How DNA evidence helped capture a killer : गुन्हेगार कितीही चतुर असला तरी तो काहीतरी पुरावा घटनास्थळी सोडून जातोच. पुढे हाच पुरावा पोलिसांना किंवा तपास अधिकाऱ्यांना गुन्हेगारापर्यंत पोहोचायला मदत करतो. याचाच प्रत्यय एका घटनेतून आला आहे. ५८ वर्षांपूर्वी एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या एका ९२ वर्षीय आरोपीला न्यायालयाने सोमवारी (तारीख ३० जून) दोषी ठरवलं. विशेष बाब म्हणजे, सखोल तपास करूनही पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी सापडत नव्हता, त्यामुळे या प्रकरणाचा तपास काही वर्षांपूर्वीच थांबविण्यात आला होता. मात्र, २०१२ मध्ये मिळालेल्या एका पुराव्यामुळे आरोपीचा शोध लागला आणि पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं, हे नेमकं कसं घडलं, ते जाणून घेऊ…
रायलंड हेडली असं न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपीचं नाव असून तो ब्रिटनमधील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६७ मध्ये आरोपी एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात शिरला आणि तिला अमानुषपणे मारहाण केली. इतक्यावरच न थांबता आरोपीने महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा आरोपीचे वय ३० वर्ष होतं, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आरोपीचा शोध घेणं, पोलिसांसमोर आव्हान
दरम्यान, महिलेची बलात्कार करून हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा सखोल तपास सुरू केला. मात्र, आरोपीने घटनास्थळी कोणतेही पुरावे सोडले नसल्याने हा गुन्हा नेमका कुणी केला? याचा छडा लावण्यात पोलिसांना त्यावेळी अपयश आलं. परिणामी हे प्रकरण ‘कोल्ड केस’ (तपास थांबवला, पण तो अधिकृतपणे बंद केला नाही) म्हणून थांबविण्यात आलं.
२०१२ मध्ये आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटक
२०१२ साली पोलिसांनी आरोपी हेडलीला एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आणि तपासासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात आली. यानंतर २०२३ मध्ये जुन्या गुन्ह्यांची फेरतपासणी करणाऱ्या विशेष तपास पथकाने १९६७ च्या या प्रकरणातील पीडित महिलेच्या स्कर्टवर मिळालेल्या वीर्याचे नमुने तपासले. हे नमुने हेडलीच्या डीएनएशी जुळल्याचे निष्पन्न झाले. या महत्त्वपूर्ण शोधामुळे पोलिसांना बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपीचा छडा लावण्यात यश मिळालं आणि त्यांनी आरोपी हेडलीला ब्रिस्टल येथील न्यायालयासमोर हजर केलं. ही घटना ब्रिटनमधील सर्वात जुन्या उलगडलेल्या प्रकरणाची मानली जात आहे, ज्यामध्ये डीएनए तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना आरोपीची ओळख पटविण्यात यश मिळालं आहे.
आणखी वाचा : India Vs Pakistan: भारतीय कालीचे तांडव आणि १४० पाकिस्तानी सैनिक ठार; या ऐकीव गोष्टीत किती सत्य?
५८ वर्षांनंतर उलगडलं खूनाचं रहस्य
१९६७ मध्ये ब्रिटनच्या ब्रिस्टल परिसरात राहणाऱ्या लुईसा डन या ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या खुनाने संपूर्ण परिसर हादरला होता. लुईसा यांचा दोनवेळा घटस्फोट झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या. अतिशय सभ्य व मनमिळावू व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची मुलगी एडनाने न्यायालयात सांगितले की, माझ्या आईचे कुणाबरोबरही वाद नव्हते. दोनदा घटस्फोट झाल्याने त्या एकट्याच राहायच्या. फक्त त्यांना दररोज मद्यपान करण्याची सवय होती. २८ जून १९६७ रोजी रात्री शेजारच्यांनी लुईसा यांची किंचाळी ऐकली; पण त्या दारूच्या नशेत असतील असं समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लुईसा यांच्या घराबाहेर पडलेले वर्तमानपत्र व दुधाची बॅग बघून शेजाऱ्यांना शंका आली. दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर थोड्याच वेळात पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पोलिसांना लुईसा यांचा मृतदेह हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. याशिवाय ज्या कपड्याने त्यांचे तोंड दाबण्यात आले होते, तो कपडाही पोलिसांना सापडला. चाकूचे वार आणि तोंड दाबल्याने गुदमरून लुईसा यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. त्या काळात वैज्ञानिक तपासण्या मर्यादित असल्यामुळे पोलिसांना घटनास्थळी फारसे पुरावे सापडले नाहीत. फक्त लुईसा यांच्या कपड्यावर वीर्याचे नमुने आणि त्यांच्या दोन्ही तळहातावर अज्ञात व्यक्तीच्या बोटाचे ठसे मिळाले.
पोलिसांनी कसा केला घटनेचा तपास?
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना लुईसा यांच्या घराच्या २.४ किमी परिसरातील सर्व १५ ते ६० वयोगटातील पुरुषांचे तळहाताचे ठसे घेतले. यात पूर्वी बलात्कार, चोरी अथवा गुन्हेगारी घटनेत दोषी ठरलेल्या आरोपींचाही समावेश होता. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ हजार लोकांची चौकशी केली, तसेच त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. तसेच दोन हजार साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले, तरीही गुन्हा उघडकीस न आल्याने पोलिसांना हा तपास थांबवावा लागला.
रायलंड हेडली ५८ वर्षे गुन्ह्यातून कसा वाचला?
- रायलंड हेडली त्यावेळी लुईसा यांच्या घरापासून २.६ किमी अंतरावर राहत होता.
- जेव्हा पोलिस इतर लोकांच्या बोटांचे ठसे घेत होते, तेव्हा आरोपी हा त्या परिसरात येत नव्हता.
- विशेष बाब म्हणजे, त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्यामुळे तो पोलिसांच्या तावडीतून वाचला.
- मात्र, १० वर्षांनंतर हेडलीने त्याच परिसरात राहणाऱ्या ८४ आणि ७९ वर्षांच्या दोन वृद्ध महिलांवर त्यांच्या घरात घुसून बलात्कार केला.
- या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यात तब्बल पाच हजार पुरुषांचे ठसे घेतले आणि तपासाला गती दिली.
- त्यावेळी पोलिसांनी हेडलीला अटक करून त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने बलात्कार व घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
- तपासात असेही उघड झाले की, आरोपी हा त्या परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर बलात्कार करीत होता.
- कोणकोणत्या घरात महिला एकट्या राहतात याची सखोल माहिती आरोपी हेडलीला होती, एक गुन्हा झाल्यानंतर दुसरा गुन्ह्यासाठी तो पूर्वतयारी करायचा.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प खरंच एलॉन मस्क यांना अमेरिकेतून हद्दपार करू शकतात का? कायदेशीर प्रक्रिया काय आहे?
५८ वर्षांनंतर वीर्याच्या पुराव्यावरून लागला शोध
आरोपी हेडलीनेच १९६७ मध्ये लुईसा यांच्यावर बलात्कार करून त्यांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यांनी २०२३ मध्ये फॉरेन्सिक शास्त्रज्ञ अँड्र्यू पॅरी यांची मदत घेऊन या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. यादरम्यान, लुईसा यांच्या कपड्यांवर सापडलेल्या वीर्याचे नमुने आरोपीच्या वीर्याबरोबर जुळले आणि या प्रकरणाचा छडा लागला. पॅरी यांनी न्यायालयात सांगितले, “कपड्यांवर साठवलेले वीर्य अनेक वर्ष टिकू शकते. जर तुम्ही ते नीट धुतले, तर ते नष्ट होऊ शकते; पण काही वेळा ते धुतल्यावरही तसेच राहते. याप्रकरणी न्यायालयाने हेडलीला दोषी ठरविले असले तरीही तपास पथकाला आता हे स्पष्ट करायचे आहे की, गुन्हा घडला त्यावेळी तो खरोखरच ब्रिस्टलमध्ये राहत होता. हेडलीच्या वयाबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. ५८ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याने ही ब्रिटनमधील न्यायप्रणाली आणि वैज्ञानिक तपासातील मोठी कामगिरी मानली जात आहे.