भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मारी नायर यांचा मुलगा जोहरान ममदानी न्यूयॉर्क शहरातील डेमोक्रॅटिक महापौरपदाच्या प्राथमिक निवडणुकीत विजयी झाला. महापौरपदासाठी अंतिम लढाई नोव्हेंबरमध्ये होणार आहे. असं असताना ममदानी अमेरिकेतली सर्वात हाय-प्रोफाईल राजकीय पदांपैकी एक असलेलं पद मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे योजना आखत असावेत असा अंदाज सध्या वर्तविला जात आहे. २०२० मध्ये ममदानी यांच्या एका व्हायरल झालेल्या पोस्टवरून हा अंदाज येतो. यामध्ये ममदानी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरमच्या २१ वर्षीय महापौर आर्या राजेंद्रन यांचा उल्लेख केला होता.

विजयी झाल्यापासून ममदानी यांना त्यांच्या निवडणूक आश्वासनांवर आणि कथित राजकीय कलावरून मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते न्यूयॉर्क शहराचे विद्यमान महापौर एरिक अ‍ॅडम्स आणि सहकारी डेमोक्रॅट्सपर्यंत ममदानी यांना अवास्तव आश्वासने देणारे कम्युनिस्ट म्हणून टीकेचा सामना करावा लागला आहे. युगांडामध्ये जन्मलेले आणि वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झालेले ममदानी स्वत:ला समाजवादी मानतात.

२०२० मध्ये त्यांनी पुद्दुचेरीमधील सीपीआय(एम)कडून न्यूयॉर्क शहराचा महापौर कसा असावा याचे वर्णन करणारी एक पोस्ट शेअर केली होती. डिसेंबर २०२० मध्ये एका पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “२१ वर्षीय कॉम्रेड आर्या राजेंद्रन केरळच्या तिरुवनंतपुरमच्या नवीन महापौर आहेत. त्या जगातल्या एका मोठ्या शहराच्या सर्वात तरुण महापौर असतील.” यावेळी पोस्टच्या माध्यमातून न्यूयॉर्क शहराला सध्या कशा प्रकारच्या महापौराची गरज आहे. माझ्यासारख्या?” असाही प्रश्न विचारला होता.

ममदानी यांनी स्वत: ही पोस्ट शेअर करत आर्या राजेंद्रन यांचं कौतुक केलं होतं. ३३ वर्षीय ममदानी हे ही आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच कम्युनिस्ट आहेत.

कोण आहेत आर्या राजेंद्रन?

आर्या राजेंद्रन यांचा जन्म १९९९ मध्ये झाला. त्यांची २०२० मध्ये तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचे नेतृत्व करण्यासाठी अर्थात महापौरपदी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निवड झाली होती. त्या भारतातील सर्वात तरुण महापौर ठरल्या होत्या. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २७ व्या वर्षी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुखपद भूषवण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. राजेंद्रन यांच्या महापौरपदाच्या निवडीचे कमल हासन, शशी थरूर आणि गौतम अदानी यांनीही कौतुक केले होते.
२०२० च्या केरळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षा (मार्क्सवादी)कडून राजेंद्रन मुदावनमुगल वॉर्डमधून निवडून आल्या. राजेंद्रन या गणित विषयातून पदवीधर आहेत. केरळमधील प्रभावशाली अशा नायर समुदायातील उच्च जातीमधील प्रमुख चेहऱ्यांपैकी त्या एक आहेत. राजेंद्रन यांचा राजकीय प्रवास बालपणीच सुरू झाला होता. त्या पाचवीत असताना सीपीआय(एम)च्या बालविभाग बालसंगममध्ये सामील झाल्या. त्यानंतर त्या त्यांच्या राज्य अध्यक्ष झाल्या. त्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य समिती सदस्या आणि तिरुवनंतपुरममधील चाला इथे सीपीआय (एम) क्षेत्र समिती सदस्या म्हणूनही काम केले आहे. त्यांचा विवाह सीपीआय(एम) आमदार सचिन देव यांच्याशी झाला. सचिन देव हे सध्या केरळ विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत.

जोहरान ममदानी कोण आहेत?

  • जोहरान ममदानी यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतातील आहे. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.
  • जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.
  • ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले.
  • २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.

२०२३ मध्ये राजेंद्रन यांनी राष्ट्राचे लक्ष वेधले होते. आर्या यांचा त्यांच्या एक महिन्याच्या बाळासोबतचा ऑफिसमध्ये काम करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. २०२४ मध्ये त्या सीपीआय(एम) तिरुवनंतपुरम जिल्हा समितीवर निवडून आल्या. महापौरपदी असताना आर्या राजेंद्र यांनी शहरातल्या कचरा व्यवस्थापनाला आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिले होते. कोविडच्या काळात तिरुवनंतपुरममधील आव्हानांना त्यांनी यशस्वीरित्या तोंड दिले होते. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रक्रियेला प्रोत्साहन दिले आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकताही निर्माण केली. राजेंद्रन यांनी उपेक्षित समुदायांसाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठीही प्रयत्न केले. आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ हा यशस्वी राहिलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या ममदानी चर्चेत आहेत ते त्यांच्या प्राथमिक निवडणुकीतील विजयावरून. अविचारी, समाजवादी, लोकप्रिय व पुरोगामी ममदानी न्यूयॉर्कचे महापौर झाले तर त्याचा काय परिणाम होईल, अशी चिंता अनेकांना असल्याचे बोलले जात आहे. ममदानी यांनी घरे किंवा दुकानांची भाडेवाढ रोखणे, घरे, आरोग्य सेवा व अन्न अधिक परवडणारे बनवणे, मोफत बालसंगोपन, श्रीमंतांवरील कर वाढवणे आणि २०३० पर्यंत किमान वेतन ३० डॉलर्सपर्यंत वाढवणे यासाठी मोहीम राबवलेली आहे. ही धोरणे उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या अमेरिकेसाठी चांगल्या असलेल्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. जेम्स क्लायबर्नपासून माजी अध्यक्ष बिल क्लिंटनपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक जण ममदानी यांच्या विरोधात उभे राहिले. ममदानी यांच्या विजयावरून असे दिसून येते की, डेमोक्रॅटिक पक्षातील या अनेक मोठमोठ्या नेत्यांचा प्रभाव आणि प्रासंगिकता वेगाने कमी होत चालली आहे