रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी (२२ मार्च) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ११५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट – खोरासन या गटाने घेतली आहे. तसेच रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेकडे याचे पुष्टीकरण करणारी गुप्त माहितीसुद्धा आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या प्रकरणी ११ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये चार संशयित हल्लेखोरांचाही समावेश आहे. दरम्यान, ज्या इस्लामिक स्टेट- खोरासन गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली, तो गट नेमका काय आहे? हा गटाचा उदय नेमका कसा झाला? याविषयी जाणून घेऊ या.
हेही वाचा – कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?
इस्लामिक स्टेट-खोरासन गटाचा उदय कधी झाला?
इस्लामिक स्टेट खोरासान हा गट २०१४ मध्ये अफगाणिस्तानमध्ये उदयास आला. इस्लामिक स्टेटच्या (ISIS) सर्व सक्रिय संघटनांपैकी एक असलेली ही संघटना आहे. खोरासान हा एक असा प्रदेश आहे, जिथे खिलाफत चळवळ उभी राहिली होती. त्यामध्ये अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान व टर्कीचा काही भाग यांचा समावेश होतो. ‘अल जझिरा’च्या वृत्तानुसार, २०१४ नंतर अफगाणिस्तानमधील तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) या संघटनेतून बाहेर पडत अनेक दहशतवाद्यांनी इस्लामिक स्टेट खोरासानमध्ये प्रवेश केला. या संघटनेने आतापर्यंत क्रूरतेच्या अनेक सीमा ओलांडल्या आहेत. तसेच २०१८ नंतर या संघटनेच्या सदस्यांची संख्या कमी होत आहे.
या गटाने आतापर्यंत कोणत्या ठिकाणी हल्ले केले?
२०१४ मध्ये उदयास आल्यानंतर या गटाने अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यामध्ये २०२१ साली काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे. या हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिक आणि १७५ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय २०२२ साली या गटाने काबूलमधील रशियन दूतावासावरही हल्ला होता. तसेच २०२४ मध्ये इराणमधील दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातही या गटाचा सहभाग होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा – निमित्त अरविंद केजरीवाल यांचे, चर्चा ३०० वर्षांपूर्वीच्या दिल्लीतील दारुबंदीची, काय घडलं नेमकं तेव्हा?
रशियावरील हल्ल्यामागचे संभाव्य कारण काय?
इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला करून रशियाशी असलेले शत्रुत्व अधोरेखित केले आहे. रशियाला लक्ष्य करण्याचे कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लष्करी हस्तक्षेपाशी संबंधित असू शकते. तसेच रशियाला मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश म्हणून इस्लामिक स्टेट हा गट पाहत असल्याचे कारण सांगितले जात आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी सीरियामध्ये हस्तक्षेप केला होता. सीरियाचे अध्यक्ष बाशर असाद यांच्या मदतीसाठी व्लादिमीर पुतिन यांनी काही रशियन सैन्य पाठविले होते. त्यामुळे इस्लामिक स्टेट ग्रुपने रशियाच्या कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबरोबरच व्लादिमीर पुतिन यांनी सीरियासाठी जे धोरण राबविले, त्याला विरोध म्हणून रशियावर दहशतवादी हल्ला केला असण्याची शक्यता आहे.