‘I Love Muhammad’ row triggers protests across India: “आय लव्ह मोहम्मद” हे फक्त एक बॅनर होते, पण त्याभोवती उभं राहिलेलं वादळ आता राज्यांच्या सीमा ओलांडून गेलं आहे. कानपूरमध्ये लागलेली ठिणगी उन्नाव, बरेली, गोध्रा, लखनौ, काशीपूरपर्यंत पोहोचली आणि रस्त्यांवर घोषणाबाजी, मोर्चे, चकमकी आणि अटकसत्र सुरू झालं. एका साध्या घोषवाक्याभोवती एवढं मोठं राजकीय-धार्मिक वादळ का उसळलं? याचाच घेतलेला हा आढावा.
‘आय लव्ह मोहम्मद’ या वादाची सुरुवात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाली. मात्र तो आता केवळ उत्तर प्रदेशापुरता मर्यादित न राहता उत्तराखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समाजातील सदस्यांच्या तीव्र आंदोलनात परिवर्तित झाला आहे. बरेली आणि लखनौपासून काशीपूर आणि हैदराबादपर्यंत ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले, त्यापैकी काही ठिकाणी पोलिसांशी चकमकीही झाल्या.
काय आहे ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद?
हा वाद ४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या रावतपूर परिसरातल्या बारावफात (ईद-ए-मिलाद-उन-नबी) मिरवणुकीदरम्यान सुरू झाला. मिरवणुकीच्या मार्गावर काही लोकांनी ‘I Love Mohammad’ असा बॅनर लावल्याचा आरोप आहे. या कृतीला हिंदू संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यांच्या मते हा एक नवा पायंडा आहे आणि जाणूनबुजून भावना भडकावण्याचा प्रयत्न यामागे आहे. या आक्षेपानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याचं सांगितलं जातं आहे.
प्रशासनाची भूमिका
स्थानिक पोलीस उपायुक्त (डीसीपी) दिनेश त्रिपाठी यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, शासनाच्या नियमांनुसार धार्मिक मिरवणुकांमध्ये नवे रिवाज सुरू करण्यास परवानगी नाही.
एफआयआरमुळे अडचण वाढली
कानपूर पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी बारावफात मिरवणुकीदरम्यान नवा प्रघात सुरू केल्याचा आणि सामुदायिक सलोखा बिघडवल्याचा आरोप करत नऊ लोकांच्या नावाने आणि १५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात पारंपरिक तंबू काढून टाकून एका नव्या ठिकाणी बॅनर लावण्यात आला, असा मुद्दा एफआयआरमध्ये मांडण्यात आला आहे.
ओवेसींनी आगीत तेल ओतलं
यानंतर या वादात तेल ओतण्याचेच काम AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याचा आरोप आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ असं म्हणणं हा गुन्हा नसल्याचं स्पष्ट करत कानपूर पोलिसांना टॅग करून त्यांच्या कारवाईवर टीका केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आलं. मात्र, कानपूर पोलिसांनी स्पष्ट केलं की, बॅनर लावल्याबद्दल कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही. गुन्हे हे फक्त बॅनर एका नव्या जागी लावणे आणि दुसऱ्या गटाच्या पोस्टर्सना नुकसान पोहोचवणे यासंबंधी आहेत.
उन्नावपासून गुजरातपर्यंत: आंदोलनांची लाट विविध राज्यांत
कानपूरव्यतिरिक्त या प्रकरणाची झळ इतर शहरं व राज्यांपर्यंत पोहोचली असून मुस्लिमांवर दाखल झालेल्या एफआयआरविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. उदाहरणार्थ, उन्नावमध्ये युवकांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ असे बॅनर घेऊन मिरवणुका काढल्या आणि धार्मिक घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीबाबत आठ एफआयआर दाखल झाले आणि पाच जणांना अटक करण्यात आली.
बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मद पोस्टर्स काढून टाकण्यावरून स्थानिक रहिवासी आणि पोलीस यांच्यात वाद झाला. दरम्यान, गुजरातमधील गोध्रा येथे निदर्शनांच्या दरम्यान पोलीस ठाण्याची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली १७ जणांना अटक करण्यात आली असून ८० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदवले गेले.
लखनौमधील विधान भवनाच्या गेट क्रमांक ४ वर मुस्लिम महिलांनी शांततामय आंदोलन करत मोहम्मद पैगंबर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये अली खान भागात काढलेल्या अनधिकृत मिरवणुकीमुळे पोलिसांशी चकमक झाली, दगडफेक झाली आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं, असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे. देशभरातील अनेकांचा असा युक्तिवाद आहे की, ‘आय लव्ह मोहम्मद’ हा फलक सामुदायिक तणावाचं कारण ठरत असल्याच्या नावाखाली काढून टाकणं म्हणजे मुस्लीम समाजाच्या धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं होय.