Who was Basava Raju? डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रवाहाविरुद्धच्या लढाईत सुरक्षादलांना मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील अतिदुर्गम अबूझमाड़ जंगलात झालेल्या चकमकीत कुख्यात माओवादी प्रमुख नेता नंबाला केशवराव उर्फ बसव राजू ठार झाला. या कारवाईत एकूण २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून बसव राजू हा त्यापैकी एक होता.

माओवादी चळवळीतील शीर्षस्थ नेता

२०१८ साली गणपती उर्फ मुप्पला लक्ष्मण राव याच्या राजीनाम्यानंतर बसव राजूने CPI (माओवादी) या संघटनेचे महासचिव हे पद स्वीकारले होते. सीपीआयची (CPI-माओवादी) स्थापना २००४ साली पीपल्स वॉर ग्रुप आणि माओवादी कम्युनिस्ट सेंटर (MCC) यांच्या विलीनीकरणातून झाली होती. गणपती हा  पहिला महासचिव होता आणि सध्या तो फिलीपिन्समध्ये पळून गेल्याचा अंदाज आहे.

शिक्षणात प्रावीण्य, हिंसेत क्रौर्य

बसव राजू हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे शिक्षण वारंगल येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयात (REC, सध्याचे NIT) झाले होते. बी.टेक पदवीधर असलेला बसव राजू हा उच्चशिक्षित असून १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस तो CPI (ML) पीपल्स वॉर ग्रुपमध्ये सहभागी झाला. कॉलेजच्या काळात तो निष्णात कबड्डीपटू म्हणूनही ओळखला जात होता.

भीषण हल्ल्यांचा सूत्रधार

छत्तीसगडमधील चिंतलनार येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला झाला होता, त्यात ७६ शहीद झाले होते. या भीषण हल्ल्यात नक्षलवाद्यांचे नेतृत्व बसव राजी याने केले होते. त्यानंतर झिरम घाटी येथे काँग्रेसच्या ताफ्यावरही असाच अचानक हल्ला करून अनेक नेत्यांना ठार मारण्यात आले होते, त्यासाठीही तोच जबाबदार होता. त्याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याचा समावेश NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता.

माओवाद्यांच्या बुरसटलेल्या धोरणांचा प्रचारक

बसव राजू हा केवळ हिंसेचा समर्थक नव्हता, तर तो IED स्फोटक बनवणारा तज्ज्ञ म्हणूनही ओळखला जात होता. त्याचा LTTE सारख्या इतर दहशतवादी चळवळींशीही संपर्क होता. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी भूमिगत कामगिरी फार पाडली होती.

२०१८ मध्ये माजी आमदारांच्या हत्येतही सहभाग

२३ सप्टेंबर २०१८ रोजी, आंध्र प्रदेशातील अराकू येथे तेलुगू देसम पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार शिवेरी सोमा यांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याच्या कटातही बसव राजूचाच सहभाग होता, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अबुझमाड एन्काउंटर म्हणजे काय?

अबुझमाड हा माओवादी चळवळीचा ‘सेफ झोन’ म्हणून ओळखला जातो. या भागात सुरक्षा यंत्रणांना एका वरिष्ठ माओवादी नेत्याच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव येथून जिल्हा राखीव रक्षक (DRG) यांना विशेष मोहिमेवर पाठवण्यात आले. ही कारवाई अतिशय यशस्वी ठरली असून, माओवाद्यांच्या नेतृत्वाला जबरदस्त हादरा बसला आहे. बसव राजूच्या रूपाने एक हिंसक विचारांचा कट्टर प्रचारक आणि नक्षलवादी नेतृत्वाचा अंत झाला आहे. या कारवाईमुळे माओवादी संघटनेचं मनोबल खच्ची होण्याची शक्यता आहे. मात्र, नक्षलवाद अद्याप संपलेला नाही, हे लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा अद्यापही सावध आणि सक्रिय आहेत.