आगामी आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करताना शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, श्रेयस अय्यरला पुन्हा संघातून बाहेर ठेवण्यात आले. कसोटी संघातील प्रमुख सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही केवळ राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले, तर जसप्रीत बुमराचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने घेतलेले हे निर्णय धाडसी ठरतात की अन्यायकारक, याचा आढावा.
गिल पुन्हा ट्वेन्टी-२० संघात का?
आशिया चषकासाठी गिलचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आणि त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. त्यामुळे आगामी काळात सर्वच प्रारूपात एकच कर्णधार असावा असा निवड समितीचा विचार असल्याचे अधोरेखित होते. गिल आधीच कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवत असून एकदिवसीय संघाचा तो उपकर्णधार आहे. तंदुरुस्त राहिल्यास गिल दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या २०२७ एकदिवसीय विश्वचषक, त्यानंतर लॉस एंजिलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो. ट्वेन्टी-२० संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादववर अलीकडेच हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. तसेच त्याचे वय पाहता गिल सध्या निवड समितीकडे सर्वोत्तम पर्याय आहे. तो गिल चांगल्या लयीतही आहे. २५ वर्षीय गिलने आपला अखेरचा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०२४ मध्ये पालेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
सॅमसनचे स्थान धोक्यात?
आशिया चषक संघाची निवड पाहता संजू सॅमसनला अंतिम अकरामध्ये कितपत संधी मिळेल याबाबत साशंकता आहे. इंग्लंड दौऱ्यात यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाल्याने तो आशिया चषक स्पर्धेकरिता उपलब्ध नसला, तरीही पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल. त्यामुळे सॅमसनच्या भविष्याबाबत संभ्रम आहे. सॅमसन अव्वल तीन स्थानांवर फलंदाजी करतो. आता उपकर्णधारपदी निवड झालेला गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला खेळणे जवळपास निश्चित समजले जात आहे. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या गिलने गेल्या ‘आयपीएल’मध्ये १५० हून अधिकच्या सरासरीने ६०० हून अधिक धावा केल्या. सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन शतके साकारणाऱ्या तिलक वर्माबाबत प्रश्न उपस्थित होतो. तिलक ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो, तर त्याचे क्षेत्ररक्षणही उच्च दर्जाचे आहे. सॅमसनला स्थान दिल्यास तिसऱ्या ते पाचव्या स्थानावर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या असे सर्व उजव्या हाताचे फलंदाज असतील. त्यामुळे संघनियोजनात अडचण निर्माण होऊ शकते.
श्रेयस अय्यरला डच्चू का?
‘आयपीएल’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना त्याने १७५.०७ च्या स्ट्राइक रेटने ६०० हून अधिक धावा केल्या. मुळात मध्यक्रमात तिलक, सूर्यकुमार आणि हार्दिक फलंदाजीस येतात. त्यातच तिलक आणि हार्दिक हे गोलंदाजी करण्यासही सक्षम आहेत. त्यामुळे श्रेयससाठी जागा निर्माण होऊ शकली नाही. श्रेयसने आपला अखेरचा ट्वेन्टी-२० डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. ‘‘श्रेयसची यामध्ये कोणतीच चूक नाही. त्याला केवळ आपल्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही केवळ १५ खेळाडूंचीच निवड करू शकतो. त्यामुळे कोणाची तरी निराशा होणारच,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले. कसोटीत चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालऐवजी अभिषेक शर्मालाच पसंती देण्यात आली. ‘‘गेल्या वर्षी अभिषेकने चांगली कामगिरी केली. त्याच्यामुळे आम्हाला गोलंदाजीचा अतिरिक्त पर्यायही उपलब्ध होतो,’’ असे आगरकर म्हणाले.
बुमराला ट्वेन्टी-२० खेळवणे कितपत योग्य?
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ तीन सामन्यात सहभाग नोंदविणाऱ्या जसप्रीत बुमरावर टीका झाली होती. या तीन सामन्यांपैकी दोनमध्ये भारत पराभूत झाला, तर एक सामना अनिर्णित झाला. बुमरा हा भारतासाठी निर्णायक गोलंदाज राहिला आहे. गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक जेतेपद उंचावण्यातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. मात्र, गेल्या काही काळात दुखापतीमुळे तो बराच काळ संघापासून दूर होता. ‘आयपीएल’मध्ये त्याने दुखापतीतून पुनरागमन केले. गेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर आशिया चषक ही त्याची पहिली ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. ‘‘आम्हाला तो निर्णायक सामन्यांसाठी हवा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वच सामने महत्त्वाचे असतात. मात्र, विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक आणि इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या मालिका यांना वेगळे महत्त्व आहे. गेल्या दोन ते तीन वर्षे तो दुखापतीचा सामना करीत आहे. तो एक खास गोलंदाज आहे. त्याची क्षमताही सर्वांना माहित आहे,’’ असे आगरकर म्हणाले. आशिया चषक ही ट्वेन्टी-२० प्रारूपात होणार असल्याने बुमराला मोठे स्पेल टाकावे लागणार नाहीत. त्यामुळे तो तंदुरुस्ती राखू शकेल अशी निवड समितीची धारणा आहे.
फिरकीचे अधिक पर्याय…
भारतीय संघाने वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. आता आशिया चषकात भारताचे जवळपास सर्वच सामने दुबई येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे भारताला खेळपट्टीची चांगली कल्पना आहे. चॅम्पियन्स करंडकादरम्यान खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना पूरक होती. यावेळीही आशिया चषकासाठी संघात फिरकीचे चांगले पर्याय आहेत. चॅम्पियन्स करंडकात चमक दाखवणारा वरूण चक्रवर्ती, चायनामन कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची मदार आहे. तसेच, अभिषेक व तिलकही फिरकी गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत. तसेच हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षरसारख्या गुणवान अष्टपैलू खेळाडूंमुळे भारताचा संघ मजबूत दिसत आहे.