सांगलीच्या पुरात वाहून जाणारे ५० अब्ज घनफूट पाणी मराठवाड्यातील कृष्णा खोऱ्यामध्ये आणण्याच्या योजनेचा व्यवहार्यता अहवाल अनुकूल असल्याने पाणी आणण्याचा नवा मार्ग राज्य सरकारला सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही बाब मराठवाड्यातील दुष्काळप्रवण भागांसाठी नक्कीच दिलासादायी ठरते.
पुराचे पाणी कसे व किती वळवले जाईल?

पूर नियंत्रण आणि दुष्काळ निर्मूलन ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतील, असा विचार करून महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत कृष्णा मराठवाडा प्रकल्पातील १६.६६ अब्ज घनफूट पाणी देता येईल का, याची चर्चा करण्यात आली. २०१९ मध्ये कृष्णा पूर अभ्यास समितीने कृष्णा नदीचे ५० अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे वळवण्याची शिफारस केली. त्यानंतर कृष्णा नदीवरील साटपेवाडी येथून १२६ किलोमीटरपर्यंत पाणी नेण्याचे नियोजन करता येईल यावर चर्चा झाली. अलीकडेच ‘ट्रक्टेबल इंजिन’ या कंपनीने हे पाणी वळविण्याचा प्रकल्प आर्थिक निकषात बसणारा असल्याचे सांगितले. २०१९ मध्ये दोन लाख प्रति सेकंद वेगाने पाणी सोडल्याने पूर आला होता. या पुरात सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.

किती तरतूद लागू शकते?

सांगलीतील १२६ किलोमीटरवरून पाणी आणण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १६ हजार कोटी रुपयांचा निधी लागू शकेल, असा अंदाज आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ९३ किलोमीटरचा बोगदा करावा लागणार आहे तर ३३ किलोमीटर पाणी कालव्याद्वारे आणता येईल, असे ठरविले जाऊ शकते. बोगद्याचा व्यास ११.५० असणार आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यास किती सिंचन?

या प्रकल्पाने पूर्ण साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, योजना पूर्ण करण्यासाठी कोणती पद्धत अनुसरणे गरजेचे आहे, याचा निर्णय येत्या काही आठवड्यांत होण्याची शक्यता आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ‘मित्रा’ संस्थेवर देण्यात आली आहे. या संस्थेचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील म्हणाले, ‘या योजनेमुळे मराठवाड्याचा दुष्काळ दूर होईल. हे काम करताना त्याची व्यवहार्यता तपासण्यास सांगण्यात आले होते. योजनेसाठी लावला जाणार निधी आणि त्यातून मिळणारे फायदे याचा तपशील तपासल्यानंतर ते गुणोत्तर अधिक चांगले असल्याचे दिसून आले आहे.’

पाण्याचा वापर कसा प्रस्तावित आहे?

या प्रकल्पातून साधारणत: २५ अब्ज घनफूट सिंचनासाठी तर १० अब्ज घनफूट पाणी बिगरसिंचनासाठी राखून ठेवण्याचा प्रस्ताव आहे. साधारणत: १० अब्ज घनफूट पाण्याचा व्यय होऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी वाटपाचा प्रश्न मार्गी लागेल?

प्रथम पाणी तंटा लवादानुसार महाराष्ट्रास ५६० अब्ज घनफूट पाणी उपलब्ध होते. त्यात मोठ्या प्रकल्पाच्या नव्या स्रोतांमुळे आणखी २५ अब्ज घनफूट उपलब्ध होणार आहे. यातील पाच अब्ज घनफूट पाणी चेन्नई शहरास देण्याचा निर्णय झाल्याने तसेच पोलावरम प्रकल्पाचे पाणी कृष्णा खोऱ्याकडे वळविण्याचे ठरविण्यात आल्याने महाराष्ट्राच्या वाट्याला ५९४ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध झाले आहे. या नव्या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मिटू शकेल, असा दावा केला जात आहे. मात्र, ही योजना कशी करायची याचा तपशील अद्यापि ठरलेला नाही. त्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होईल असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंंडळासमोर ठेवला जाणार आहे.

रेंगाळलेल्या योजनांचे काय होणार?

धाराशिव, लातूर, बीड हे तीन जिल्हे कृष्णा खोऱ्यात येतात. या जिल्ह्यांमध्ये सातत्याने दुष्काळ असल्याने २३.३२ अब्ज घनफूट पाणी मंजूर आहे. मात्र, कृष्णा पाणी तंटा लवादामुळे या प्रकल्पातून केवळ सात टीएमसी पाणी मिळाले आहे. ही योजनाही अद्याप पूर्ण झालेली नाही. ही योजना डिसेंबरअखेर आकारास येईल असा दावा केला जात आहे. मात्र, उर्वरित पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली होती. त्यामुळे सांगलीच्या पुरातून वाहून जाणारे पाणी आले तर दुष्काळी भागातील प्रश्न सुटतील. आलेले पाणी नीटपणे वापरण्यासाठी प्रकल्पाचे आरेखन बंदिस्त पाईप पद्धतीने केली जाण्याची शक्यता आहे. ‘मित्रा’ या संस्थेच्या माध्यमातून योजनेची आखणी होत आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीपासून कृष्णा- मराठवाडा प्रकल्पातून २५ अब्ज घनफूट पाणी दिले जाईल असे सांगण्यात आले होते. ते आश्वासन अजून पूर्ण झालेले नाही. मात्र, पूर नियंत्रण कार्यक्रमातून का असेना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर धाराशिव जिल्ह्यास या योजनेचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या योजनेकडे सकारात्मक अंगाने पाहिले जात आहे. फक्त या योजनेची अंमलबजावणी अधिक लवकर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.