scorecardresearch

विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण?

हाफीज सईदचा मेव्हणा असलेल्या अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण?
पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहमान मक्की

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कर ए तोयबाचा डेप्युटी चीफ अब्दुल रहमान मक्कीला सोमवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. अमेरिका आणि भारताने UNSC कडे अनेकदा अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले जावे, अशी मागणी केली होती. मात्र चीनने मक्कीची बाजून उचलून धरल्यामुळे हे शक्य होत नव्हते. त्यानंतर आता चीनने आपला तांत्रिक मुद्दा बाजूला सारल्यानंतर अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

यावेळी चीन देखील मक्कीला वाचवू शकला नाही

अब्दुल रहमान मक्कीच्या विरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मे, २०२० आणि जून, २०२२ रोजी दोन वेळा प्रस्ताव दाखल केला गेला. मात्र दोन्ही वेळा चीनने या प्रस्तावात आडकाठी आणली होती. मात्र सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सुरक्षा सल्लागार समितीने अल कायदा प्रतिबंध धोरणानुसार मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. मक्की आता त्याच्या पैशांचा वापर करु शकणार नाही. तो हत्यारे विकत घेऊ शकत नाही, तसेच नेमून दिलेल्या परिसराबाहेर त्याला जाता येणार नाही.

कोण आहे अब्दुल रहमान मक्की?

अब्दुल रहमान मक्की हा पाकिस्तानी नागरिक आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्यातला तो आरोपी आहे. डिसेंबर २०२२ मध्ये UNSC चे अध्यक्षपद भारताने भुषविले होते. यावेळी दहशतवादाशी मुकाबला करण्यावर भारताने जोर दिला होता. शिवाय २८-२९ ऑक्टोबर, २०२२ रोजी मुंबई आणि दिल्ली येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काऊंटर टेररिज्मबाबत चर्चा करण्यात आली होती. यावेळी भारताने दहशतवाद्यांची यादी तयार करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला होता. त्यानंतर लगेचच ही मोठी कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली.

अब्दुल रहमान मक्कीवरील आरोप

अलकायदाशी संबंध, लष्कर ए तोयबाच्या समर्थनार्थ टेरर फंडींग, षडयंत्र रचने, हल्ल्याच्या कटाचा भाग होणे, तसेच नव्या दहशतवाद्यांची भरती करणे अशा आरोपांची जंत्री मक्कीवर लावण्यात आली आहे. UNSC दिलेल्या माहितीनुसार मक्की हा लष्कर ए तोयबाच्या डेप्युटी चीफ या पदावर कार्यरत आहे. तसेच लष्कर ए तोयबाचा विभाग असलेल्या जमाद-उद-दावाचाही तो प्रमुख आहे. लष्करच्या जागतिक संबंधाबाबत मक्की काम करत होता. त्यासाठी फॉरेन रिलेशन डिपार्टमेंटही स्थापन करण्यात आले होते.

लष्कर ए तोयबाने भारतावर केलेले मोठे हल्ले

दहशतवादी हाफीज सईद याचा मक्की हा मेव्हणा आहे. भारतात अनेक हल्ले करण्याच्या कटात तो सामील होता. हाफीज सईद याच्यासोबत मक्कीनेही भारतात हल्ले केले होते, असा आरोप त्याच्यावर आहे.

१ – २२ डिसेंबर २००० साली लष्कर ए तोयबाच्या ६ दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यात घुसून सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवान आणि तीन लोकांचा मृत्यू झाला होता.

२ – लष्करच्या ५ दहशतवाद्यांनी १ जानेवारी २००८ साली सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जवान आणि एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला.

३ – मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात लष्करचा सहभाग होता. मुंबईवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला म्हणून याकडे पाहिले जाते. यामध्ये १७५ लोकांचा मृत्यू झाला.

४ – फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीनगरच्या करन नगरमधील सीआरपीएफ कँपवर लष्करने आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात एका जवानाला प्राण गमवावे लागले होते.

५ – ३० मे २०१८ रोजी बारामूल्ला येथे लष्करच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली.

६ – १४ जून २०१८ रोजी लष्करने रायजिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी आणि दोन सुरक्षा रक्षकांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

७ – जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा येथे लष्करच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी भारतीय जवानांनी हा हल्ला परतवून लावला. मात्र यात भारताचे चार जवान शहीद झाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 12:18 IST

संबंधित बातम्या