Tehreek-e-Labbaik Pakistan पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील संघर्ष वाढला आहे. मात्र, पाकिस्तानातील वातावरणदेखील तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाब प्रांतातील लाहोर येथे पोलीस आणि तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) यांच्यातील मोठ्या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे; तर अनेक जण जखमी झाले आहेत. कट्टरपंथी इस्लामी गट असलेल्या ‘टीएलपी’चे हजारो सदस्य इस्रायलविरोधी आंदोलनासाठी लाहोरच्या रस्त्यांवर जमले आहेत.

शुक्रवारपासून लाहोरहून इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासाकडे निघालेल्या टीएलपी सदस्य आणि समर्थकांचा पोलिसांशी संघर्ष झाला आहे. मुख्य म्हणजे ही संघटना पाकिस्तानच्या लष्करानेच तयार केली आहे, जी आता त्यांच्याचसाठी डोकेदुखी ठरत आहे. काय आहे तहरीक-ए-लब्बैक? लष्कराने तयार केलेल्या संघटनेमुळे देश संकटात सापडला आहे का? आंदोलनामागील मूळ कारण काय? जाणून घ्या…

पाकिस्तानात आंदोलन पेटलं

  • आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि लोखंडी सळ्यांनी हल्ले केले; तर पोलिसांनी प्रत्युत्तरात अश्रुधुराचा वापर केला.
  • रावळपिंडी आणि इस्लामाबादमधील प्रशासनाने महत्त्वाचे रस्ते सील केले आहेत, तसेच काही भागांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा बंद करण्यात आली.
  • प्रशासनाने महत्त्वाच्या मार्गांवर ‘कलम १४४’ लागू केले असून, सुरक्षा दल तैनात केले आहे.
  • आंदोलकर्त्यांचा आरोप आहे की, लष्कराने आधुनिक शस्त्राचा वापर केला आणि आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला.

काय आहे तहरीक-ए-लब्बैक?

तहरीक-ए-लब्बैक (टीएलपी) हा एक अति-उजवा इस्लामी पक्ष आहे, जो सुन्नी इस्लामच्या बरेल्वी पंथाचे पालन करतो. त्याची स्थापना २०१५ मध्ये इस्लामी विद्वान खादिम हुसेन रिझवी यांनी केली होती, ज्यांचे २०२० मध्ये निधन झाले. पाकिस्तानने आपल्या कायदेशीर प्रणालीमध्ये शरिया कायद्याचे काही भाग समाविष्ट केले आहेत. मात्र, टीएलपी देशाला कठोर शरिया कायद्यानुसार चालवण्याची मागणी करतो. सध्या या पक्षाचे नेतृत्व संस्थापक खादिम रिझवी यांचे पुत्र साद रिझवी करीत आहेत.

हा पक्ष प्रेषित मुहम्मद यांच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहे आणि ईश्वरनिंदा कायद्यात (Blasphemy Law) कोणताही बदल करण्याला त्यांचा तीव्र विरोध आहे. इस्लामचा किंवा प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मृत्युदंड देण्याची मागणी टीएलपी करतो. गेल्या काही दशकांत पाकिस्तानच्या ईश्वरनिंदा कायद्याखाली हजारो लोकांवर खटले चालवले गेले आहेत, त्यापैकी काहींना जन्मठेप किंवा मृत्युदंडाचा सामना करावा लागला आहे. सध्या अंदाजे ७५० लोक पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदा कायद्याखाली तुरुंगात आहेत.

संघटनेची हिंसक आंदोलने

या संघटनेला पाकिस्तानी सैन्यानेच मोठे केले. लष्कराने देशांतर्गत राजकारण हाताळण्यासाठी तयार केलेल्या या संघटना आता पाकिस्तानसाठीच डोकेदुखी ठरत आहेत. टीएलपी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलन करते, हीच या संघटनेची ओळख आहे. मात्र, ही संघटना करीत असलेली आंदोलने अनेकदा हिंसक स्वरूप धारण करतात. पाकिस्तानच्या ईश्वरनिंदा कायद्यावर टीका केल्याबद्दल पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांची हत्या करणाऱ्या पोलीस गार्ड मुमताज कादरी यांचा बचाव केल्यानंतर या पक्षाला प्रसिद्धी मिळाली.

निवडणुकीच्या शपथविधी सोहळ्यात केलेले बदल प्रेषितांसाठी अपमानकारक असल्याचा दावा या संघटनेने केला होता. त्यानंतर कायदामंत्री झाहीद हमीद यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, अखेरीस सैन्यदलाला हस्तक्षेप करून हे आंदोलन रोखावे लागले होते. २०१८ मध्ये या संघटनेने प्रेषित मुहम्मद यांच्या सन्मानाचे रक्षण करणे आणि ईश्वरनिंदा कायद्याचा बचाव करणे यावर आपले राजकारण केंद्रित केले. टीएलपीकडे स्वतःची कोणतीही सशस्त्र शाखा नसली तरी याला पाकिस्तानी सैन्याचा एक मध्यस्थ (Proxy) म्हणून ओळखले जाते.

लष्कराचा पाठिंबा

२०१८ मध्ये लष्कराने पीएमएल-एनचा प्रभाव कमी करण्यासाठी टीएलपीचा वापर केला. या संघटनेने २०२१ मध्ये फ्रान्स आणि डेन्मार्कच्या दूतावासांविरुद्ध अनेक वेळा आंदोलने केली. परदेशात कुराणचा अवमान केल्याबद्दल निषेध करण्यासाठी या पक्षाने अनेक हिंसक सभा आयोजित केल्या. या आंदोलनांमध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. टीएलपीच्या हिंसक डावपेचांमुळे आणि अतिरेकीपणामुळे अमेरिकेने २०१९ मध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. परंतु, २०२१ मध्ये अमेरिकेने टीएलपीचे नाव या यादीतून काढून टाकले.

विशेष म्हणजे टीएलपीवर एप्रिल २०२१ मध्ये पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती; पण नोव्हेंबर २०२१ मध्ये ती पुन्हा उठवण्यात आली. त्यावेळी साद यांना पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायद्यांखाली तुरुंगात टाकले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली, ज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा बळी गेला. तेव्हाच्या इम्रान खान सरकारने ही बंदी मागे घेतली होती. ही बंदी लष्कराच्या सांगण्यावरून मागे घेतल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर २०२३ मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) टीएलपीला राष्ट्रविरोधी कारवायांच्या आरोपातून दोषमुक्त केले.

या संघटनेने सातत्याने धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे, ज्यात पाकिस्तानमधील सर्वांत मोठा धार्मिक अल्पसंख्याक गट असलेल्या अहमदीयांचा समावेश आहे. पाकिस्तानातील दोन डझनहून अधिक चर्च जाळण्याच्या घटनेसाठीही हीच संघटना जबाबदार असल्याचे सांगितले जाते. ईश्वरनिंदा कायद्यातील बदलांना विरोध करण्यासाठी जमावाने केलेली हत्या आणि मॉब जस्टिस यांसारख्या हिंसक आंदोलनांचा वारंवार वापर करूनही लष्कर या संघटनेचा वापर करते.

साद रिझवी कोण आहेत?

आपल्या वडिलांच्या निधनानंतर २०२० मध्ये पक्षाची धुरा सांभाळलेले ३१ वर्षीय साद हे धर्मगुरू होते. पंजाबमध्ये त्यांचा प्रभाव पूर्वीपासून होता; मात्र त्यांनी हळूहळू आपला प्रभाव संपूर्ण देशात वाढवला. आपल्या वडिलांप्रमाणेच, साद यांनीही स्वतःला पाकिस्तानच्या ईश्वरनिंदा कायद्यांचे आणि प्रेषित मुहम्मद यांच्या सन्मानाचे रक्षक म्हणून सादर केले आहे. २०१८ मध्ये प्रेषित मुहम्मद यांच्यावर व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखणाऱ्या एका राजकारण्याच्या हत्येची कथितरीत्या मागणी केल्याबद्दल साद यांना दोषी ठरवले होते.

२०२४ मध्ये टीएलपी पाकिस्तानमधील चौथा सर्वात मोठा राजकीय गट आणि पंजाबमधील तिसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. हा देशातील सर्वांत मोठा धार्मिक राजकीय गट आहे. हजारो कट्टरपंथी तरुण त्यांच्या रॅलींमध्ये सहभागी होतात. टीएलपी अलीकडे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात आंदोलन करीत आहे. टीएलपीने असा दावा केला आहे की, आतापर्यंत त्यांचे २५० हून अधिक कार्यकर्ते मारले गेले असून, १५०० हून अधिक जखमी झाले आहेत. साद यांना स्वतःला अनेक गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.