बॉलीवूड सुपरस्टार समलमान खानला त्याच्या अॅक्टिंगसह, फिटनेससाठीदेखील तरुण फॉलो करतात. मात्र, नुकताच एका कार्यक्रमात त्याने आपल्या आरोग्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलीवूडमध्ये भाईजान अशी ओळख असणारा सलमान तीन गंभीर आजारांशी झुंजत आहे. त्याने ब्रेन एन्युरिझम, एव्ही आणि ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हे आजार असल्याची माहिती दिली आहे. त्याचे वय ५९ वर्षे आहे. सलमान खानने नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या भागात विनोदी कलाकार आणि होस्ट कपिल शर्माशी बोलताना या आजारांचा उल्लेख केला.

सलमान खान बोलताना म्हणाला, माझ्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया असूनही मी काम करत आहे. मेंदूमध्ये एन्युरिझम आहे, तरीही मी काम करत आहे आणि एव्ही मालफॉर्मेशन असूनदेखील माझे काम सुरू आहे. ब्रेन एन्युरिझम, एव्ही आणि ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हे आजार काय आहेत? त्यावर उपचार आहेत का? त्याची लक्षणे काय? याविषयी जाणून घेऊयात.

बॉलीवूडमध्ये भाईजान अशी ओळख असणारा सलमान तीन गंभीर आजारांशी झुंजत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ब्रेन एन्युरिझमला सायलेंट किलर का म्हणतात?

  • ब्रेन एन्युरिझमला सेरेब्रल एन्युरिझमदेखील म्हणतात. या आजारात मेंदूतील रक्तवाहिन्या फुगतात.
  • अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोक (NINDS) नुसार, मेंदूमधील रक्तवाहिनीत एखाद्या ठिकाणी कमकुवतपणा येतो आणि तेथील भाग फुगतो.
  • हा भाग वेळेनुसार आणखी फुगत जातो. हा फुगत राहिला आणि अखेरीस फुटला तर त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो.
  • मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.
  • हृदय, मेंदू, पोट किंवा पायांसह शरीरातील कोणत्याही भागात हा आजार उद्भवू शकतो.
  • बहुतेकदा उच्च रक्तदाब, एथेरोस्क्लेरोसिससारख्या परिस्थितीमुळे ही समस्या उद्भवू शकते.

आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन किंवा एव्हीएम म्हणजे काय?

आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशन (एव्हीएम) ही एक दुर्मीळ पण गंभीर स्थिती आहे. या स्थितीत मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे गुंतागुंतीचे जाळे तयार होते, त्यामुळे धमन्या (Arteries) आणि शिरा (Veins) यांच्यातील रक्ताचा सामान्य प्रवाह विस्कळीत होतो. सामान्य परिस्थितीत धमन्या हृदयातून मेंदूकडे ऑक्सिजन असणारे रक्त वाहून नेतात आणि शिरा ऑक्सिजन कमी झालेले रक्त फुफ्फुसे आणि हृदयात परत करतात. परंतु, आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशनच्या स्थितीत रक्तप्रवाह विस्कळीत होतो. एव्हीएम जन्मजात असू शकतो, मात्र याची लक्षणे अनेक वर्षांनंतरही दिसून येत नाहीत.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात तज्ज्ञांनी असे सांगितले की, एव्हीएम असलेल्या सुमारे १२ टक्के रुग्णांना लक्षणे आढळतात. जर लक्षणे ५० वर्षांच्या वयापर्यंत दिसली नाहीत तर ती कधीच दिसू शकत नाहीत. त्यांच्या कानात आवाज येणे, डोकेदुखीचा त्रास, स्नायू कमकुवत होणे, तसेच बोलणे किंवा हालचालींशी संबंधित समस्या यांसारखी लक्षणे दिसून येतात. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये, एव्हीएममुळे स्ट्रोक किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होऊ शकतो, त्यामुळे याचे लवकर निदान होणे महत्त्वाचे असते.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया याला टिक डौलोरेक्स असेही म्हणतात. या आजारात रुग्णांच्या चेहऱ्याच्या नसांमध्ये तीव्र वेदना होतात. विजेचा धक्का बसावा अशा असह्य़, टाचण्या टोचल्याप्रमाणे किंवा चेहऱ्याच्या एका भागात, डोळ्यांत तिखटाची पूड टाकल्याप्रमाणे या वेदना होत असल्याचे रुग्ण सांगतात. ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची वेदना होणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्याच्या नसेवर ती जेथे मेंदूत प्रवेश करते तेथे रक्तवाहिनीचा दाब आलेला असतो, त्यामुळे नस हळवी होते आणि ट्रायजेमिनल न्यूरॉल्जियाची असह्य़ वेदना सुरू होते. जेव्हा एखाद्याला वेदना जाणवतात तेव्हा जळजळ, धडधड, बधीरपणादेखील जाणवू शकतो.

या आजारांवर उपचार आहेत का?

ब्रेन एन्युरिझम, एव्ही मॅलफॉर्मेशन (एव्हीएम) आणि ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजारांच्या तीव्रतेनुसार आणि जोखमीनुसार उपचार बदलतात. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मते, ब्रेन एन्युरिझम परिस्थितीत लहान मेंदू (४ मिमीपेक्षा कमी) चे नियमित इमेजिंगद्वारे बारकाईने निरीक्षण केले जाते. जर तो फुटण्याचा धोका असेल तर डॉक्टर शस्त्रक्रिया करू शकतात. एन्युरिझममध्ये रक्त प्रवाह रोखण्यासाठी कॅथेटरद्वारे मऊ प्लॅटिनम कॉइल्स टाकले जातात. एन्युरिझम वाढला किंवा धोक्याची चिन्हे दिसू लागली तरच शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.

आर्टेरियोव्हेनस मालफॉर्मेशनवरील उपचारांमध्ये कमीत कमी आक्रमक तंत्रांचा वापर केला जातो. यामध्ये रक्तवाहिन्यांमधून कॅथेटर टाकून उपचार केले जातात. काही प्रकरणांमध्ये, रेडिओसर्जरीचा वापर केला जातो. ही एक प्रकारची रेडिएशन थेरपी असते, ज्यात शस्त्रक्रियेशिवाय एव्हीएम हळूहळू कमी केला जातो. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या परिस्थितीत सामान्यतः अँटीसीझर औषधे आणि स्नायू शिथिल करणारी औषधे दिली जातात. जर वेदना तीव्र झाल्या किंवा औषधे प्रभावी ठरत नसतील तर शस्त्रक्रिया केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये रेडिओसर्जरी, राइझोटॉमी, पेरीफेरल न्यूरेक्टॉमी किंवा मायक्रोव्हस्क्युलर डीकंप्रेशन यांचा समावेश असतो. या उपचारांमध्ये मज्जातंतूवर दबाव आणणाऱ्या रक्तवाहिन्या पुनर्स्थित केल्या जातात. या प्रत्येक उपचारांचे धोके आणि फायदे असतात. शस्त्रक्रियेबाबत निर्णय रुग्णाचे वय, एकूण आरोग्य आणि त्याची स्थिती कशी आहे ही गृहीत धरून घेतला जातो.