Doomsday plane इस्रायल व इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षामुळे दोन्ही देशांमधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आणि अनेक जणांनी या युद्धात आपला जीव गमावला. इराणमध्ये आतापर्यंत या संघर्षामुळे ६०० हून अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. इराणकडूनही इस्रायलवर हल्ले सुरू आहेत; मात्र अद्याप इस्रायलमधील अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक विधानांमुळेही तणाव अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. या तणावादरम्यान अमेरिकेचे डूम्सडे विमान आकाशात दिसल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री हे वॉशिंग्टन डीसी येथील जॉइंट बेस अँड्र्यूजकडे उड्डाण करताना दिसले. त्यामुळे अमेरिका संघर्षासाठी पूर्णपणे तयार आहे का? याबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुख्य म्हणजे ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना इशारा दिला आहे आणि या इशाऱ्यावर खामेनी यांनीदेखील ठोस भूमिका घेतली आहे. जर अमेरिकेने कोणताही हल्ला केला, तर त्यांना कठोर प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. एकमेकांविरोधातील याच विधानांदरम्यान ‘डूम्स डे विमान आकाशात दिसल्याने तणाव आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, ‘डूम्स डे’ विमान नक्की काय आहे? इराण-इस्रायल संघर्षादरम्यान हे विमान दिसल्याने चिंता का वाढली आहे? खरंच अमेरिका युद्धाची तयारी करत आहे का? त्याविषयी जाणून घेऊ…

ई-४बी नाईटवॉच विमानाला ‘डूम्सडे प्लेन’ म्हणून ओळखले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘डूम्स डे प्लेन’ काय आहे?

  • ई-४बी नाईटवॉच विमानाला ‘डूम्सडे प्लेन’ म्हणून ओळखले जाते.
  • मंगळवारी हे विमान लुईझियानाहून मेरीलँडला उड्डाण करताना दिसले. त्यानंतर जगभर या विमानाची चर्चा सुरू झाली.
  • या विमानाचा वापर अमेरिकेचे अध्यक्ष किंवा लष्कराच्या नेतृत्त्वाकडून केला जातो.
  • या विमानात बसून राष्ट्राध्यक्ष संरक्षणमंत्री आणि सैन्यातील वरिष्ठ अधिकारी युद्धाच्या किंवा कोणत्याही राष्ट्रीय संकटाच्या वेळी आदेश देऊ शकतात.

हे विमान बॉसियर सिटी येथून संध्याकाळी ५.५६ च्या किनारपट्टीवरून उड्डाण करत होते. विमानाने व्हर्जिनिया-उत्तर कॅरोलिना सीमेजवळ काही वेळ प्रदक्षिणा घातली आणि रात्री १०.०१ वाजता हे विमान जॉइंट बेस अँड्र्यूज येथे उतरले. जवळजवळ चार तासांपेक्षा जास्त वेळ हे विमान उड्डाण करत असल्याने लोकांमध्ये शंका-कुशंका निर्माण होऊन, त्यांना अनामिक भीतीने घेरले.

या विमानाचे वैशिष्ट्य काय?

प्रत्येक ई-४बी विमान ११२ कर्मचाऱ्यांना वाहून नेऊ शकते. या विमानाची उड्डाण श्रेणी ७,००० मैलांपेक्षा जास्त आहे. अमेरिकन लष्करी विमानांमध्ये या विमानाला विशेष महत्त्व आहे. हे विमान आण्विक स्फोट, सायबर धोके व इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) यांसारख्या युद्धाच्या विविध स्वरूपांना तोंड देऊ शकते. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, हे विमान आण्विक स्फोटांपासून संरक्षण करू शकते. विमानात जवळजवळ ६७ सॅटेलाइट डिश आणि अँटेना आहेत. त्यामुळे ते अँटेना वापरून जगाच्या कोणत्याही भागाशी संपर्क राखू शकते. या विमानाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात हवेतच इंधन भरण्याची सोय आहे. त्यामुळे इतर विमानांच्या तुलनेत हे विमान जास्त काळ हवेत राहू शकते. हे विमान जवळपास ३५ तास उड्डाण करू शकते.

विमानाच्या आतील भागात १८ पलंग, बैठकांसाठी एक खोली, समन्वय व चर्चेसाठी क्षेत्रे, तसेच कमांड स्पेस आणि विश्रांतीसाठीही एक जागा आहे. मोठ्या घटनांदरम्यान ई-४बी चा वापर केला गेला आहे. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अशाच विमानातून उड्डाण केले होते आणि १९९५ मध्ये फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (फेमा)च्या अधिकाऱ्यांनी ओपल चक्रीवादळाच्या वेळी एकाच विमानातून प्रवास केला होता. या विमानाला बहुतांश वेळा अमेरिकेशी संबंधित गंभीर घटनेचे संकेत म्हणून पाहिले आहे. काहींचा असा अंदाज आहे की, पश्चिम आशियात दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाच्या वाढत्या भीतीमुळे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा चिंतेची बाब म्हणून या विमानाच्या उड्डाणाकडे पाहिले जात आहे.

अमेरिका युद्धाची तयारी करत आहे का?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आणि इस्रायलच्या लष्करी हालचालींना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. त्याचदरम्यान हे विमान आकाशात दिसल्याने तर्क केले जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत आणि असा इशारा दिला आहे की, अमेरिकेने लष्करी कारवाई केल्यास त्यांना कधीही भरून न निघणारे नुकसान सोसावे लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर खामेनी यांनी हे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींना इशारा दिला की, अमेरिकेला त्यांच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका या युद्धात मोठी भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे. मुख्य म्हणजे या प्रदेशात अधिक अमेरिकन लढाऊ विमाने आणि युद्धनौकादेखील तैनात करण्यात आल्या आहेत. एका अमेरिकन सरकारी अधिकाऱ्याने ‘असोसिएटेड प्रेस’ला माहिती दिली की, सध्या अमेरिकेची चर्चेत कोणतीही भूमिका नाही; पण ही भूमिका बदलू शकते