Viral Posts Man warns of ‘dangerous’ palm oil in Kurkure in Delhi vs Bengaluru: “तेच कुरकुरे, पण दोन शहरे आणि दोन वेगळे जिन्नस!” एका सोशल मीडिया पोस्टने दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये विकल्या जाणाऱ्या कुरकुरे या खाद्यपदार्थाबद्दल मोठाच प्रश्न उभा केला आहे. दिल्लीकरांच्या हातात आलेल्या पाकिटात पामोलीन तेलासारखा आरोग्याला धोकादायक घटक असल्याचा आरोप आहे, तर बेंगळुरूकरांच्या पाकिटात तोच जिन्नस नसल्याचं दिसून आलं. स्वस्ताईमुळे उद्योगात सर्वाधिक वापरलं जाणारं हे तेल हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांचं निमित्त ठरू शकतं, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. ग्राहकांच्या नजरेतून सुटलेल्या या ‘तेलकट’ गोंधळाने केवळ कुरकुरेच नव्हे, तर संपूर्ण खाद्य उद्योगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, एका व्यक्तीने असा आरोप केलाय की, पेप्सीको इंडियाचा लोकप्रिय खाद्यपदार्थ कुरकुरे (Kurkure) दोन शहरांमध्ये अगदी वेगवेगळे जिन्नस वापरून तयार केले जातात. त्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील कुरकुरेमध्ये धोकादायक पामोलीन तेल (पाम तेल) वापरले जाते, तर बेंगळुरूमधील पाकिटात ते नाही. त्याने अधोरेखित केले की, पामोलीन हे सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक प्रक्रियायुक्त तेलांपैकी एक असून त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. लिंक्डइनवरील एका व्हायरल पोस्टमध्ये ओला इलेक्ट्रिकचे माजी मार्केटर वेदांत खंडुजा यांनी लिहिले, “तेच कुरकुरे. दोन शहरे. पण जिन्नस वेगवेगळं. दिल्लीतील लोक काहीतरी धोकादायक खात असतील.”
खंडुजांनी सांगितले की, त्यांनी दोन्ही शहरांतून कुरकुरे विकत घेतले आणि लक्षात आले की, बेंगळुरूमधील पाकिटात पामोलीन नव्हते, पण दिल्लीतील पाकिटात ते होते. “मी कुरकुरेचं लेबल वाचलं, तिथं ‘पामोलीन’ नव्हतं. पण दिल्लीला परत गेल्यावर मी पुन्हा विकत घेतलं. यावेळी पाकिटावर स्पष्टपणे पामोलीन लिहिलेलं होतं,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या कथित पद्धतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी प्रश्न विचारला की, “बेंगळुरूला जर ‘चांगले’ कुरकुरे मिळत असतील, तर दिल्लीला का नाही? सर्वत्र का नाही?”
खंडुजा म्हणतात, हा फक्त एका खाद्यपदार्थाबद्दलचा मुद्दा नाही, तर “न्याय, पारदर्शकता आणि ब्रँड्सना जबाबदार धरण्याचा” आहे. वेदांत खंडुजांनी इन्फ्लुएंसर फूड फार्मर (रेवंत हिमातसिंका) यांच्या #LabelPadhegaIndia या मोहिमेचं कौतुक केलं आणि सांगितलं की कुरकुरे बाबतचा त्यांचा अनुभव “हेच दाखवतो की, पाकिटाच्या मागच्या बाजूवर खरी माहिती लिहिलेली असते, तर पुढची बाजू फक्त तात्काळ समाधान विकते.”
PepsiCo ची प्रतिक्रिया?
पेप्सीको इंडियाने वेदांत खंडुजांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांच्या मते, ऑगस्टनंतर तयार होणाऱ्या सर्व कुरकुरेच्या बॅचमधून पामोलीन तेल काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे खंडुजांना दिसलेला फरक हा बहुधा जुन्या स्टॉकमुळे असावा जो अजूनही बाजारात उपलब्ध आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
नेटिझन्सनी या प्रकरणावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्ते दोन शहरांमधील घटकांतील फरक पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि उत्पादकांना जबाबदार धरण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. एका वापरकर्त्याने म्हटलं, “अगदी खरं आहे, वेदांत! हा गंभीर मुद्दा आहे आणि उत्पादकांना यासाठी जबाबदार धरायलाच हवं.” तर, दुसऱ्याने म्हटलं आहे की, “खूप महत्त्वपूर्ण निरीक्षण आहे. प्रत्येक ग्राहकाला समान दर्जा आणि न्याय मिळालाच पाहिजे.” एका वापरकर्त्याने विनोद करत लिहिलं आहे की, “दिल्लीकर विषारी हवेत जगू शकतात … नॉन पामोलीन तेल पुरेसं ठरेल का याची मला शंका आहे.” मात्र, एका वापरकर्त्याने सुचवलं की, हे कदाचित ब्रँडशी संबंधित असू शकतं. त्याच्या म्हणण्यानुसार, “पेप्सीको वेगवेगळ्या ब्रँड नावाखाली कुरकुरे विकतं.” त्यानी स्पष्ट केलं की,
- १. कुरकुरे: स्थानिक किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असलेला स्वस्त प्रकार आहे. (हा प्रकार दिल्लीमध्ये सहज उपलब्ध असतो).
- २. लेहर कुरकुरे: याची एमआरपी साधारणपणे इतर प्रकारांपेक्षा २०% जास्त असते. हा प्रकार प्रीमियम रिटेलर किंवा जास्त गर्दीच्या ठिकाणी जसे मेट्रो/रेल्वे स्थानकं, मॉल किऑस्क इत्यादी ठिकाणी विकला जातो.
दरम्यान, एका वापरकर्त्याने सांगितलं की, त्यांनाही अशाच प्रकारचा अनुभव एका वेगळ्या ब्रँडच्या बाबतीत आला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मी रिअल ज्यूसमध्ये जिन्नसांच्या बाबतीत फरक पाहिला आहे. उत्पादनाच्या ऑनलाइन अॅपवरील जाहिरातीत जे लिहिलं आहे ते आणि प्रत्यक्षात आपल्याला जे मिळतं ते एकसारखं नसतं.”
एका दुसऱ्या वापरकर्त्याने पर्यायी खाद्यपदार्थांकडे वळणं हेच योग्य असल्याचं सुचवलं. त्यांनी लिहिलं, “मी पाम तेल आणि मैदामुक्त स्नॅक्सकडे वळलो आहे. असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, फक्त थोडे महाग आहेत. पण आपण ग्राहक म्हणून त्यांचा वापर थांबवला, तर कंपन्याही ते विकणं थांबवतील.”
पाम तेलाचा वापर का टाळावा?
बिस्किटं, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, बेकरी प्रॉडक्ट्स, टूथपेस्ट, साबण ते अगदी बायोडिझेलपर्यंत सर्वत्र पाम तेलाचा वापर होतो. पण, हे तेल जितकं सर्वव्यापी झालं आहे, तितकंच त्यामागचं वास्तव चिंताजनक आहे.
१. आरोग्यावर परिणाम
पाम तेलात सॅच्युरेटेड फॅट खूप जास्त असतं. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) वाढतं, चांगलं कोलेस्टेरॉल (HDL) कमी होतं. दीर्घकाळ पाम तेल खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका, ब्लॉकेज, स्ट्रोक यांचा धोका वाढतो.
ट्रान्स फॅट्स: पाम तेल रिफाइन्ड करण्यासाठी उच्च तापमान वापरलं जातं. त्यामुळे त्यात ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे शरीरासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनानुसार, पाम तेल असलेले पदार्थ जास्त खाणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जास्त दिसते.
२. पर्यावरणावर परिणाम
पाम तेल हे केवळ आरोग्यासाठी नव्हे तर पर्यावरणासाठीही धोकादायक आहे. पाम तेलाच्या लागवडीसाठी इंडोनेशिया, मलेशिया, आफ्रिका या भागातील पावसाळी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होते. ओरांगुटान, बोर्नियो हत्ती, सुमात्रन वाघ यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचं नैसर्गिक घर पाम तेला साठीच्या लागवडीमुळे नष्ट होतं. जंगलं तोडल्यामुळे कार्बन डायऑक्साइडचं शोषण कमी होतं आणि वातावरणात हरितगृह वायू वाढतात. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल गंभीर होतात.
३. सामाजिक व आर्थिक परिणाम
पाम तेल उद्योगासाठी मोठ्या कंपन्या स्थानिक शेतकरी, आदिवासी यांची शेतजमीन ताब्यात करतात. त्यामुळे विस्थापन आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. पाम तेलाशी संबंधित लागवडीच्या बागांमध्ये कामगारांना कमी मजुरी, कामाचे अधिक तास आणि कधी कधी बालमजुरीही आढळते. फक्त हेच पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता घटते आणि स्थानिक अन्नधान्य पिकांचं उत्पादन कमी होतं.
४. ग्राहकांचा गोंधळ
पाम तेल स्वस्त असल्यामुळे कंपन्या ते मोठ्या प्रमाणावर वापरतात. पण पॅकेजिंगवर ते व्हेजिटेबल ऑइल असं लिहितात. त्यामुळे ग्राहकांना ते पाम तेल आहे हे कळतच नाही.
पाम तेलाचं आकर्षण हे त्याच्या स्वस्ताईत आहे. पण त्याची किंमत आपल्याला आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्यायाच्या स्वरूपात खूप महाग मोजावी लागते. म्हणूनच आहारात शक्य तितकं पाम तेल टाळणं, स्थानिक व आरोग्यदायी तेलांचा वापर करणं हेच शहाणपणाचं ठरतं.