भारताला या वर्षी जी२० बैठकीचे अध्यक्षपद मिळालेले आहे. त्यामुळे वर्षभर विविध विषयांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय बैठका भारतात आयोजित करण्यात येत आहेत. पर्यटन कार्य गटाची तिसरी बैठक काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दि. २२ आणि २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी काश्मीर खोऱ्यात चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. २०१९ साली केंद्र सरकारने काश्मीरला असलेला विशेष दर्जा काढून घेतला. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले. २०१९ नंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी बैठक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर २०२२ मध्ये नवी दिल्ली येथे जी२० समिट झाल्यानंतर देशभरात विविध बैठकांच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरमध्ये होत असलेल्या बैठकीला जी२० देशांमधील ६० सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी हीच संख्या १०० च्या आसपास असेल, असे सांगण्यात आले होते. मात्र बैठकीला काही दिवस शिल्लक असताना अनेक देशांनी बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला.

कोणते देश अनुपस्थित राहणार?

मार्च महिन्यात अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या बैठकीला चीनने अनुपस्थिती दर्शविली होती. त्याचबरोबर काश्मीरमधील बैठकीलाही उपस्थित राहणार नसल्याचे चीनच्या वतीने शुक्रवारी सांगण्यात आले. विवादित क्षेत्रात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थिती दर्शविण्यास चीनचा स्पष्टपणे नकार असेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.

भारताने मात्र चीनच्या या प्रतिक्रियेचा समाचार घेतला असून हा दावा फेटाळून लावला आहे. भारत आपल्या क्षेत्रात कुठेही बैठक आयोजित करण्यासाठी स्वतंत्र असल्याचे चोख प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आले. भारताने शुक्रवारी असेही सांगितले की, चीनशी सामान्य संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता आणि चांगले वातावरण राहणे आवश्यक आहे.

‘द हिंदू’ दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांनीही काश्मीरमधील बैठकीसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच टर्कीनेही या बैठकीला हजेरी लावणार नसल्याचे सांगितले आहे. टर्कीच्या बाबत बोलायचे झाल्यास, टर्कीने याआधीही काश्मीरचा प्रश्न हाताळण्याबाबत भारतावर प्रश्नचिन्हे उपस्थित केलेली आहेत.

कोणत्या देशांनी नोंदणी केली?

जी२० देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, टर्की, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. सौदी अरेबिया, इजिप्त, टर्की आणि चीन वगळता इतर देशांनी या बैठकीसाठी नोंदणी केली आहे.

जी२० देशांतील सदस्यांसह, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि पाहुण्या देशांतील सदस्यांनादेखील बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यांपैकी बांगलादेश, मॉरिशस, नेदरलँड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील सदस्यांचा समावेश आहे.

काश्मीरमधील जी२० बैठक

पर्यटन कार्य गटाच्या दोन बैठका याआधी झालेल्या आहेत. एक सिलिगुडी आणि दार्जिलिंग येथे, तर दुसरी बैठक कच्छच्या रणामध्ये झाली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार काश्मीरमधील बैठकीत शेरपा अमिताभ कांत आणि जी२०चे मुख्य समन्वयक हर्ष वर्धन श्रींगला, केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंहदेखील सहभागी होणार आहेत.

राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आधीच्या दोन बैठकांमध्ये जी चर्चा सुरू झाली होती, ती या बैठकीत पुढे नेली जाईल. तसेच पुढील महिन्यात गोवा येथे पर्यटन कार्य गटाची चौथी बैठक होणार आहे. काश्मीरचे पर्यटनमूल्य जगाला दाखवून देण्यासाठी श्रीनगर येथे जी२० ची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये व्यत्यय आणण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे.

या बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी श्रीनगरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भूदल, हवाईदल या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच मरिन कमांडो आणि एनएसजीलाही पाचारण करण्यात आलेले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार दाल लेकजवळील शेर-ए-काश्मीर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जी२० ची एक बैठक होणार आहे. त्या ठिकाणी मरिन कमांडो तैनात केले जाणार आहेत.

एनएसजी कमांडोंनी शनिवारी लाल चौक येथे शोधमोहीम राबवली. तसेच निमलष्करी दलातील जवानांनीदेखील दाल लेकमधील हाऊसबोटची कसून तपासणी केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which countries are skipping the g20 meet to be held in kashmir kvg
First published on: 21-05-2023 at 14:40 IST