नाशिकमध्ये होणाऱ्या २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात शुभंकर (मॅस्कॉट) म्हणून दिमाखात मिरवणारा महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ देशभरात पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या युवा महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन होत आहे. यात देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो युवक-युवती सहभागी झाले आहेत. सलग पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा, नानाविध उपक्रम रंगणार आहेत. सर्वत्र चित्ररूपात भेटणारा शेकरू या देखण्या प्राण्याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सव काय आहे ?

युवकांचा सर्वांगीण विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस देशात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करते. त्यासाठी एका राज्यातील विशिष्ट शहराची निवड केली जाते. या माध्यमातून संस्कृती व परंपरांचे जतन करणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यास हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. जवळपास दीड दशकानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची संधी महाराष्ट्रास मिळाली आहे. विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारित २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये होईल. त्यात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना व नेहरू युवा केंद्र संघटनेचे युवा स्वयंसेवक अशा सुमारे आठ हजार जणांचा सहभाग आहे. पाच दिवसांत राष्ट्रीय युवा अधिवेशन, सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होतील.

हेही वाचा – विश्लेषण : इशान किशनला डच्चू की स्वेच्छेने संघापासून दूर? की अनुशासनात्मक कारवाई? अजूनही संघात का नाही?

शुभंकर निवडीमागील प्रेरणा काय?

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरूची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली. महोत्सवाचे बोधचिन्ह व शुभंकरच्या अनावरणावेळी शेकरू देशातील युवकांना स्नेह, सामाजिक एकता, गतिशिलता, विविधता आणि पर्यावरणाप्रती आदरभाव हा संदेश देऊन प्रेरणा देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाबळेश्वर, भीमाशंकर व अंबाघाट परिसरात शेकरू आढळतो. आकर्षक मखमली रंग व लटकणारी शेपूट असा हा देखणा प्राणी आहे.

शेकरूची वैशिष्ट्ये काय?

शेकरू हा खार प्राणीगटात समाविष्ट होतो. अतिशय लाजाळू असा हा प्राणी. त्याला उडणारी खार अथवा भीमखार असेही म्हटले जाते. एकटे राहणे तो अधिक पसंत करतो. प्रत्येक शेकरू दिसायला वेगवेगळे असते. स्वतःचा एक प्रदेश ठरवून त्यात बागडण्यात तो आनंद मानतो. जंगली फळे हा त्याचा आहार. बीज, झाडांची फुले, पाने व सालीवरही तो उदरभरण करतो. विविध प्रदेशानुसार शेकरूंच्या रंगात फरक पडतो. महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे यांनी शेकरूचे वजन अंदाजे दोन ते अडीच किलो असल्याचे सांगितले. लांबी अंदाजे तीन फूट असून त्याची तपकिरी रंगाची झुपकेदार शेपटी आकर्षक असते. आययूसीएनच्या लाल यादीत हा प्राणी संकटग्रस्त असून तो केवळ भारतात आढळतो. झपाट्याने कमी होणाऱ्या या प्राण्यांची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पिल्लांना जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरटी तयार करतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेताना तो किमान १५ ते २० फुटांची उडी मारू शकतो. मोठे परभक्षी पोहोचू नये म्हणून ते मुद्दाम आपली घरटी लहान फांदीवर बांधतात, असे यादव तरटे यांचे निरीक्षण आहे.

शेकरू कुठे आढळतात?

शेकरूंचा अधिवास म्हणजे जैवविविधतेने समृद्ध अशा नैसर्गिक वनांचे निदर्शक मानले जाते. भीमाशंकर व फणसाड अभयारण्य शेकरूंसाठी प्रसिद्ध आहेत. या प्राण्याच्या संवर्धनासाठी भीमाशंकर हे अभयारण्य संरक्षित करण्यात आले आहे. पश्चिम घाटात सिंधुदुर्ग ते नाशिक या परिसरातील निमसदाहरित वनांमध्ये तसेच विदर्भात गडचिरोलीच्या आलापल्ली आणि सिरोंचा भागातही शेकरू आढळतात. शेकरू आंबा, जांभूळ, हिरडा व करप अशा उंच झाडावर घरटी बांधतात. मे व जून महिन्यात ते हे काम करतात. त्यामुळे गणनेसाठी हाच कालावधी निवडला जातो. भीमाशंकर अभयारण्यात दरवर्षी त्यांची गणना होते. वन विभागाने केलेल्या गणनेत भीमाशंकर अभयारण्यात भट्टी, कुंभारखाण, आहुपे, देवराई, निगडाळे व चौरी टेकडी येथे शेकरूंची संख्या जास्त आढळली होती.

हेही वाचा – विश्लेषण : जेफ्री एपस्टीन कोण होता? ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये ट्रम्प, क्लिंटन, स्टीफन हॉकिंग, मायकेल जॅक्सन ही नावे कशी?

गणनेची अनोखी पद्धती कशी आहे?

शेकरूच्या संख्येचा अंदाज येण्यासाठी वन्यजीव गणना केली जाते. प्रत्यक्ष प्राणी न मोजता घरट्यांचा आधारे केली जाणारी ही एकमेव गणना असल्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी सांगितले. शत्रूला चकवा देण्यासाठी एक शेकरू अनेक घरटी बांधतो. हा प्राणी सहसा जमिनीवर येत नाही. जेव्हा त्याला सुरक्षित वाटते तेव्हा तो क्वचित जमिनीवर येतो. जीपीएस यंत्रणेद्वारे शेकरूंची घरटी नोंदविली जातात. सहा ते सात घरट्यांमागे एक प्राणी या निकषाच्या आधारे शेकरूंची संख्या काढली जाते. शेकरूचे घरटे असणाऱ्या झाडाखाली उभे राहून जीपीएसमध्ये नोंद घेतली जाते. त्यात झाडाचे नाव, घरटे नवीन की जुने, त्याचा आकार, घरट्याजवळ शेकरू दिसल्यास त्याचे वर्णन, घरट्यांची संख्या नोंदविली जाते. शास्त्रीय पद्धतीने ही गणना होते. सदाहरित वनात शेकरूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात किती शेकरू आहेत?

वन विभागाने दोन वर्षांपूर्वी भीमाशंकर अभयारण्यातील प्राणी गणनेत दोन हजार ७२३ शेकरूंची नोंद झाली होती. त्यावेळी जीपीएस यंत्रणेद्वारे १६ हजार ३४३ शेकरूंची घरटी नोंदविण्यात आली होती. नाशिक वन्यजीव विभागाने २०२१ मध्ये केलेल्या गणनेत अभयारण्य परिसरात शेकरूंची ५९७ घरटी आढळली होती. त्याआधारे १३९ शेकरूंची नोंद केली गेली. काही वर्षांपूर्वी वन विभागाने राज्यात साडेतीन हजार शेकरू असल्याची नोंद केली होती. अभयारण्यालगतच्या झाडांची तोड, विविध प्रकल्पांची उभारणी आदींचा शेकरूंच्या अधिवासावर विपरीत परिणाम होत आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये शेकरूच्या विक्रीचा प्रकारही समोर आला होता. शेकरूच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाय योजनांची आवश्यकता वन्यजीव अभ्यासक मांडतात.