Xi Jinpings Daughter xi mingze : डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चिनी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीन व अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कन्या शी मिंगझे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून शी मिंगझे ही मॅसेच्युसेट्स शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वास्तव्यास असल्याचा दावा केला जात आहे. इतर चिनी विद्यार्थ्यांप्रमाणेच तिचाही व्हिसा रद्द करून तातडीने अमेरिकेतून हकालपट्टी करा, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. दरम्यान, कोण आहे शी मिंगझे? ती अमेरिकेत नेमकी काय करते? डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या सर्वात शक्तिशाली नेत्याच्या मुलीचा व्हिसा रद्द करणार का? याबाबत जाणून घेऊ…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याऱ्या हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर, विद्यार्थी व्हिसासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती तातडीने थांबवा असे आदेशही त्यांनी अमेरिकेच्या दूतावासांना दिले. त्यांच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत असतानाच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित; तसेच महत्त्वाच्या क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या काही चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, चिनी विद्यार्थ्यांवर अमेरिकेतून हद्दपारीचे संकट ओढवले आहे. यादरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कन्या चर्चेत आली आहे.

कोण आहे शी मिंगझे?

शी मिंगझे ही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची एकुलती एक कन्या आहे. सध्या ती अमेरिकेत वास्तव्यास असून अत्यंत खासगी पद्धतीने आयुष्य जगते. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या मुलीच्या जीवनातील बहुतेक तपशील गुप्त ठेवले आहेत. २०१० ते २०१४ या कालावधीत शी मिंगझे हिने हार्वर्ड विद्यापीठात गोपनियतेने प्रवेश घेतला आणि मानसशास्त्र (psychology) विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्याआधी शी मिंगझेने झेजियांग विद्यापीठ आणि हांगझो विदेशी भाषा विद्यालयात फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले होते. ‘Firstpost’च्या वृत्तानुसार, हार्वर्डमध्ये पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर २०१९ मध्ये शी मिंगझे चीनला परतली होती. मात्र, काही महिन्यानंतर ती पुन्हा अमेरिकेत स्थायिक झाली.

आणखी वाचा : Operation Shield : ऑपरेशन शील्ड म्हणजे नेमकं काय? भारताकडून या मोहिमेची तयारी नेमकी कशासाठी?

चिनी अधिकाऱ्यांकडून शी मिंगझेची माहिती सेन्सॉर

२०१९ मध्ये मिंगझे हिच्या ओळखपत्राची माहिती एका वेबसाइटवर लीक केल्याच्या आरोपाखाली निऊ तेंगयू नावाच्या व्यक्तीला १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, या प्रकरणात माझा काहीच हात नव्हता, मला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले, असा दावा तेंगयू याने केला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी शी मिंगझे हिच्याविषयीची माहिती सातत्याने सेन्सॉर केली आहे. सध्या ती कुठे आहे, काय करते, तिचे खासगी आयुष्य कसे आहे याबाबतची माहिती गुपित ठेवण्यात आली आहे. तरीही, ती चिनी सरकारच्या संरक्षणाखाली अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये राहत असल्याचा असल्याचा अंदाज लावला जात आहे.

शी मिंगझेची अमेरिकेतून हकालपट्टी होणार?

अमेरिकेच्या नव्या व्हिसा धोरणाच्या पार्श्वभूमीवर शी मिंगझेच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या लॉरा लूमर यांनी शी मिंगझे हिची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लूमर म्हणतात, “चला सुरुवात करूया! शी जिनपिंगच्या मुलीला हाकलून द्या! ती मॅसेच्युसेट्समध्ये राहते आणि हार्वर्डमध्ये शिकली आहे. कम्युनिस्टांना आपल्या देशात जागा नाही.” दरम्यान, लॉरा लूमर यांनी असाही दावा केलाय की, शी मिंगझेला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) सुरक्षा रक्षक आहे. ते अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये तिला खासगी सुरक्षा पुरवतात.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री काय म्हणाल्या?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी सांगितले की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित; तसेच महत्त्वाच्या क्षेत्रांत शिक्षण घेणाऱ्या काही चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यास सुरुवात करणार आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि हाँगकाँगमधून येणाऱ्या सर्व नवीन अर्जदारांचे व्हिसा पुन्हा तपासले जाईल असं त्यांनी स्पष्ट केले. भारतानंतर चीनचे सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. मात्र, राजकीय तणाव आणि करोना महामारीमुळे त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सध्या चीनमधील सुमारे २८०,००० विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांची संख्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी जवळपास एक चतुर्थांश आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचं मुस्लीम नेत्याकडून कौतुक; काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?

अमेरिकेच्या व्हिसा धोरणाचा चीनकडून निषेध

चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर चीन सरकारने टीका केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप चीनने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाल्या, “अमेरिकेने विचारसरणी आणि राष्ट्रीय हक्कांचे कारण देत चिनी विद्यार्थ्यांचे व्हिसा अवास्तवपणे रद्द केले आहेत. त्यामुळे चीन या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. आम्ही याबाबत अमेरिकेकडे तक्रार दाखल केली आहे.” दरम्यान अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये चीनी विद्यार्थ्यी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात २ लाख ७० हजारांहून अधिक चिनी विद्यार्थ्यांनी अमेरिकन शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका चिनी विद्यार्थ्यांना लक्ष्य का करीत आहे?

चीन हा अमेरिकेतील शैक्षणिक कार्यक्रमांचा वापर संशोधन आणि तंत्रज्ञानातील प्रगती मिळवण्यासाठी करत आहे, अशी भीती अमेरिकेला वाटते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ही शैक्षणिक देवाणघेवाण अमेरिकन संस्थांसाठी आणि उद्योगांसाठी फायदेशीर ठरला असली तरी, ट्रम्प गट आता याकडे एका कमकुवत दुव्याच्या स्वरुपात पाहत आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, चिनी सरकार या विद्यार्थ्यांद्वारे संवेदनशील माहिती गोळा करते आणि तिचा वापर लष्करी व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीसाठी करते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्हिसा धोरणामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मुलीलाही अमेरिकेतून हद्दपार व्हावे लागणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.