scorecardresearch

Premium

विश्लेषण: लोणार सरोवराला ‘पर्यटन विकासा’चा धोका?

लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे सरोवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवराचा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला.

lonar lake vishleshan
विश्लेषण: लोणार सरोवराला ‘पर्यटन विकासा’चा धोका?

राखी चव्हाण

लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे सरोवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवराचा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यापैकी १५ मंदिरे विवरातच आहेत. मात्र, अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटनाला प्राधान्य दिल्याने त्याच्या जतन आणि संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

water discharge from Chandoli
सांगली : चांदोलीतून विसर्ग वाढवला, सतर्कतेचा इशारा
swaminathan
भारतीय कृषी क्रांतिकारक
pune municipal corporation, ganesh visarjan pune 2023, ganeshotsav pune 2023, lifeguards appointed by pmc at visarjan ghats
गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी; विसर्जन घाटांवर जीवरक्षक तैनात
barsu Carvings
बारसूमधील कातळशिल्पे संरक्षित यादीतून वगळली; कशेळीमधील कातळशिल्पांना ‘राज्य संरक्षित स्मारका’चा मान

लोणार सरोवर कशामुळे बुजते आहे?

वनखात्याने पिसाळ बाभूळची हजारो झाडे काढून टाकताना त्यांची मुळे खोदून काढली. त्यामुळे त्याभोवतीची हजारो क्युबिक मीटर माती पावसाच्या पाण्यासह सरोवरात जाऊन स्थिरावली. सरोवराच्या काठावर वृक्षारोपणासाठी हजारो खड्डे करण्यात आले. त्याचीही माती सरोवरात स्थिरावली. या सरोवराभोवती कच्चा रस्ता आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी वनखात्याने टाकलेला निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रित मुरूमही पावसाच्या पाण्याबरोबर सरोवरास जाऊन मिळाला. त्यामुळे सरोवराची खोली कमी होऊन ते उथळ झाले.

सरोवराच्या संवर्धनासाठी निर्देश काय?

सरोवराच्या काठावर म्हणजेच ‘रिम’वर कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करू नये असे वारंवार निर्देश असतानाही वनखात्याकडून पर्यटनासाठी सातत्याने येथे खोदकाम, बांधकाम केले जात आहे. सरोवराचे संवर्धन महत्त्वाचे आहे आणि क्षतिप्रतिबंध महत्त्वाचा आहे. येथे ‘पर्यटन वाढीकरिता विकास कामे’ महत्त्वाची नसून ‘सरोवराचे नैसर्गिक वैशिष्टय़ जपणे’ आवश्यक आहे. मात्र, या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

विकासनिधीतून संवर्धनही होणारच ना?

महाराष्ट्र शासनाने नुकताच ३६९ कोटी रुपयांचा लोणार विकास आराखडा मंजूर केला. यात लोणार सरोवर संवर्धन आणि सरोवर परिसरात असणारे मंदिर, स्मारक यांच्यासाठी किती निधी आहे, हे कुणालाच ठाऊक नाही. हा आराखडा राबवताना तज्ज्ञांना सामावून घेतले आहे का, हेही माहिती नाही. त्यामुळे विकासाची ही दिशा सरोवराची हानी करणारी नसावी, असेही येथील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आता नवा धोका कोणता?

जुन्या विश्रांतीगृहापासून तर रामगया मंदिरापर्यंत पायऱ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सुमारे पाच लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे ‘बेसॉल्ट’ खडकातील हे सरोवर तयार झाले. त्याची धूप, क्षती होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाने ‘लोणार सरोवर क्षतिप्रतिबंध व संवर्धन समिती’ स्थापन केली होती. मात्र ज्या गतीने येथे विकास कामे होत आहेत, ती पाहता या समितीच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह आहे. येथे असलेला खडक/ मातीचा भाग संशोधक आणि अभ्यासकांसाठी महत्त्वाचा आहे. हाच खडक फोडून त्याच्या दगडांपासून पायऱ्या तयार केल्या जात आहेत! सरोवराच्या रिमवर जेसीबी लावून खड्डे करण्यात आल्यामुळे संशोधनासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘इजेक्टा ब्लँकेट’चा भाग नाहीसा होत आहे.

वैशिष्टय़ लोप पावणार का?

भौगोलिकदृष्टय़ा लोणार सरोवराला खूप महत्त्व आहे. लोणार हे जगाच्या पाठीवर जी काही मोजकी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे आहेत त्यापैकी बेसाल्ट पृष्ठभागावर काळाच्या ओघात हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले एकमेव मोठे आघाती विवर आहे. सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरील उल्कापिंडाच्या आघातामुळे या तलावाची निर्मिती असल्याचे मानले जाते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे या तलावाचे पाणी खार आणि क्षारीय आहे, जे एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. या पाण्याचा पीएच १०.५ इतका जास्त असल्याने यात कोणताही सजीव प्राणी जगू शकत नव्हता. अपवाद फक्त काही शेवाळवर्गीय वनस्पतींचा. मात्र, हे वैशिष्टय़ही लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. लोणार सरोवर हे प्राचीन काळी पंचाप्सर सरोवर म्हणून ओळखले जात होते. याला कारण म्हणजे या सरोवराभोवती पाच बारमाही प्रवाहित असणारे जिवंत झरे आहेत. गायमुख धार, ब्रह्मकुंड, पापहरेश्वर, सितान्हानी आणि रामगया हे ते झरे आहेत.

परिसरातील मंदिरांचीही भाविकांना चिंता कशाने?

सरोवराच्या काठावर ११-१२व्या शतकातील मंदिरे आहेत. पैकी बगीचा महादेव मंदिर, अंबरखाना महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर पूर्णपणे पाण्यात गेले आहे. कधी नाही ते कमळजा माता मंदिरही एका बाजूने पाण्याने वेढले आहे. त्यामुळे या मंदिरांनाही धोका निर्माण झाल्याच्या चिंतेने भाविकांना ग्रासले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vishleshan threat of tourism development to lonar lake print exp 0923 ysh

First published on: 30-09-2023 at 04:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×