scorecardresearch

विश्लेषण: आयटी कंपन्यांसाठी आगामी काळ आव्हानात्मक आणि सकारात्मक!

बाजारातील विश्लेषकांच्या मते, जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीसह, वाढते व्याजदर, कर्मचारी गळतीचे (ॲट्रिशन) वाढते प्रमाण अशा विविध समस्या असूनही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

विश्लेषण: आयटी कंपन्यांसाठी आगामी काळ आव्हानात्मक आणि सकारात्मक!
आयटी कंपन्यांसाठी आगामी काळ आव्हानात्मक आणि सकारात्मक! (प्रातिनिधिक छायाचित्र)

गौरव मुठे

देशातील सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या डिसेंबर तिमाहीच्या निकाल हंगामाची दमदार सुरुवात केली. सरलेल्या तिमाहीत टीसीएसपाठोपाठ इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी समाधानकारक तिमाही निकाल जाहीर करत भांडवली बाजारात एकंदर कंपन्यांच्या तिमाहीच्या निकाल हंगामाची सकारात्मक सुरुवात केली. बाजारातील विश्लेषकांच्या मते, जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीसह, वाढते व्याजदर, कर्मचारी गळतीचे (ॲट्रिशन) वाढते प्रमाण अशा विविध समस्या असूनही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. आगामी काळदेखील आव्हानात्मक राहील मात्र कंपन्यांची सकारात्मक वाटचाल कायम राहील, असे चारही आयटी कंपन्यांना वाटते.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची तिमाही कामगिरी कशी राहिली?

देशातील सर्वात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान सेवा निर्यातदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) डिसेंबर तिमाहीत, परकीय चलन विनिमय मूल्य आणि व्यवसायातील वाढीच्या पार्श्वभूमीवर निव्वळ नफ्यात ११ टक्क्यांची वाढ नोंदविली आणि तो १०,८४६ कोटी रुपये नोंदविला. कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ९,७६९ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा नोंदविला होता. चांगल्या निकालामुळे टीसीएसच्या समभागाने पुन्हा एकदा तेजीची वाट धरली आहे. कंपनीचा एकूण महसूल १९.१ टक्क्यांनी वाढून ५८,२२९ कोटी रुपयांवर गेला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत ४८,८८५ कोटी रुपये होता. तिमाहीतील कामगिरी अपेक्षेपेक्षा सरस ठरली असली तरी स्थिर चलनात, महसुलातील वाढ १३.५ टक्के आहे. मात्र, डॉलरच्या प्रमाणात तो ८ टक्क्यांनी घसरला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तिमाहीत कंपनीचे नफ्याचे प्रमाण अर्धा टक्क्याने घटून २४.५ टक्क्यांवर आले आहे.

त्यापाठोपाठ इन्फोसिसने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६,५८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ५,८०९ कोटी रुपये नोंदवला गेला होता. अशा प्रकारे वार्षिक आधारावर इन्फोसिसने निव्वळ नफ्यात १३.४ टक्के वाढ साधली आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही इन्फोसिसची कामगिरी चांगली राहिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित महसूल ३८,३१८ कोटी होता. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत ३१,८६७ कोटींच्या एकत्रित महसुलापेक्षा २० टक्क्यांनी वाढला आहे.

विश्लेषण: समृद्धी महामार्गावरील वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूंना जबाबदार कोण?

तिसरी मोठी आयटी कंपनी असलेल्या विप्रोने जागतिक पातळीवर आव्हाने असूनही, सरलेल्या डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात २.८ टक्क्यांची वाढ नोंदवत तो ३,०५३ कोटी रुपयांवर नेला. तिसर्‍या तिमाहीत, अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत विप्रोने २३,२२९ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो गेल्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत १४.३ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच चौथी दिग्गज कंपनी एचसीएल टेकने डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात १९ टक्क्यांनी वाढ नोंदवली.तो ४,०९६ कोटींवर पोहोचला आहे. तर महसूल १९.६ टक्क्यांनी वाढून २६,७०० कोटी रुपयांवर गेला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत २२,३३१ कोटी रुपये होता.

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसमोरील आव्हाने काय?

जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वाधिक परिणाम युरोपीय राष्ट्रांवर झाला आहे. युद्धामुळे पुरवठा साखळीतील अडचणी आणि त्यापरिणामी निर्माण झालेल्या महागाईमुळे एकंदर समस्येत वाढ झाली आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा व्यवसाय सेवा निर्यातीवर अवलंबून असल्याने युरोपातील प्रतिकूल परिस्थितीतीचा त्यांच्या एकूण कमाईवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अमेरिकेपेक्षा युरोपातील वातावरण अधिक चिंतेत टाकणारे असल्याचे एकूण माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे म्हणणे आहे.

कंपन्यांचे आगामी काळाबाबत म्हणणे काय?

आगामी काळाबाबत माहिती तंत्रज्ञान कंपन्या आशादायी असून यंदाच्या तिमाहीत कंपन्यांनी एकूण महसुलात १४ ते २० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तसेच नफ्यातदेखील ३ (विप्रो) ते १९ (एचसीएल टेक) टक्क्यांची वाढ साधली आहे .जागतिक प्रतिकूलतेपायी एकूणच सेवा क्षेत्रात मागणी मंदावली असूनही, या तिमाहीत कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. मुख्यत्वे क्लाउड सेवा व्यवसायातील उत्कृष्ट कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. कंपनी उत्तर अमेरिका आणि इंग्लडमधील तिच्या कामगिरीबद्दल अधिक आशावादी आहे. तिच्या एकूण उत्पन्नात तिथून मिळणाऱ्या उत्पन्नाचे योगदान दोन तृतीयांश इतके मोठे आहे. मात्र नजीकच्या काळातील जोखीम बघता युरोपीय बाजारांवर अधिक लक्षकेंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण प्रतिकूल भू-राजकीय वातावरण ग्राहकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांवर पैसे खर्च करण्यापासून प्रतिबंधित करते आहे, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले. तर इन्फोसिसनेदेखील जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदगतीमुळे काही उद्योग क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत इशारा दिला आहे.

विश्लेषण: देशाच्या जमापुंजीचे गणित ठरवणारा अर्थसंकल्प कसा तयार होतो? कशी असते ही प्रक्रिया?

विशेषत: कर्ज व्यवसाय, गुंतवणूक बँकिंग, दूरसंचार आणि उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे कंपन्यांनी नवीन प्रकल्पांवर निधी खर्च करण्याचा निर्णय पुढे ढकलला असून खर्चात कपातदेखील केली आहे. मात्र दुसरीकडे उत्पादन, ऊर्जा आणि ग्राहक उपयुक्तता क्षेत्राशी संबंधित उद्योग बळकट होत आहेत. आगामी काळ आव्हानात्मक असला तरी आगामी काळात आमच्या सेवांना आलेल्या चांगल्या मागणीमुळे नजिकच्या कालावधीबाबत कंपन्यांच्या वाढीबद्दल सकारात्मक आहोत, असे एचसीएल टेकचे मुख्याधिकारी सी विजयकुमार म्हणाले.

कर्मचारी गळतीचे आणि भरतीचे प्रमाण कसे?

सरलेल्या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे नवीन भरतीचे प्रमाण घटले आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कंपन्यांमधील गळतीचे प्रमाण (ॲट्रिशन रेट) देखील कमी झाले आहे. एकत्रितपणे भारतातील आघाडीच्या चार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल तेल आणि विप्रो यांनी सरलेल्या डिसेंबर तिमाहीत फक्त १,९४० नवीन कर्मचाऱ्यांची निव्वळ भर घातली, जी गेल्या आठ तिमाहींमधील सर्वात कमी राहिली आहे. मागील सात तिमाहींमध्ये, या चार कंपन्यांनी सरासरी ५३,०४७ कर्मचारी जोडले होते. तुलनेत, तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण ९६ टक्क्यांनी घटले आहेत. टीसीएएसने दहा तिमाहीत प्रथमच एकूण कर्मचारी संख्येत घट नोंदवली आहे. मात्र कंपनीकडून करण्यात आलेली ही नियोजित कपात असल्याचे टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी, मिलिंद लक्कड म्हणाले.

विश्लेषण : ‘बाइक टॅक्सी’बाबत राज्यात काही धोरण आहे का?

आर्थिक वर्ष २०२२ च्या सुरुवातीपासून भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी वाढलेले कर्मचारी गळतीचे ठरले आहे. इन्फोसिसने पहिल्या तिमाहीत २८.४ टक्के ॲट्रिशन रेट नोंदवला होता. तथापि, तिसर्‍या तिमाहीत, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी ॲट्रिशन रेटमध्ये २० ते २८० आधार बिंदूंची (०.२० ते २.८० टक्के) घट नोंदवली आहे.

guarav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 08:35 IST

संबंधित बातम्या