Osama bin Laden Abbottabad आसिफ अली झरदारी यांच्या २००८ ते २०१३ या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळावर त्यांचे निकटवर्तीय आणि प्रवक्ते फरहातुल्ला बाबर यांनी एक पुस्तक लिहिले असून अलीकडेच त्याचे प्रकाशन पार पडले. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर जगभर झालेल्या पाकिस्तानच्या नाचक्कीवर त्यात प्रकाश टाकला आहे. अमेरिकेच्या त्या कारवाईने पाकिस्तानचे नाकच कापले गेले होते. त्यावेळेस नेमके काय घडले याचा आढावा या पुस्तकामध्ये आहे, त्याविषयी…

पाकिस्तानला कानोकान खबरही नव्हती

वेगवान कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन नौदलाच्या सील्सने चौदा वर्षांपूर्वी २ मे २०११ रोजी,पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील लष्करी छावणीत एक धाडसी कारवाई केली. अल- काईदाचा संस्थापक आणि जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्थान घालून त्याचा मृतदेह घेऊन ते तेथून सहिसलामत निसटलेदेखील. आणि हे सारे घडले त्याची कानोकान खबरही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना लागली नाही, हे विशेष! ओसामा बिन लादेन अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये आश्रयास होता, हे जगाला कळल्यानंतर पाकिस्तानमध्ये काय घडले? पाकिस्तानच्या नेतृत्वावर, लष्करावर आणि गुप्तचर यंत्रणांवर याचा किती गंभीर परिणाम झाला, याचा शोधही तेवढाच महत्त्वाचा आहे.

अपमानास्पद नाचक्की

आसिफ अली झरदारी यांच्या २००८ ते २०१३ या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळावर नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात, त्यांचे निकटवर्तीय आणि प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी म्हटले आहे की, ओसामाच्या हत्येनंतर पाकिस्तानला देशात आणि बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अपमानास्पद नाचक्कीला सामोरे जावे लागले.

नाऊ इट मस्ट बी टोल्ड

‘द झरदारी प्रेसिडेन्सी: नाऊ इट मस्ट बी टोल्ड’ (The Zardari Presidency: Now It Must Be Told) या शीर्षकाचे हे पुस्तक रूपा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. यात अबोटाबादमधील अमेरिकेच्या कारवाईचे तब्बल ५० पानांमध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर त्यानंतर पाकिस्तानला बसलेला जबर धक्का, निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेलाच झालेला लकवा या साऱ्याचा उल्लेख पुस्तकात आहे. अल-काईदाचा संस्थापक ओसामा अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या विमान अपहरण आणि आत्मघाती हल्ल्यांचा सूत्रधार होता, त्या दहशतवादी हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.

अस्वस्थ करणारे लज्जास्पद वास्तव

ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या नेव्ही सील्सने कंठस्थान घातल्यानंतरच्या ४० मिनिटांमध्ये इस्लामाबादमध्ये नेमके काय घडले याचे तपशीलवार वर्णन बाबर यांनी केले आहे. त्यावेळेस खरे तर प्रत्यक्षात सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग-क्यू (पीएमएल-क्यू) यांच्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू होता. त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे, “एका बाजूला अबोटाबादमध्ये अमेरिकेची धडक धाडसी कारवाई सुरू होती, त्यावेळेस पाकिस्तानातील राजकारणी मात्र सत्तेच्या वाटपावरून भांडत होते आणि पलीकडे संरक्षण यंत्रणाही अनभिज्ञच होती. एकूण हे वास्तव अत्यंत अस्वस्थ करणारे आणि लज्जास्पद होते, त्यामुळे एकाच वेळेस निराशा आणि भीतीही दाटून आली होती”

पाकिस्तान तोंडावरच आपटला

अबोटाबादवरील हल्ल्याची ‘धक्कादायक बातमी’ कळताच, सकाळी ६.३० वाजता राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली, त्यात तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार, परराष्ट्र सचिव सलमान बशीर आणि प्रस्तुत लेखकही उपस्थित होते. बाबर आठवण करून देतात… “गेल्या दशकापासून ओसामाबद्दलची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही, असे पाकिस्तान सातत्याने सांगत होता आणि या हल्ल्यानंतर मात्र थेट तोंडावरच आपटल्यासारखी स्थिती झाली होती…”

आयएसआयवर कारवाई व्हायला हवी होती…

माहिती देताना पुढे बाबर म्हणतात, ९० मिनिटांच्या बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी त्यांच्याकडे परिस्थितीबद्दल विचारणा केली. राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, बाबर यांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती. “अक्षम्य… दुसरे काहीही नाही… तत्काळ चौकशीचे आदेश दिले पाहिजेत. लष्कर आणि आयएसआय (इंटर-सर्विसेस इंटेलिजन्स, पाकिस्तानची लष्करी गुप्तचर संस्था) प्रमुखांवर काहीतरी कारवाई झाल्याचे प्रत्यक्षात दिसले पाहिजे,”

पाकिस्तान कात्रीत सापडला होता

अबोटाबादवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान कात्रीत सापडला होता, असे बाबर यांचे मत होते. “पाकिस्तानला ना या कारवाईचे श्रेय घेता आले, ना गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची आणि लष्कराच्या गोपनीय वार्ता संकलनाच्या अपयशाची कबुली देता आली. ही केवळ अक्षम्य अशी बाब होती” अमेरिकेच्या हल्ल्यावर पाकिस्तानला अधिकृत प्रतिक्रिया देण्यासाठी तब्बल १४ तास लागले. आणि त्यावर बाबर यांची प्रतिक्रिया अशी होती की, “अमेरिकेशी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण झाल्यामुळेच हे शक्य झाले, हा अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील दावा पोकळ आणि न पटणारा होता. खोटेपणाचे आणि फसवणुकीचे जाळे पुरते उघडे पडले होते.”

पाकिस्तानने कारवाई टाळली

ओसामाच्या प्रकरणामुळे पाकिस्तानला खरे तर गुप्तचर यंत्रणेत सुधारणा करण्याची आयती संधी मिळाली होती पण राष्ट्राध्यक्ष झरदारी यांचे मात्र असे मत होते की, चौकशी आयोग नेमावा, पण तोही कोणालाही शिक्षा करण्याच्या उद्देशाने नव्हे तर फक्त चौकशीच्याच उद्देशाने. या घटनेस जबाबदार कोण हे ठरविण्याची मागणी राष्ट्राध्यक्षांनी फेटाळली होती. बाबर पुढे म्हणतात की, झरदारी यांनी त्यांना सांगितले की ९/११ चा हल्ला आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतरच्या दोन्ही चौकशी अहवालांमध्ये व्यक्तींना शिक्षा करण्याऐवजी कार्यपद्धती आणि प्रणाली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. बाबर सांगतात की, झरदारी यांनी त्यांना त्यावेळेस सांगितले होते की, एका ‘महत्त्वाच्या देशाने’ (नाव न घेता) लष्करी जनरल्सवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नका, असा स्पष्ट सल्लाच दिला होता.

कुणालाच काहीच करायचे नव्हते!

अबोटाबाद प्रकरणाचा निष्कर्ष नोंदवताना बाबर म्हणतात, “ओसामाच्या प्रकरणानंतर गुप्तचर यंत्रणेची कोणतीही चौकशी, जबाबदारी निश्चिती किंवा पुनर्रचना होणार नव्हती. प्रशासकीय नेतृत्वाने माघारच घेतली होती, त्यांना काहीच करायचे नव्हते. आणि लष्करी नेतृत्वाला आपली प्रतिष्ठा जपायची होती म्हणून त्यांनाही ते नकोच होते. काही इतर राष्ट्रांनाही ते नकोच होते, असा दावा करण्यात आला. आणि गुप्तचर यंत्रणेत सुधारणा करण्याची संधी गमावली…”

पाकिस्तानला हमी मिळालीच नाही

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला मात्र त्याचवेळेस, ते स्वतः कारणीभूत नसलेला सावळागोंधळ निस्तरण्याचे गुंतागुंतीचे आव्हान पेलावे लागले. अबोटाबादमधील घटनेनंतर अमेरिकेकडून झालेल्या उच्चस्तरीय भेटींमुळे पाकिस्तानात अस्वस्थता निर्माण झाली होती या भेटी देणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आणि सिनेटर जॉन केरी यांच्या भेटींचा समावेश होता, २७ मे २०११ रोजी क्लिंटन यांच्या भेटीनंतर, पाकिस्तानला अशी हमी हवी होती की, अबोटाबादवरील हल्ल्यांचा वापर भविष्यात एकतर्फी हल्ल्यांसाठीचा पायंडा म्हणून केला जाणार नाही. तथापि, अशी कोणतीही हमी पाकिस्तानला मिळाली नाही.

ओसामाच्या पत्नी पाकिस्तानच्याच ताब्यात होत्या

या पुस्तकात इतर काही गौप्यस्फोटही आहेत. उदाहरणार्थ, ओसामाचे लपण्याचे ठिकाण आणि इतर सुरक्षित घरे बांधणाऱ्या कंत्राटदाराची ओळख यासारख्या तपशीलांची अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला माहिती होती. क्लिंटन यांच्या भेटीनंतर, सीआयएच्या पथकाने लष्करी छावणीतील ओसामाच्या पत्नींची भेट घेतली आणि ओसामाच्या मृत्यूनंतर त्या पाकिस्तानी तपास यंत्रणांच्या ताब्यात होत्या, हेही या पुस्तकात उघड झाले आहे.

पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या बाबर यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या १९८८ ते १९९० या पहिल्या कार्यकाळात त्यांची भाषणे लिहिण्याचे काम केले. तर १९९३ ते १९९६ या भुट्टो यांच्या दुसऱ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात बाबर यांनी त्यांचे प्रवक्ते म्हणूनही काम पाहिले, मात्र २००७ मध्ये हत्या झाली होती. हे पुस्तक पाकिस्तानातील राजकारणावर एक जळजळीत प्रकाश टाकणारे आहे.