शाहरुख खानला मंगळवारी उष्माघाताचा झटका आल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान उपस्थित राहिल्यानंतर तो आजारी पडला, ज्यामध्ये KKR ने विजयी होत रविवारच्या IPL फायनलमध्ये जागा निश्चित केली. या सामन्यानंतर शाहरुख खानला उष्माघाताचा झटका आला. उष्णतेचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो आणि उन्हाळ्यात उष्माघात कसा टाळता येईल हे जाणून घेणार आहोत.

उष्माघात म्हणजे काय?

सभोवतालचे तापमान जास्त असल्याने बऱ्याचदा शरीराला ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढणारे उच्च तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येणे शक्य नसते. त्यामुळे शरीरात सोडियम आणि पोटॅशियम यांसारख्या क्षारांचे तीव्र असंतुलन निर्माण होते. उच्च तापमान आणि मीठ यांच्या असंतुलनामुळे अवयवांच्या चलनामध्ये व्यत्यय निर्माण होतो आणि त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला आकडी किंवा तंद्री येते आणि गंभीर प्रकरणांमध्ये ती व्यक्ती कोमात जाऊ शकते. त्यामुळे मूत्रपिंड आणि यकृताचेही नुकसान होऊ शकते. अशा लक्षणांनंतर उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते,” असेही इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांचं म्हणणं आहे. अशा गंभीर प्रकरणांमध्ये शरीराचे तापमान जलद कमी करणे हे उद्दिष्ट असते. व्यक्तीवर थंड पाणी टाकून त्यांना थंड पेये प्यायला लावून आणि क्षाराची पातळी संतुलित करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स देऊन हे करता येते.

तुम्ही रुग्णालयामध्ये केव्हा जाऊ शकता?

डॉ. चॅटर्जी म्हणाले की, एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येत असल्यास त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे. त्यांच्या शरीराचे तापमान खूप जास्त आहे, परंतु त्यांना अजिबात घाम येत नाही, त्यांना तंद्री आल्यासारखे वाटते, त्यांना उलट्या होतात, त्यांना लघवी होत नाही आणि त्यांना नीट श्वासही घेता येत नाही. अशा परिस्थितीत वृद्ध आणि तरुणांवर उष्णतेचा प्रभाव पडण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. तरुणांना उष्माघात कोणत्याही वयात होऊ शकतो,” असेही डॉ. चॅटर्जी म्हणाले.

हेही वाचाः भूजलाचा वाढत्या वापराने वाळवंटीकरणाचा धोका किती?

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी थेट सूर्यप्रकाशात विशेषत: दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे. या काळात आपण कठोर हालचाली टाळाव्यात. तुम्ही बाहेर जाणार असाल आणि तुम्हाला तहान लागली नसली तरीही तुम्ही पाणी पिणे सुरूच ठेवावे. लस्सी, लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएस असे इतर पदार्थ प्यायलास ते इलेक्ट्रोलाइटची पातळी राखू शकतात. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन करू नका, कारण ते तुम्हाला अधिक निर्जलीकरण(Dehydration) करू शकतात. हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला आणि गॉगल, छत्री आणि शूज वापरा. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या २०२३ च्या सल्ल्यानुसार, लोकांनी पडदे किंवा शेड्स वापरून घरे थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि ओलसर कापड वापरून किंवा वारंवार थंड पाण्याने आंघोळ करून शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

आर्द्रता अन् रात्रीचे तापमान महत्त्वाचे का आहे?

गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे माजी संचालक डॉ. दिलीप मावळणकर यांनी गेल्या वर्षी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जेव्हा आर्द्रतेची पातळी जास्त असते, तेव्हा जाणवत असलेले तापमान सभोवतालच्या तापमानाच्या तुलनेत जास्त असते. उच्च आर्द्रता पातळी म्हणजे शरीर थंड ठेवण्यासाठी घाम न आल्यास प्रभावीपणे बाष्पीभवन होत नाही. रात्रीचे तापमानही जास्त राहिल्यास शरीराला विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही. समजा तुम्ही ४४ अंश सेल्सिअस तापमान असताना बाहेर पडल्यास काही तासांनी तुम्ही घराच्या आत थंड ठिकाणी परत आलात तर तुम्हाला आराम वाटतो. रात्रीचे तापमान कमी असताना शरीराला हा आराम मिळतो. दोन दिवस रात्रीचे तापमानही कमी झाले नाही तर शरीर सावरता येत नाही,” असेही डॉ. मावळणकर म्हणाले.