विश्लेषण: संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का? | thane bjp mla sanjay kelkar demands inquiry tmc contract work | Loksatta

विश्लेषण: संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का?

संजय केळकर यांच्यासारखे नेते भाजपमधील बदलत्या राजकारणाचे आणि वाढत्या अस्वस्थतेचे प्रतीक तर ठरत नाहीत ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

sanjay kelkar bjp mla tmc
संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जयेश सामंत

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामे तसेच प्रशासकीय मंजुऱ्यांची चौकशी करा अशी मागणी करत ठाणे विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील महापालिकेवर त्यांच्या समर्थकांचा वरचष्मा दिसून येतो. शिंदे म्हणतील ती पूर्वदिशा असा कारभार राहिलेल्या ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराने टोक गाठल्याचा घणाघात करत केळकर यांनी थेट शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनाच आव्हान उभे केल्याची चर्चा आता रंगली आहे. शिंदे यांच्यासारखा मोहरा हाती लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. त्यामुळे भाजपमध्ये महाराष्ट्राचा गड सर केल्याचा आनंद असला तरी स्थानिक राजकारणात शिंदे समर्थकांपुढे अनेक ठिकाणी पडती भूमिका घ्यावी लागत असल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळे संजय केळकर यांच्यासारखे नेते भाजपमधील बदलत्या राजकारणाचे आणि वाढत्या अस्वस्थतेचे प्रतीक तर ठरत नाहीत ना, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ठाण्यात भाजपची ताकद वाढते आहे का?

ठाणे जिल्ह्यातील युतीच्या राजकारणात अनेक वर्ष शिवसेना पक्ष हा मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरताना दिसला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची जिल्ह्यातील राजकारणावर मोठी पकड होती. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या नेत्यांनी जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदारकी भूषवली. संघ आणि भाजपचा प्रभाव राहिलेला हा मतदारसंघ दिघे यांनी हट्टाने शिवसेनेसाठी मागून घेतला. नव्याने झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेतही ठाणे आणि कल्याण हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिले. युतीच्या राजकारणात काही दशके पडती भूमिका घेणारा भाजप २०१४नंतर मात्र आक्रमक बनला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांना आपलेसे करत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ या पक्षाने बांधण्यास सुरुवात केली. आजच्या घडीस जिल्ह्यातील सर्वाधिक आठ आमदार हे भाजपचे आहेत. शिवसेनेची सत्ता असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत.

विश्लेषण: कसबा कुणाचे, रासने की धंगेकरांचे? ब्राह्मण उमेदवारांना खरोखर डावलले का?

राष्ट्रवादीतून आयात केलेले नेते भाजप वाढीसाठी फायदेशीर ठरले आहेत का?

ठाणे जिल्ह्यात जुन्या शिवसेनेला शह देताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयात केलेल्या मातब्बर नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात शिवसेनेची मोठी ताकद होती. आनंद दिघे हयात असताना त्यांनी ग्रामीण भागातील गावागावांमधून पक्षाच्या शाखा उभ्या केल्या. गल्लोगल्ली कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले. आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी समाजातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिघे यांनी ताकद दिली. पुढे एकनाथ शिंदे यांनीही दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाची ही बांधणी अधिक पक्की केली. असे असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण पट्ट्यात कपिल पाटील, किसन कथोरे यांच्यासारखे नेते गळाला लावत भाजपनेही शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षाच्या जिल्ह्यातील नियोजनाची सर्व सूत्रे सध्या दिसत असली तरी नवी मुंबईत गणेश नाईक, भिवंडीत कपिल पाटील, मुरबाड-बदलापूरात किसन कथोरे यांच्या माध्यमातून भाजपने आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पट्ट्यात भाजप आणि सध्याच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत स्थानिक पातळीवर संघर्ष अथवा विसंवाद वाढताना दिसत आहे.

ठाण्यात भाजप अस्वस्थ का?

२०१४मधील निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आणि शिवसेनेकडून रवींद्र फाटक असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. या मतदारसंघात नौपाडा, पाचपाखाडी, चरई, टेंभी नाका अशा जुन्या ठाण्याचा परिसर येतो. या संपूर्ण पट्ट्यात नेमका प्रभाव कुणाचा यावरून यापूर्वीही भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत केळकर यांनी फाटक यांचा दहा हजारांपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव करत जुन्या ठाण्यावरील पकड सिद्ध केली. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही नौपाड्यातून भाजपचे चार नगरसेवक निवडून आले.

ठाणे शहरावर भाजपची पकड अधिक घट्ट होत असल्याचे हे द्योतक होते. महापालिकेवर एकनाथ शिंदे यांची सत्ता, मात्र जुन्या ठाण्यावर भाजपचा प्रभाव हे चित्र अजूनही कायम आहे. अडीच वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होताच ठाण्यातील भाजप अधिक आक्रमक झालेला पाहायला मिळाला. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, वाढत्या बेकायदा बांधकामांच्या प्रश्नावर मिळेल तिथे सत्ताधारी म्हणून शिवसेनेची कोंडी करायची अशी मोहीमच भाजपने सुरू केली होती. महापालिका निवडणुकांसाठी आवश्यक तयारी, प्रभाग-प्रभागांमधील मोर्चेबांधणी, उमेदवारांच्या चाचपणीसाठी या पक्षाचे नेते दिवसरात्र काम करताना दिसत होते. पण राज्यातील सत्ता समीकरणे बदलताच स्थानिक राजकारणातील गणितेही बदलली असून एरवी जोशात असलेले भाजपचे नेते गोंधळून गेल्याचे पाहायला मिळत आहेत.

विश्लेषण: नवीन ठाण्याची निर्मिती लवकरच? काय असेल हा प्रकल्प?

केळकर अजूनही आक्रमक का आहेत?

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजप श्रेष्ठींनी ठाणे शहर ‘ॲाप्शन’ला टाकल्याची आता चर्चा आहे. त्यामुळे गल्लीबोळात निवडणुकांची तयारी करणारे, शिंदे समर्थकांविरोधात तळ ठोकून असणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. कशीश पार्क येथील पक्षाच्या एका कार्यकर्त्याला शिंदे समर्थक माजी नगरसेवकाने चोप दिल्याचे प्रकरणामुळे भाजपमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे. दिव्यातही भाजप आणि शिंदे समर्थकांमध्ये विस्तव जात नाही. मध्यंतरी शिवाई नगर येथील दिवंगत नेते सुधाभाई चव्हाण यांच्या पत्नीचा भाजप प्रवेश जवळपास पक्का ठरला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर असतानाही हा प्रवेश ऐनवेळेस रद्द करण्यात आला. ‘वर्षा’वरून आलेल्या निरोपामुळे हा पक्षप्रवेश थांबविण्यात आल्याच्या चर्चेमुळे भाजप कार्यकर्त्यांना आता आपला वाली कोण असा प्रश्न पडला.

या सर्व घडामोडींमुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनोधैर्यावर होत असलेला प्रतिकूल परिणाम पाहून गेल्या काही महिन्यांपासून आमदार केळकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या कामकाजावर, कंत्राटी कामांवर टीकेची झोड उठवत केळकर यांनी भाजपचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवेल अशा पद्धतीची आखणी सुरू केल्याचे दिसते. नव्या राजकीय घडामोडींमुळे जुन्या ठाण्यातील भाजपचे अस्तित्व धोक्यात येऊ नये असा केळकरांचा प्रयत्न दिसतो. मुख्यमंत्र्यांसाठी तुम्ही ठाणे ‘ॲाप्शनला’ टाकले असले तरी सहजासहजी आम्ही माघार घेणार नाही असा संदेश तर केळकर आपल्या वागण्यातून देऊ पहात नाहीत ना, अशी चर्चाही आता रंगली आहे. हा संदेश ठाणेकर मतदारांसाठी आहेच शिवाय आपल्याच पक्षाच्या नेत्यांसाठीही केळकर या माध्यमातून पक्षातील वाढत्या अस्वस्थतेचे प्रतीक ठरू लागले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 08:55 IST
Next Story
विश्लेषण : समान उद्दिष्टासाठी दोन स्वतंत्र संस्था?