scorecardresearch

विश्लेषण: SWAMIH गुंतवणूक निधी म्हणजे काय? ज्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला गती मिळाली

Special Window for Affordable and Mid Income Housing (SWAMIH) गुंतवणूक निधीमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी गती मिळाली.

SWAMIH investment fund for housing
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार स्वामीह (SWAMIH) हा गृहनिर्माण प्रकल्पांना मदत करणारा सर्वात मोठा खासगी इक्विटी निधी आहे.

पूर्णत्वाला न येऊ शकलेल्या किंवा रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारने पर्यायी गुंतवणूक निधी अर्थात Special Window for Affordable and Mid Income Housing (SWAMIH) स्वामीहची स्थापना केली. या योजनेतंर्गत आतापर्यंत १५,५३० कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात आला आहे. रेरातंर्गत नोंदणी झालेल्या परवडणाऱ्या व मध्यम उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पाला गती देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरल्याचे दिसते. स्वामीहच्या माध्यमातून आतापर्यंत १३० प्रकल्पांना १२ हजार कोटींचा निधीला मान्यता देण्यात आली आहे.

स्वामीह गुंतवणूक निधी म्हणजे काय?

स्वामीह फंड हा परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एक खिडकी योजना आहे. तणावपूर्ण आणि रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना लवकर पूर्ण करण्यासाठी या निधीची स्थापना करण्यात आली. हा निधी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने प्रायोजित केला असून एसबीआय कॅपिटल मार्केट्सची शाखा असलेल्या एसबीआयकॅप व्हेंचर्सकडे या निधीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे.

नवीन विकासक, अडचणीत आलेल्या प्रकल्पांचे प्रस्थापित विकासक, रखडलेल्या प्रकल्पांचा पुर्वेइतिहास असलेले विकासक, ग्राहकांच्या तक्रारी किंवा एनपीए खाती आणि कायदेशीर खटल्यात अडकलेले प्रकल्प अशा नानाविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या प्रकल्पांचा सर्वात मोठा तारणहार म्हणून स्वामीह निधीकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पांना चालना मिळून विक्रीवर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी या निधीची मदत झाली आहे.

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, स्वामीह फंड हा केवळ तणावग्रस्त गृहनिर्माण प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करणारा आणि त्यांच्या देखरेखीवर लक्ष केंद्रित करणारे सर्वात मोठा रिअल इस्टेट खासगी इक्विटी संघ आहे.

स्वामीहने आतापर्यंत किती प्रकल्पांना वित्तपुरवठा केला?

स्वामीहने आतापर्यंत १३० प्रकल्पांना १२ हजार कोटींच्या वित्तमंजुरीसह अंतिम मान्यता दिली आहे. या निधीमुळे २० हजार ५५७ घरे बांधून पूर्ण झाली असून पुढील तीन वर्षांत तीस लहान-मोठ्या शहरांमध्ये ८१ हजार घरे बांधून पूर्ण होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

स्वामीह निधीमुळे आतापर्यंत २६ प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्यास आणि त्यामधील गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देण्यास मदत झाली आहे, असे सरकारच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक साहाय्यक उद्योगांच्या वाढीसाठीही या फंडाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यामुळे ३५ हजार कोटींची लिक्विडिटी खुली करण्यास यश मिळाले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या निधीमुळे बोरीवली, मुंबई मधील रीवली पार्क (Rivali Park) गृहनिर्माण प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प २०२१ मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. सात एकरांत पसरलेला आणि ७०८ वेगवेगळे युनिट्स असलेला हा निवासी क्षेत्राचा प्रकल्प सीसीआय प्रोजेक्ट्स प्रा. लि. या विकासक कंपनीचा आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरु झालेल्या या योजनेमध्ये रेरा नोंदणीकृत निवासी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्ज वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत १५ हजार ५३० कोटी जमा झाले आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 22:45 IST