शेअर बाजाराने शुक्रवारी आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. काल दुपारी सेन्सेक्सने १३०२ अंकांच्या वाढीसह ७३,८०२.५५ हा विक्रमी उच्चांक गाठला होता. तसेच निफ्टीने इंट्रा डेमध्ये २२,३५०.१० उच्चांक गाठला होता. खरं तर NSE चीही ही सर्वोच्च पातळी आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ८.४ टक्के जीडीपी वाढीच्या दराने शेअर बाजाराला विक्रमी पातळी गाठण्यात मोठी मदत केली आहे. जीडीपीचा गुरुवारी जाहीर झालेला हा आकडा गेल्या दीड वर्षांतील सर्वोच्च तिमाही वाढ दर्शवतो. शुक्रवारी BSE सेन्सेक्स ७२,६०६.३१ वर उघडला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी २२,०४८.३० वर उघडला. शुक्रवारी NSE १.६२ टक्क्यांच्या वाढीसह २२,३३८.७५ वर बंद झाला आणि सेन्सेक्स १२४५.३४ अंकांच्या म्हणजे १.७२ टक्क्यांच्या वाढीसह ७३,७४५.३५ वर बंद झाला. डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचे आकडे जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी (१ मार्च) बेंचमार्क शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात १ टक्क्यांहून अधिक वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याचा हा सकारात्मक परिणाम होता. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के असल्याचंही राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.
१ मार्च रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी किती वाढले?
BSE चा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स सकाळच्या व्यवहारात ८०० अंकांनी म्हणजेच १.१ टक्क्यांनी वाढून ७३,३०७ वर पोहोचला. ७२,५००.३ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत शुक्रवारी तो ७२,६०६.३१ वर उघडला. तसेच निफ्टी ५० ही २३८ अंकांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी वाढून २२,२२० वर पोहोचला. गुरुवारच्या २१,९८२.८ च्या बंदच्या तुलनेत तो २२,०४८.३ वर उघडला.
बाजारात वाढ कशामुळे झाली?
“बाजारावर प्रभाव टाकणारा मुख्य घटक हा अपेक्षित ८.४ टक्क्यांवर आलेला जीडीपी आहे. तसेच येत्या काळात जीडीपी वाढीचा आकडा अपेक्षेपेक्षा चांगला असण्याची शक्यता आहे. तिसऱ्या तिमाहीतील ८.४ टक्क्यांचा जीडीपी वाढीचा दर हा सार्वत्रिक अपेक्षेपेक्षा कितीतरी चांगला आहे, त्याच वेळी याच तिमाहीतील सकल मूल्यवर्धन (जीव्हीए) मात्र ६.५ टक्के हे अपेक्षेनुरूप किंबहुना घसरण दर्शवणारे असल्याचंही जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक सल्लागार व्ही के विजयकुमार म्हणालेत. GDP आकड्यांमधले महत्त्वाचे अंतर्गत घटक म्हणजे उत्पादनातील ११.६ टक्के वाढ आहे. तसेच बांधकामातील ९.५ टक्के वाढ आणि भांडवली निर्मितीमध्ये झालेली १०.६ टक्के वाढीनेही जीडीपी वाढीला हातभार लावला आहे. खरं तर जीडीपीची सकारात्मक आकडेवारी शेअर बाजाराला आधार अन् ताकद देतात. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), भारती एअरटेल, L&T आणि ICICI बँक यांसारख्या लार्ज कॅप्समध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असंही विजयकुमार यांनी अधोरेखित केले.
भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत कशी कामगिरी केली आहे?
भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपीने सरलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत सार्वत्रिक अपेक्षांपेक्षा किती तरी सरस ८.४ टक्के दराने वाढ साधली. जीडीपी वाढीचा हा दर मागील सात तिमाहींमध्ये सर्वाधिक आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थानदेखील ही आकडेवारी भक्कम करते.तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीची वाढ जेमतेम ७ टक्के आणि बहुतेकांनी ती ७ टक्क्यांखाली घसरण्याची शक्यता वर्तवली होती.गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ४.४ टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी GDP चा दुसरा आगाऊ अंदाज देखील जारी केला आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीतील चलन विषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर वर्तवलेल्या अंदाजात तिसऱ्या तिमाहीतील वाढ काहीशी घसरून ६.५ टक्क्यांवर राहील, असे म्हटले होते. तसेच पुरवठ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास कृषी क्षेत्राची कामगिरी कमी झाली आहे, परंतु औद्योगिक आणि सेवा क्षेत्रे परिवर्तनशील राहिली आहेत, असंही नोमुराने सांगितलं आहे.
हेही वाचाः ८.४ टक्के ‘जीडीपी’ वाढीबाबत आश्चर्य आणि शंका का व्यक्त होतेय?
भारताच्या आर्थिक विकासाचा दृष्टिकोन काय?
नोमुराच्या मते, विशेषत: स्थिर जागतिक आर्थिक दृष्टिकोनाच्या वातावरणात वाढ परिवर्तनशील राहण्याची शक्यता आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरकारने महसुली खर्च आणि भांडवली खर्चासाठीचा निधीसुद्धा मर्यादित केला आहे. खासगी क्षेत्रातून गुंतवणुकीची स्थिती उत्साहवर्धक नाही, याची अर्थमंत्र्यांनीच जाहीर कबुली दिली आहे, असंही नोमुराने म्हटले.