Land for Jobs Scam: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जमिनीच्या बदल्यात नोकरी (Land for Jobs Scam) या घोटाळ्यात चौकशी केल्यानंतर आता त्यांचे पती, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचीही याचप्रकरणी चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने सुरू केली आहे. सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून विशेष न्यायालयाने लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

लालूप्रसाद यादव यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. “माझ्या ७४ वर्षीय बाबांना नाहक त्रास दिला जात आहे. जर त्यांना काही झालं तर मी कुणालाही सोडणार नाही. माझ्या बाबांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. वेळ खूप बलवान असते, यात खूप ताकद असते. हे कुणीही विसरू नये”, या आशयाचं ट्विट रोहिणी आचार्य यांनी केलं आहे.

हे वाचा >> “नाहक त्रासामुळे माझ्या बाबांना काही झालं तर…” लालूप्रसाद यांच्या सीबीआय चौकशीनंतर रोहिणी आचार्य आक्रमक

जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा काय आहे?

मे २०२२ मध्ये, सीबीआयने लालूप्रसाद, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती आणि हेमा यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखला केला. लालूप्रसाद केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या बदल्यात भूखंड स्वीकारले, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, लालूप्रसाद रेल्वेमंत्री असताना पाटण्यातील १२ लोकांना रेल्वेच्या गट ‘ड’ पदांवर नियुक्ती देण्यात आली होती. या नियुक्त्यांच्या बदल्यात लालूप्रसाद कुटुंबीयांना पाटणा आणि आसपासच्या परिसरातील सात भूखंड अतिशय कमी दरात मिळाले. हे भूखंड ज्या १२ लोकांना रेल्वेत नोकरी मिळाली त्यांच्या कुटुंबाचे होते, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.

हे वाचा >> विश्लेषण: लालूप्रसाद यादव यांचं ‘लालू’ हे नाव कसं पडलं?

सीबीआयने असाही आरोप केला की, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यांना या काळात १ लाख चौरस फुटांची जमीन केवळ २६ लाखांत मिळाली. त्यावेळच्या बाजार भावानुसार या जमिनीचे एकत्रित मूल्य हे ४.३९ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या सात भूखंडाच्या विक्री करारानुसार तीन भूखंड हे राबडीदेवींच्या नावे आहेत. तर एक मिसा भारती, एका भूखंडाचा करार मे. एके इन्फोसिस्टिम्सज्या बाजूने आहे. या कंपनीचे बहुसंख्य शेअर्स राबडीदेवी यांनी २०१४ मध्ये विकत घेतले आहेत. तर दोन भूखंड हेमा यादव यांना भेट म्हणून दिलेले आहेत.

लालूप्रसाद यादव यांच्यासोबत जमीन देणारेही आरोपी

सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये १६ लोकांना आरोपी करण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि ज्या १२ लोकांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर या रेल्वे झोनमध्ये नोकऱ्या मिळाल्या त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रेल्वेमध्ये पर्यायी जागा (Substitutes) म्हणून या उमेदवारांना भरती केले गेले. आश्चर्य म्हणजे उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत सर्व प्रक्रिया पार पडली आणि त्यांची नेमणूकही झाली.

रेल्वेच्या पश्चिम मध्य झोनमध्ये जबलपूर आणि पश्चिम झोनमध्ये मुंबई याठिकाणी अर्जदारांचा पत्ता उपलब्ध नसतानाही अर्जदारांचा अर्ज स्वीकारुन त्यांना नियुक्त केले गेले. सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटला दाखल करताच लालूप्रसाद आणि कुटुंबीयांशी संबंधित १६ ठिकाणांवर छापा टाकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राष्ट्रीय जनता दलाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण राजकीय सुडाचे सर्वात वाईट उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली आहे. मागच्या आठवड्यात राबडीदेवी यांनी भाजपा लालूप्रसाद यांना घाबरत असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या, आम्ही पळून जाणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून आम्ही अशा आरोपांचा सामना करत आहोत. भाजपा लालू यादव यांना घाबरते.”