणूकदारांना एफपीओमधून मोठा फायदा मिळेल असा निनावी संदेश (मेसेज) पाठवण्यात आला. हा अनुचित प्रकार पाहता, त्यांच्या बोलीचा पुनर्विचार करण्यासाठी सेबीने दोन दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यास सांगितले. सेबीकडून गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन पहिल्यांदा असा निर्णय घेण्यात आला.

सेबी’ने अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढवून, सुकाणू  (अँकर) गुंतवणूकदारांव्यतिरिक्त इतर सर्व गुंतवणूकदार वर्गाकडून ‘एफपीओ’साठी केलेला अर्ज मागे घेण्याला परवानगी दिली. तसेच असे माघारीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे संबंधित शेअर बाजारांनाही सेबीने आदेश दिले होते. कंपनीनेदेखील वृत्तपत्रात अनाहूत संदेशाबाबत खुलासा करण्याचे आणि एफपीओमध्ये केलेली गुंतवणूक मागे घेण्यासाठी मुदत दिल्याची जाहिरात करण्याचे आदेश देण्यात आले होते.

रुची सोयाच्या एफपीओबाबत काय अनाहूत संदेश (एसएमएस) गुंतवणूकदारांना पाठवण्यात आला होता? 

अनाहूत ‘एसएमएस’मध्ये पतंजली परिवारासाठी रुची सोयाची चालू समभाग विक्री ही एक चांगली गुंतवणूक संधी आहे, असा दावा करण्यात आला होता. यात बोली लावण्यासाठी निश्चित करण्यात आलेला प्रति समभाग ६१५ ते ६५० रुपये किंमत म्हणजे समभागाच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा ३० टक्के सवलतीत हा समभाग मिळविता येणार असल्याने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळेल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. रुची सोयानेदेखील कंपनीच्या एफपीओबद्दल पाठवण्यात आलेल्या एसएमएसबद्दल स्वतःला दूर ठेवत अनाहूत संदेशांच्या प्रसाराविरुद्ध तपास करण्यासाठी हरिद्वार पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तसेच संदेशाच्या प्रसारात कंपनीचा संबंधित कोणाचाही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. 

मात्र रुची सोयाच्या बाबतीत घडलेला हा पहिलाच प्रसंग नाहीये. याआधी देखील बाबा रामदेवांनी रुची सोयाचे अधिग्रहण  केल्यानंतर २०२१ मध्ये योग शिबिरामध्ये लोकांना कोट्यधीश व्हायचे असल्यास रुची सोयाचा समभागात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिल्याचे समोर आले होते. याबाबत सेबीने नाराजी व्यक्त करत बाबा रामदेव यांना समज दिली होती. 

सेबीच्या गुंतवणूकदारांना बोली मागे घेण्यास दिलेल्या मुदतीमुळे  एफपीओवर काय परिणाम झाला?

रुची सोयाच्या ४,३०० कोटी रुपये उभारण्यासाठी प्रस्तावित २४ मार्चपासून सुरू झालेल्या आणि २८ मार्चपर्यंत खुल्या असलेल्या ‘एफपीओ’ला गुंतवणूदारांकडून ३.६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने एफपीओच्या माध्यमातून ४.८९ कोटी समभाग विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबदल्यात कंपनीकडे १७.६० कोटी समभागांची अर्ज प्राप्त झाले. सुकाणू गुंतवणूकदारांकडून कंपनीने सुमारे १,२९० कोटी रुपये उभे केले होते. मात्र सेबीने सुकाणू गुंतवणूकदार वगळता किरकोळ गुंतवणूकदारांना सेबीने परवानगी दिल्याने तीन दिवसांत गुंतवणूकदारांकडून ९७ लाख बोली मागे घेण्यात आल्या. गुंतवणूकदारांकडून सुरुवातीला एफपीओ’ला जो ३.६ पट अधिक प्रतिसाद मिळाला होता तो कमी होत ३.३९ पट राहिला. बोली मागे घेणाऱ्यांमध्ये मुख्यतः विदेशी  गुंतवणूकदारांचा सर्वाधिक सहभाग होता.

सेबीच्या निर्णयाने ‘कही खुशी, कही गम’?

सेबीने गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन पहिल्यांदा अशा प्रकारे बोली मागे घेण्यासाठी गुंतवणूकदारांना संधी देण्यात आली. खोट्या आणि फसव्या संदेशाला किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतींना सामान्य गुंतवणूकदार बळी पडू नये यासाठी सेबीकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र दुसरीकडे भांडवली बाजाराशी संबंधित काही बँकर्स आणि संस्थांनी सेबीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. कारण सेबीकडून पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आणि सेबीच्या आदेशामुळे लाखो गुंतवणूकदारांनी लावलेली बोली मागे घेतल्यास एखाद्या कंपनीचा आयपीओ किंवा एफपीओ पूर्णपणे अयशस्वी होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली.