आजपासून जवळजवळ ८० वर्षांपूर्वी म्हणजे ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यात होता. हा वसाहतवादी राजवटीविरुद्धचा मोठा उठाव होता. या अगोदर असा उठाव भारताने कधीही पाहिला नव्हता. या उठावामुळे ब्रिटीश सामराज्याला सुरुंग लागला होता.
८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरु केले. ब्रिटीशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी ‘करो या मरो’ या घोषणेवर आंदोनल सुरु करण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. आणि ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ म्हणून ओळखला जातो. आजपासून ८० वर्षापूर्वी झालेल्या ‘ऑगस्ट क्रांती दिना’ने भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लावला आणि पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं.
हेही वाचा- विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण
या आंदोलन काळात रेल्वे स्थानके, सरकारी कार्यालये, वसाहती नियमांच्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सरकारने या हिंसाचाराला गांधीजींना जबाबदार धरले. अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसवर बंदी घालण्यात आली. आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आणि सैन्याला पाचारण करण्यात आले होते. आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणाऱ्या गांधीजींनीच ‘करो या मरो’चा मंत्र दिल्यामुळे भारतीयांमध्ये चेतना निर्माण झाली होती. करोडो भारतीय या नाऱ्याला प्रतिसाद देत रसत्यावर उतरले होते. या जन आंदोलनाने ब्रिटीशांच्या सत्तेला सुरुंग लागला होता.
काय आहे भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी
सुरुवातीला ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु करायचे का नाही यावर अनेक वाद झाले. महात्मा गांधी या आंदोलनाच्या समर्थनार्थ होते तर जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद आणि डाव्या विचारांच्या नेत्यांना आंदोलन करणं महत्वाचं वाटत नव्हतं. पण गांधींनी हे आंदोलन सुरु करायचा निर्धार केला होता.
टाऊन हॉलमध्ये फडकवला तिरंगा
अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यसैनिकांनी ९ ऑगस्ट रोजी टाऊन हॉलमध्ये तिरंगा फडकावला होता. त्या आंदोलनाच्या स्मरणार्थ येथे दरवर्षी ९ ऑगस्टला तिरंगा फडकवला जातो. तेव्हापासून या मैदानाला ऑगस्ट क्रांती मैदान या नावानं ओळखलं जातं. यंदाही भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. नील कटरा बाहेरील फलक त्या आंदोलनाची आठवण करून देणारा आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा तो काळ वेगळा होता. त्यावेळी जुनी दिल्ली आंदोलकांचे केंद्र होते. ठिकठिकाणी सभा होत होत्या, परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला होता. भारतीयांची गुलामगिरीतून मुक्तता होत होती.
प्रमुख नेत्यांना अटक
गांधींच्या ‘करो या मरो’ या मंत्राने जनतेवर मोठा प्रभाव पाडला आणि त्यांच्यामध्ये एक नवा उत्साह, आत्मविश्वास निर्माण झाला. ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा ८ ऑगस्ट रोजी झाली आणि ९ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसला असंवैधानिक संस्था घोषित करण्यात आली. भारत छोडो आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
आंदोलनाला हिंसक वळण
हे आंदोलन अहिंसक पद्धतीने करायचं असे ठरले असतानाही प्रमुख नेत्यांना अटक केल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. परिणामी रेल्वे स्टेशन आणि पोलीस स्टेशनला आग लावण्यात आली, तारायंत्रे उखडण्यात आली. मुंबई, अहमदाबाद आणि जमशेदपूर या ठिकाणी कामगारांनी आंदोलनात भाग घेतला. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकवण्यात आला. अखेर भारतीयांच्या आक्रमकतेपुढे ब्रिटीशांना झुकावे लागले आणि त्यांना भारत सोडावा लागला.
अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणंची अहुती दिली
भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांची सत्ता डगमगायला सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या लढाईमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असा विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाला. तर दुसरीकडे ब्रिटीशांनाही आता आपल्याला सत्ता सोडावी लागणार याची खात्री पटली होती.