What is Autoimmune Diseases : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. वायुप्रदूषण घातक ठरत असल्याने नागरिकांनी आरोग्याची नियमित तपासणी करायला हवी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यादरम्यान भारतातील बहुतांश महिलांना ‘ऑटोइम्युन’ आजारांची लागण होत असल्याचे समोर आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे त्यामध्ये तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. देशातील १० पैकी जवळपास सात महिलांना हा विकार जडला असल्याची माहिती भारतीय संधिवात संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. नेमका काय आहे ऑटोइम्युन आजार? तो नेमका कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे कोणती? त्या संदर्भातील हा आढावा…

‘ऑटोइम्युन’ म्हणजे नेमके काय?

ऑटोइम्युन हा स्वत:च्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे होणारा आजार असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बिघडते आणि ती निरोगी पेशींना बाधित करण्यास सुरुवात करते. परिणामी संधिवात, ल्युपस, सोरायसिस व आतड्यांचा दाह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होते. या आजारांचा परिणाम प्रामुख्याने सांधे, त्वचा, रक्तवाहिन्या, तसेच हृदय आणि फुप्फुस यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर होतो.

महिलांमध्ये ऑटोइम्युनचे प्रमाण का वाढतेय?

भारतीय संधिवात संस्थेच्या ४० व्या परिषदेत महिलांचे आरोग्य आणि ऑटोइम्युन आजारांवर विशेष सत्र घेण्यात आले. या सत्रादरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी या आजारांच्या वाढत्या प्रवृत्तीमागील जैविक आणि सामाजिक कारणेही स्पष्ट केली. नवी दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाच्या संधिवात विभागाच्या प्रमुख डॉ. उमा कुमार म्हणाल्या, “पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिकच मजबूत असते. विविध आजारांना तोंड देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती अधिकच प्रभावी ठरते. मात्र, काही वेळा हीच प्रणाली गोंधळते आणि महिलांच्या शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला करते. त्यामुळेच ऑटोइम्युन आजारांची लागण होण्याचा धोका निर्माण होतो.”

आणखी वाचा : Skin Cancer : त्वचेच्या कॅन्सरचा धोका ‘या’ गोळीने होणार कमी? तज्ज्ञांचा दावा आणि संशोधन काय सांगतं? 

ऑटोइम्युन आजारांबाबत आरोग्य तज्ज्ञ काय म्हणाले?

डॉक्टरांनी या आजारांच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे जैविक आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे असल्याचे अधोरेखित केले आहे. जागरूकता आणि जीवनशैलीतील सुधारणा यांमुळे या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या ऑटोइम्युन आजारांच्या वाढत्या प्रमाणामागे जैविक कारणही असू शकते, असा निष्कर्ष स्टॅनफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी अलीकडील अभ्यासातून काढला आहे. या संशोधनानुसार, महिलांच्या शरीरातील ‘X’ गुणसूत्राचे नियमन करण्यासाठी ‘Xist RNA’ नावाचा एक रेणू तयार होतो. कधी कधी हा रेणू रोगप्रतिकारक शक्तीला गोंधळात टाकून शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला करण्यास प्रवृत्त करतो. परिणामी ऑटोइम्युन आजारांची लागण होते.

ऑटोइम्युन आजारांमुळे जीवाला धोका?

ऑटोइम्युन आजारांची लागण झाल्यानंतर वेळीच उपचार न घेतल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. फोर्टिस रुग्णालयाचे संधिवात विभागप्रमुख डॉ. बिमलेश धर पांडे म्हणाले, “माझ्या रुग्णालयात येणाऱ्या बहुतेक महिला अनेक वर्षे सांधेदुखी, सूज किंवा सतत थकवा यांसारख्या समस्यांनी त्रस्त असतात. उपचारासाठी येईपर्यंत त्यांच्या शरीरातील अवयवांचे किंवा सांध्यांचे आधीच मोठे नुकसान झालेले असते. त्यामुळे या आजारांची लक्षणे जाणवल्यास वेळीस तपासणी आणि त्यावर उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

ऑटोइम्युन आजारांमुळे अपंगत्वाची शक्यता

सर गंगाराम रुग्णालयातील संधिवात विभागाचे उपाध्यक्ष डॉ. नीरज जैन यांनीही या चिंतेला दुजोरा दिला. त्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांनाही महिलांमध्ये वाढत्या संवेदनशीलतेसाठी जबाबदार धरले. डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ पुलिन गुप्ता म्हणाले, “भारतातील अनेक महिलांना ऑटोइम्युन आजारांची लागण कळत नसल्याने त्या वर्षानुवर्षे चुकीचे उपचार घेतात. परिणामी योग्य निदान न झाल्याने या आजारांचा धोका वाढतो आणि संबंधित रुग्णाला दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास हे धोके टाळता येऊ शकतात. त्यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.”

हेही वाचा : Breast Cancer : तरुणींमध्ये झपाट्याने वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; काय आहेत कारणं? तज्ज्ञ काय सांगतात?

या आजारांकडे महिलांचं का होतेय दुर्लक्ष?

भारतातील महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या ऑटोइम्युन आजारांकडे अजूनही गंभीरतेने पाहिले जात नसल्याची खंत भारतीय संधिवात संघटनेच्या वार्षिक परिषदेत डॉ. रोहिणी हांडा यांनी व्यक्त केली. “ऑटोइम्युन आजार हे मधुमेह किंवा हृदयरोगासारखेच धोकादायक आहेत; परंतु त्यांच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. या आजारांची लागण ७० टक्के महिलांना होत असल्याने तातडीने जनजागृती, संशोधन आणि उपचारांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.”

महिलांना ऑटोइम्युनची लागण कशामुळे होतेय?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या ऑटोइम्युन आजारांसाठी बदलती जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. आनुवंशिकता आणि हार्मोनल बदलांमुळेही या आजारांची लागण होत असल्याचे समोर आले आहे. तासन् तास एका जागेवर बसून काम करणे, अयोग्य आहार, अधिक ताणतणाव, झोपेचा अभाव यांसारख्या गोष्टीही ऑटोइम्युन आजारांसाठी कारणीभूत आहेत. वाढते प्रदूषणदेखील या आजारांची लागण होण्यामागचे मोठे कारण मानले जात आहे. औद्योगिक रसायने, तसेच हवेतील प्रदूषित घटकांमुळे शरीरातील हार्मोन्स आणि रोगप्रतिकारक शक्तीचे संतुलन बिघडते आणि ऑटोइम्युन आजारांचा धोका वाढतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. या आजारांची नियमित तपासणी सुरू झाली, तर त्याचे लवकर निदान होईल आणि अवयवांचे होणारे नुकसान टळेल, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.