scorecardresearch

विश्लेषण : रंगांधळेपणा म्हणजे नेमकं काय? कोणत्या रंगांच्या बाबतीत होतो गोंधळ? यावर उपचार आहेत का?

रंगांधळेपणावर उपचार करणं शक्य आहे का? नेमक्या कोणत्या रंगांच्या बाबतीत समस्या उद्भवू शकते?

color blindness
प्रातिनिधिक छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात दिलेल्या निकालानंतर रंगांधळेपणा या मुद्द्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयानं संदर्भ घेतलेल्या एका अहवालातील निष्कर्ष तर या मुद्द्यावर सर्वांनीच विचार करणं भाग असल्याचं अधोरेखित करतात. या निष्कर्षांनुसार भारतातील तब्बल ८ टक्के पुरूष आणि जवळपास १ टक्के महिलांना रंगांधळेपणाचा त्रास जाणवतो. पण हा नेमका काय प्रकार आहे? ही अडचण नेमकी कोणत्या रंगांच्या बाबतीत जाणवते? आपल्यालाही हा त्रास होऊ शकतो का? रंगांधळेपणावर उपचार आहेत का? अशा अनेक मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण इथे घेणार आहोत…

आत्ताच ही चर्चा का?

सर्वोच्च न्यायालयाने एफटीआयआय अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाविरुद्ध दाद मागणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या बाजूने दिलेल्या निकालामुळे याची चर्चा सुरू झाली. रंगांधळेपणा असणाऱ्या या विद्यार्थ्याला एफटीआयआयने प्रवेश नाकारला होता. मात्र, अशा प्रकारे रंगांधळेपणामुळे संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश न नाकारता आपल्या अभ्यासक्रमातच एफटीआयआयनं बदल करावा, असं न्यायालयानं यावेळी सांगितलं.

न्यायालयानं यावेळी तज्ज्ञ समितीचा अहवाल आधार मानला. “तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशींनुसार सर्व विद्यार्थ्यांना एफटीआयआयच्या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येईल. रंगांधळेपणाचा त्रास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एफटीआयआयने अभ्यासक्रमामध्ये बदल करायला हवा. तसेच, सध्याच्या फिल्म एडिटिंग कोर्समधील कलर ग्रेडिंग पद्धती देखील सक्तीची न करता पर्यायी ठेवावी”, असं देखील न्यायालयानं नमूद केलं आहे.

विश्लेषण: करोना प्रतिबंधक लस दंडावरच का टोचली जाते? जाणून घ्या कारण

रंगांधळेपणा म्हणजे नेमकं काय?

रंगांधळेपणा म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत रंग स्वतंत्रपणे ओळखण्यात येणारी अडचण होय. रंगांधळेपणा असणारी व्यक्ती काही विशिष्ट रंग ओळखण्यात असमर्थ ठरत असते. विशेषत: लाल, हिरवा आणि कधीकधी निळा रंग. आपल्या डोळ्याच्या आत असणाऱ्या रॅटिनामध्ये दोन प्रकारच्या पेशी प्रकाश ओळखण्याचं काम करतात. यापैकी ‘रॉड’ पेशी फिकट आणि गडद रंग ओळखण्याचं काम करतात तर ‘कोन’ पेशींवर रंग ओळखण्याची जबाबदारी असते. कोन पेशी तीन प्रकारच्या असतात. लाल, हिरव्या आणि निळ्या. आपला मेंदू या पेशींमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर रंग ओळखू शकतो.

या पेशींपैकी एक किंवा अनेक पेशी मृत झाल्यास किंवा त्या व्यवस्थित काम करू शकत नसल्यास रंगांधळेपणाचा त्रास जाणवू लागतो. जेव्हा लाल, निळ्या आणि हिरव्या अशा तिन्ही प्रकारच्या पेशी उपस्थित असतात, पण त्यातली एखाद्या प्रकारची पेशी व्यवस्थित काम करू शकत नसेल, तर सौम्य प्रकारचा रंगांधळेपणा येऊ शकतो. या आधारावर रंगांधळेपणा वेगवेगळ्या प्रकारचा आणि प्रमाणात असू शकतो. सौम्य रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्ती फक्त चांगल्या प्रकाशातच सर्व रंग व्यवस्थित ओळखू शकतात. पण इतर बाबतीत प्रकाश चांगला असला, तरी रंग ओळखणं अवघड होऊन बसतं.

विश्लेषण: कॅलरीज म्हणजे काय? आपल्याला एका दिवसाच्या अन्नात किती कॅलरीज आवश्यक आहेत, जाणून घ्या

रंगांधळेपणाच्या सर्वात गंभीर अवस्थेमध्ये दृष्टी ही पूर्णपणे कृष्ण-धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाते. अर्थात, सर्वकाही याच रंगांत दिसू लागतं. रंगांधळेपणाचा हा प्रकार क्वचित आढळून येतो.

दृष्टीतील स्पष्टतेवर काय परिणाम होतो?

सामान्यपणे रंगांधळेपणाचा परिणाम दोन्ही डोळ्यांवर होतो. एकदा हा त्रास जाणवू लागला, की सामान्यपणे आयुष्यभर कमी-अधिक प्रमाणात तो राहातो. पण असं असलं, तरी अतीगंभीर स्वरूपाचा रंगांधळेपणा नसेल, तर सामान्यपणे दृष्टीमधील स्पष्टतेवर (Vision Clarity) शक्यतो परिणाम होत नाही. अनेक लोकांना तर इतक्या सौम्य प्रमाणात रंगांधळेपणा असतो, की त्यांना हे जाणवत देखील नाही.

रंगांधळेपणावर उपचार शक्य आहे?

आता सामान्यपणे विचारला जाणारा प्रश्न म्हणजे रंगांधळेपणावर उपचार करणं शक्य आहे का? रंगांधळेपणा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही किंवा त्याच्यावर कोणती शस्त्रक्रिया देखील करता येणं अशक्य आहे. पण काही विशिष्ट लेन्स किंवा कलर फिल्टर चष्मे वापरल्यास रंग ओळखण्यातील गोंधळ काही प्रमाणात सुधारता येऊ शकतो. यासंदर्भात झालेल्या काही संशोधनातील दाव्यानुसार जनुकीय बदलांच्या माध्यमातून देखील रंगांधळेपणाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करता येऊ शकते.

विश्लेषण : उष्माघाताने राज्यात आठ रुग्ण दगावले; उष्माघात म्हणजे काय? उष्माघाताची लक्षणं कोणती? उपचार कसे करावेत?

रंगांधळेपणा कसा ओळखाल?

लहान मुलांचा विचार करता मुलं जेव्हा पहिल्यांदा रंग ओळखायला शिकत असतात, तेव्हा या बाबतीत कळू शकतं. मुलांना रंग ओळखणं किंवा त्यांचा फिकट किंवा गडद प्रकार ओळखणं अवघड जाऊ लागल्यास याचा अंदाज येऊ शकेल. कदाचित त्याच रंगाच्या वेगवेगळ्या छटा ओळखण्यात देखील मुलांना अडचण येऊ शकेल. यासंदर्भात पालक आणि शिक्षक मुलांना लाल, हिरवा, निळा आणि पिवळा या रंगांमध्ये फरक करता येत नसल्याची तक्रार प्रामुख्याने करतात.

रंगांधळेपणा येण्यामागची कारणं कोणती?

ही व्याधी असणाऱ्या अनेक वक्तींना अनुवांशिक पद्धतीने हा आजार जडलेला असतो. पण काहींना नंतर देखील रंगांधळेपणा येऊ शकतो. प्रामुख्याने एखादा गंभीर आजार, धक्का किंवा शरीरात विषारी रसायन इंजेक्ट होणे अशा गोष्टींमुळे जन्मानंतरही रंगांधळेपणा येऊ शकतो. जर एखाद्या आजारामुळे रंगांधळेपणा आला, तर दोन्ही डोळ्यांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. हळूहळू हे परिणाम अधिक गंभीर होत जातात. काचबिंदू, मधुमेह, अल्झायमर, पार्किन्सन, मद्यविकार, ल्युकेमिया आणि सिकलसेल अॅनिमिया अशा आजारांमुळे रंगांधळेपणाची व्याधी जडू शकते.

कुणाला धोका अधिक?

या आजाराचा महिलांपेक्षा पुरुषांना धोका अधिक असतो. जगभरात अंदाजे प्रत्येक दहाव्या पुरुषाला कोणत्यातरी प्रकारचा रंगांधळेपणा असतो. उत्तर युरोपातील पुरुषांना रंगांधळेपणा होण्याचा सर्वाधिक धोका असतो. भारताचा विचार करता, सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समितीचा यासंदर्भात दाखला दिला आहे. “या समितीने भारतीय लोकसंख्येच्या ८ टक्के पुरुष आणि १ टक्क्याहून कमी महिलांना रंगांधळेपणाची व्याधी असते. त्यात लाल आणि हिरवा रंग ओळखण्यातील अडचण सर्वाधिक व्यक्तींमध्ये दिसून येते”, असं या समितीने अहवालात म्हटल्याचं नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-04-2022 at 20:15 IST
ताज्या बातम्या