मोहन अटाळकर

राज्‍याच्‍या अंतरिम अर्थसंकल्‍पात यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर शकुंतला रेल्‍वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्‍ये रूपांतर करण्‍यासाठी निम्‍मा खर्च उचण्‍याची घोषणा करण्‍यात आली, त्‍याविषयी….

राज्‍याच्‍या अर्थसंकल्‍पातील घोषणा काय?

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात यवतमाळ-मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजचा अर्धा खर्च उचलण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ब्रॉडगेज रूपांतरासाठी येणाऱ्या खर्चापैकी ५० टक्के भार राज्य सरकारने उचलावा आणि जमीन नि:शुल्क द्यावी, यासाठी ६ मार्च २०१४ रोजी रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. तेव्‍हापासून हा विषय प्रलंबित होता. दुसऱ्या सर्वेक्षणानंतर या संपूर्ण रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी १५५४ कोटी रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले होते. आता पन्‍नास टक्‍के खर्च उचलण्‍याची तयारी राज्‍य सरकारने दाखविल्‍याने या रेल्‍वेच्‍या पुनरुज्‍जीवनाचा मार्ग प्रशस्‍त झाला आहे.

‘शकुंतला’ रेल्‍वेचा इतिहास काय?

विदर्भातील कापूस पट्ट्यात यवतमाळ ते मूर्तिजापूर (११३ किमी), मूर्तिजापूर ते अचलपूर (७७ किमी) आणि पुलगाव ते आवी (३५ किमी) असा नॅरोगेज रेल्‍वेमार्ग सध्‍या अस्तित्‍वात आहे. या मार्गांवरील वाहतूक गेल्‍या अनेक वर्षांपासून बंद आहे. इंग्‍लंडमधील क्लिक-निक्सन अँड कंपनी या खासगी कंपनीने १९०३ मध्‍ये या रेल्वेमार्गाची उभारणी केली. पुढे हीच कंपनी सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत पोहोचवण्यासाठी आणि तेथून इंग्लंडमधील मँचेस्टरच्या सूत गिरण्यांना पाठवण्यासाठी या रेल्वेमार्गाची उभारणी त्‍यावेळी ब्रिटिशांनी केली होती. आतापर्यंत या रेल्वेमार्गाची मालकी सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनीकडेच होती. स्‍वातंत्र्यानंतर देशातील इतर रेल्‍वेमार्गांचा ताबा भारतीय रेल्‍वेकडे आला, पण काही अडचणींमुळे या रेल्वेची मालकी ब्रिटिश कंपनीकडेच राहिली. कंपनीशी झालेला करार गेल्‍या वर्षी संपुष्‍टात आल्‍याचे सांगण्‍यात येत असले, तरी मालकी हक्‍काशी संबंधित प्रश्‍न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही.  

हेही वाचा >>>भाजपाचा फॉर्म्युला ठरला; केंद्रीय मंत्री पशुपती पारस NDAतून बाहेर, पक्षाच्या अडचणी वाढणार?

‘शकुंतला’ रेल्‍वे केव्‍हा बंद झाली?

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याला जोडणारी ही नॅरोगेज रेल्वे गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वासाठी लढा देत होती. ग्रामीण भागातील जनतेसाठी ही रेल्वेसेवा मोठी सुविधा होती. ग्रामीण भागासाठी शकुंतला वरदानच होती. १९९४ पर्यंत या रेल्वे सेवेसाठी कोळशाचे इंजिन वापरले जात होते. कालांतराने डिझेलचे इंजिन वापरले जाऊ लागले. शकुंतला रेल्‍वेची चाके सुरुवातीला २०१२ मध्‍ये थांबली. अतिवृष्‍टीमुळे रेल्‍वेमार्गाचे नुकसान झाल्‍याने रेल्‍वे वाहतूक बंद करण्‍यात आल्‍याचे रेल्‍वे प्रशासनाने स्‍पष्‍ट केले होते. मूर्तिजापूर-यवतमाळ ही गाडी १० वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. अनेकदा नागरिकांनी आंदोलन करून शकुंतला सुरू करण्याची मागणी केली. मात्र मार्ग सुस्थितीत नसल्यामुळे ही रेल्वे पुन्हा सुरू झाली नाही. अचलपूर ते मूर्तिजापूर ही गाडी २०१८ पासून बंद करण्‍यात आली.

ब्रॉडगेज रूपांतर का रखडले?

लोकसभेच्या याचिका समितीने या रेल्वेमार्गाच्या ब्रॉडग्रेज रूपांतराविषयी शिफारस केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गाचे जुलै २००५ आणि ऑक्टोबर २००८ मध्ये प्राथमिक अभियांत्रिकी-वाहतूक सर्वेक्षण (पीईटीएस) केले. वेळोवेळी आर्थिक तरतूद आणि प्रवाशांच्या संख्येकडे बोट दाखवत रेल्वेने या मार्गाच्या रूपांतराकडे दुर्लक्षच केले. रेल्वेने या मार्गाच्या ब्रॉडग्रेज रूपांतरासाठी २००४ मध्ये ४०० ते ५०० कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती लोकसभेच्या याचिका समितीला दिली होती. २००२-०३ या वर्षांत सरासरी ६११ प्रवाशांनी अचलपूर-मूर्तिजापूर प्रवास केल्याची आकडेवारी या वेळी सादर करण्यात आली होती. या भागात रस्त्यांचे चांगले जाळे आहे, ब्रॉडगेज रूपांतराचा खर्च मोठा आहे, अशी उत्तरे त्यावेळी देण्यात आली होती.

हेही वाचा >>>विश्लेषण : दहा वर्षांपूर्वी रशियाने विनाप्रतिकार घेतला क्रायमियाचा घास! ‘पायलट प्रोजेक्ट’ने कशी झाली युक्रेन आक्रमणाची सुरुवात?

रेल्‍वेच्‍या पुनरुज्‍जीवनासाठी कोणते प्रयत्‍न झाले?

शकुंतला रेल्‍वेचा ऐतिहासिक वारसा जतन व्‍हावा, आहे त्‍या स्थितीत रेल्‍वे वाहतूक सुरू करावी आणि ब्रॉडगेज रूपांतराचे काम हाती घ्‍यावे या मागणीसाठी ‘शकुंतला रेल्‍वे बचाव’ सत्‍याग्रहाच्‍या माध्‍यमातून २०१८ पासून पाठपुरावा केला जात आहे. याशिवाय शकुंतला रेल्‍वे विकास समितीच्‍या वतीने अनेकवेळा निवेदने देण्‍यात आली. शकुंतला रेल्‍वेला विशेष प्रकल्‍पाचा दर्जा मिळावा, अशी रेल्‍वे विकास समितीची प्रमुख मागणी आहे. शकुंतला रेल्‍वेचे ब्रॉडगेज रूपांतर झाल्‍यास पश्चिम विदर्भातील मागास भाग हा थेट मुंबईशी जोडला जाणार आहे. राज्‍य सरकारने पन्‍नास टक्‍के खर्च उचलण्‍याची तयारी दर्शवली असली, तरी त्‍यासाठी आर्थिक तरतूद तातडीने करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्‍यांनी केली आहे. वऱ्हाड प्रांतातील शेती समस्या सोडवण्यासाठी सूक्ष्म जलनियोजन व सशक्त दळणवळण साधने उपलब्ध होणे नितांत गरजेचे आहे. केवळ शकुंतला मार्ग होऊन उपयोगी होणार नाही. नरखेड – बडनेरा या रेल्‍वेमार्गाचे वाशीमपर्यंत विस्तारीकरण व्‍हावे, अशीही मागणी पुढे आली आहे.

mohan.atalkar@expressindia.com