पोलंडच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रखर राष्ट्रवादी विचाराचा पुरस्कार करणाऱ्या कॅरोल नारॉकी या कट्टर उजव्या नेत्याचा विजय झाला आहे. त्यांचा विजय इतर देशांसाठी, विशेषत: युरोपीय महासंघासाठी तापदायक ठरणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
कॅरोल नारॉकी कोण आहेत?
राजकारणात नवख्या असलेल्या ४२ वर्षीय कॅरोल नारॉकी यांची प्रतिमा पुराणमतवादी इतिहासकार आणि प्रखर राष्ट्रवादी नेते अशी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पोलंडचा मुख्य विरोधी पक्ष ‘लॉ अँड जस्टिस पार्टी’ने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांना तरुण (१८-३९) वयोगटातील मतदारांचा सर्वाधिक पाठिंबा मिळाल्याचे पाहणीतून दिसले. नारॉकी यांना राजकारणाचा पूर्वानुभव नाही मात्र त्यांनी आपला संपूर्ण प्रचार देशभक्ती, पारंपरिक कॅथलिक मूल्ये आणि युरोपीय महासंघ व जर्मनीसारखे मोठे युरोपीय देश यांच्यापासून पोलंडच्या स्वायत्ततेचे संरक्षण करणे या मुद्द्यांभोवती आखला आणि त्यांना त्याचा फायदा झाला. सामाजिक असमानता खोलवर रुजलेल्या पोलंडसारख्या देशामध्ये त्यांच्या या विचारसरणीला मिळालेला पाठिंबा पाहता, त्या देशात पुराणमतवाद वाढीला लागला असल्याचे दिसते असे निरीक्षकांचे मत आहे.
पोलंडमधील महत्त्वाचे प्रश्न कोणते?
स्थलांतर, देशाचे सार्वभौमत्व आणि सांस्कृतिक ओळख यासारखे अनेक देशांपुढे असलेले प्रश्न पोलंडमध्येही आहेत. त्यातूनच उद्भवलेल्या अस्वस्थतेचा नारॉकी यांना फायदा मिळाल्याचे किंवा त्यांनी तो करून घेतल्याचे दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पहिल्या फेरीत अतिउजव्या विचारांच्या उमेदवारांना चांगले यश मिळाले होते, तेव्हाच राष्ट्रवादी आणि पुराणमतवादी विचारांना वाढता थारा मिळत असल्याचे स्पष्ट झाले. नारॉकी यांच्या विजयामुळे देशात उदारमतवादी लोकशाही मूल्यांची पीछेहाट होईल, त्यांचा सार्वजनिक अवकाश वेगाने कमी केला जाईल अशी भीती विरोधी पक्षाच्या समर्थकांना वाटत आहे.
नवनियुक्त अध्यक्ष विरुद्ध पंतप्रधान?
पोलंडमध्ये संसदेला जवळपास सर्व अधिकार आहेत. मात्र, काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आणि नकाराधिकार वापरण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे. नारॉकी यांची धोरणे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्या विरुद्ध आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या पार्लमेंटच्या निवडणुकीत टस्क यांनी युरोपीय महासंघाबरोबर संबंध सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते आणि मतदारांनी त्याला पाठिंबा दिला होता. टस्क हे मध्यममार्गी, डाव्या आणि कृषीकेंद्रित पक्षांच्या आघाडीचे नेते आहेत. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत त्यांना अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अडचणी आल्या आहेत. आता यापुढे ते अधिक कठीण जाण्याची शक्यता आहे. आधुनिक जगातील जीवनशैली, उदारमतवादी विचार यांना नारॉकी यांना मान्य नाहीत. समलिंगी विवाह आणि गर्भपाताचा अधिकार यांच्या ते विरोधात आहेत. पंतप्रधान टस्क यांना याविषयी कायदे करण्यात अद्याप यश आलेले नाही आणि यापुढे त्यांनी तसा प्रयत्न केला तरी नारॉकी यांच्याकडे नकाराधिकार असेल. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर टस्क यांची कोंडी होणार हे उघड आहे.
युरोपीय महासंघावरील संभाव्य परिणाम?
नारॉकी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यामुळे पोलंडमध्ये उजव्या विचारसरणीचे पुनरुत्थान होत असल्याचे मानले जात आहे. नारॉकी ६ जूनला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. अमेरिकेकडे अधिक कल असलेले नारॉकी जी देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणे आखतील त्यामुळे पोलंडचे युरोपीय महासंघाबरोबरचे संबंध ताणले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलंडच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा आणि स्थलांतरितांसंबंधीचे धोरण यामध्ये युरोपीय महासंघाचा कथित हस्तक्षेप नारॉकी यांना मान्य नाही.
ट्रम्प प्रशासनाबरोबर जवळीक?
पोलंड आणि अमेरिका यांचे संबंध आधीपासूनच चांगले आहेत. सध्या अमेरिकेचे १० हजार सैनिक पोलंडमध्ये तैनात आहेत. पण पंतप्रधान टस्क आणि त्यांचे सहकारी नेते ट्रम्प यांच्या धोरणांचे टीकाकार आहेत. मात्र, नारॉकी यांना ट्रम्प यांच्या विचारांचे आणि त्याबरोबर ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या त्यांच्या धोरणाचे आकर्षण आहे. त्यांच्या विजयानंतर पोलंड आणि ट्रम्प प्रशासनामधील संबंध अधिक दृढ होतील असे मानले जात आहे. महिनाभरापूर्वीच ट्रम्प यांनी नारॉकी यांचे व्हाइट हाऊसमध्ये आदरातिथ्य करून ते आपले पसंतीचे उमेदवार असल्याचा संदेश दिला होता.
युक्रेन धोरण बदलले जाण्याची शक्यता?
रशियाविरुद्ध आपले संरक्षण करण्याच्या युक्रेनच्या अधिकाराला नारॉकी यांचा पाठिंबा आहे. मात्र, त्या देशाला नेटोचे सदस्यत्व देण्यास त्यांचा विरोध आहे. तसेच युक्रेनला दीर्घकाळापासून दिल्या जाणाऱ्या मदतखर्चावर त्यांचा आक्षेप आहे. विशेषत: युक्रेनमधून येणाऱ्या निर्वासितांसाठी जास्त निधी देण्यास ते फारसे उत्सुक नाहीत. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पोलंडच्या साहाय्याबद्दल पुरेशी कृतज्ञता दाखवली नसल्याचा आरोप करून आपण नारॉकी यांच्याबरोबर असल्याचे दाखवले आहे.