पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी राफेल विमानांचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे. राफेल विमाने आणि त्याबरोबर स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बचा वापर यासाठी केल्याची शक्यता आहे. अचूक हल्ला आणि दीर्घ पल्ला यासाठी ही आयुधे ओळखली जातात.

असाधारण मोहीम, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी राफेल विमानांचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे. राफेल विमाने आणि त्याबरोबर स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बचा वापर यासाठी केल्याची शक्यता आहे. अचूक हल्ला आणि दीर्घ पल्ला यासाठी ही आयुधे ओळखली जातात. बालाकोट हवाई हल्ल्यावेळी भारताने मिराज-२००० या विमानांचा वापर केला होता. दहशतवाद्यांचे तळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राचा आणि लक्ष्यभेद करून परिणामकारकता साधण्याचा विचार केला, तर फ्रान्सच्याच राफेल विमानांचा वापर झाल्याची शक्यता अधिक आहे. यावर संरक्षण दलांकडून लवकरच स्पष्टीकरण येण्याची अपेक्षा आहे.

स्कॅल्प क्षेपणास्त्रे

स्कॅल्प क्षेपणास्त्रांना स्टॉर्म शॅडो असेदेखील संबोधले जाते. हवेतून हे क्षेपणास्त्र डागले जाते. शत्रूला चकवा देऊन (स्टेल्थ) मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्रांची ओळख आहे. रात्री आणि सर्व प्रकारच्या वातावरणात या क्षेपणास्त्रांचा वापर शक्य असल्याने विविध देशांची संरक्षण दले या क्षेपणास्त्राला पसंती देतात. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ३०० किलोमीटर असून, युरोपीय संघाच्या एमबीडीए या बहुराष्ट्रीय कंपनीने याची निर्मिती केली आहे. बंकर उद्ध्वस्त करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे योग्य मानली जातात. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील लक्ष्यभेद करण्यासाठी हे अस्त्र प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

हॅमर बॉम्ब

हायली अॅजाइल मॉड्युलर म्युनिशन एक्स्टेंडेड रेंज (हॅमर) बॉम्ब हे हवेतून जमिनीवर अचूकतेने मारा करू शकतात. ग्लाइड बॉम्ब म्हणूनही त्यांना ओळखले जाते. ७० किलोमीटरपर्यंत हे बॉम्ब मारा करू शकतात. फ्रान्सच्या सॅफ्रन कंपनीने हे बॉम्ब तयार केले आहेत. कमी उंचावरूनही हे बॉम्ब डागले जाऊ शकतात. या बॉम्बना टिपणे अतिशय कठीण असते आणि हे बॉम्ब लक्ष्याचा अचूक वेध घेऊन कठीण असे संरक्षक कवच भेदू शकतात. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी त्यामुळेच या बॉम्बचा वापर उचित ठरतो.

राफेल विमाने

फ्रान्सकडून घेण्यात आलेली राफेल विमाने बहुउद्देशीय म्हणून ओळखली जातात. हवाई सुरक्षा, टेहळणी, जमिनीवर अचूक हल्ला, जहाजविरोधी हल्ला, अणुहल्ला करण्याचीही या विमानांची क्षमता आहे. एकाच वेळी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवरही ही विमाने मारा करू शकतात. एक आणि दोन सीटच्या प्रकारांत ही विमाने उपलब्ध आहेत. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी लढा, लिबिया, माली, मध्य आफ्रिका अशा ठिकाणी ही विमाने वापरली गेली आहेत. भारताच्या हवाई दलाचे सामर्थ्य या विमानांनी वाढले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी लढाऊ विमानांची गरज

भारताने सागरी राफेल विमानांच्या खरेदीचा करार नुकताच केला. यामुळे नौदलाच्या हवाई शक्तीला बळ मिळाले असले, तरी हवाई दलामध्ये लढाऊ विमानांची तातडीने गरज आहे. चीन आणि पाकिस्तानचे आव्हान पाहता आणि पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाचा अवलंब केलेला पाहता युद्धाची व्याप्ती वाढली, तर त्याला तोंड देण्यासाठी हवाई दलाच्या लढाऊ स्क्वाड्रन्सची संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे. हवाई दलाच्या ४२ लढाऊ स्क्वाड्रन्सना मंजुरी आहे. मात्र, ही संख्या आता ३१ स्क्वाड्रन्सवर आली आहे.