Takahiro Shiraishi जपानने शुक्रवारी एका आरोपीला क्रूर गुन्ह्यांच्या अंतर्गत फाशी दिली. जवळजवळ तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच जपानने एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली आहे. जपानच्या निर्णयानंतर ‘ट्विटर किलर’ अशी ओळख असणाऱ्या व्यक्तीला फाशी देण्यात आली आहे. या व्यक्तीने तब्बल नऊ जणांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केली होती. आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या लोकांना तो सोशल मिडियाचा वापर करून घरी बोलवायचा आणि त्यांना मृत्यूसाठी मदत करणार असल्याचे सांगायचा व त्यांची हत्या करायचा. या व्यक्तीची ओळख ताकाहिरो शिराईशी अशी आहे.
त्याने २०१७ मध्ये टोकियोजवळील कानागावा येथील त्याच्या झामा शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आठ महिला आणि एका पुरुषाची हत्या केली आणि त्यांच्या अवयवांचे तुकडे केले. शिराईशीने जपानला हादरवून टाकणाऱ्या सर्व खुनांचा गुन्हा मान्य केला होता. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच देशात फाशीची शिक्षा देण्यात आल्याने या विषयाची चर्चा होत आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? कोण होता ‘ट्विटर किलर’? कोणत्या उद्देशाने त्याने नऊ जणांची हत्या केली? जाणून घेऊयात.
ताकाहिरो शिराईशी कोण होता आणि त्याला ‘ट्विटर किलर’ का म्हटले जात होते?
- शिराईशीवर नऊ जणांची हत्या, बलात्कार आणि मृतदेहांचे तुकडे करणे आणि नंतर त्यांचे अवशेष टोकियोजवळील कानागावा प्रांतातील झामा येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये ठेवण्याचा आरोप होता.
- त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय महिलेच्या प्रकरणाची चौकशी करत असताना ऑक्टोबर २०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली.
- तिने ट्विटरसह इतर सोशल मीडियावर आत्महत्या करण्याचा विचार व्यक्त केला होता.
- तिच्या भावाने जेव्हा तिचे ट्विटर अकाउंट पाहिले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांना शिराईशीच्या घरापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्या ठिकाणी पोलिसांना नऊ जणांच्या शरीराचे तुकडे आढळून आले.

‘एनएचके’ आणि ‘टीव्ही असा’ही नुसार, सर्व पीडितांनी त्यांचे जीवन संपवण्याच्या इच्छेविषयी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिराईशीने त्याचे एक्स हँडल (पूर्वीचे ट्विटर) ‘हँगमन’ वापरून सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मरण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने टोकियोजवळील त्याच्या अपार्टमेंटमध्ये येण्यास सांगितले. तिथे गेल्यावर त्याने या सर्वांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे काही भाग कूलर आणि टूलबॉक्समध्ये लपवले.
शिराईशीच्या वकिलांनी दावा केला की, त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्याऐवजी तुरुंगात पाठवले जावे. वकिलाने असा युक्तिवाद केला की, पीडितांनी स्वतः मरणाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, न्यायाधीशांनी तो दावा फेटाळून लावला आणि त्यावेळच्या वृत्तावरून शिराईशीच्या कृतींचे वर्णन क्रूर असे केले. या प्रकरणाने संपूर्ण जपानला हादरवले होते. संपूर्ण जपानमध्ये त्यावेळी हे प्रकरण चांगलेच तापले होते. या प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या धोक्यांविषयी चिंता व्यक्त केली जाऊ लागली.
जपानी सार्वजनिक प्रसारक ‘एनएचके’ आणि ‘टीव्ही असाही’ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, १५ ते २६ वयोगटातील नऊ पीडितांनी ऑनलाइन संदेश पोस्ट करून त्यांचे जीवन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिराईशीने सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना अपार्टमेंटमध्ये बोलावले. शिराईशीच्या वकिलाने सुरुवातीला न्यायालयाच्या निर्णयाविरोधात टोकियो उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु नंतर ही याचिका मागे घेण्यात आली.
२०२२ मध्ये टोकियोच्या अकिहाबारा जिल्ह्यात २००८ मध्ये झालेल्या हिंसाचारासाठी टोमोहिरो काटोला फाशी देण्यात आली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये जपानने पंथ नेता शोको असाहारा आणि ऑम शिनरिक्यो पंथाच्या १२ सदस्यांना फाशी दिली. हे सर्व जण १९९५ मध्ये टोकियोच्या सबवे सिस्टमवर झालेल्या सरीन गॅस हल्ल्यासाठी जबाबदार होते. या हल्ल्यात १४ लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक जखमी झाले होते.
जपान आणि मृत्युदंड
जपानमध्ये मृत्युदंड रद्द करण्याची मागणी वाढत आहे, याचदरम्यान ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. जपानमध्ये फाशीची शिक्षा दिली जाते, तेव्हा कैद्यांना फाशीची माहिती देण्याच्या काही तास आधी कळवले जाते. मानवाधिकार गटांनी या प्रक्रियेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, या प्रक्रियेमुळे मृत्युदंडाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांवर मानसिक ताण येतो. जपानमध्ये जुलै २०२२ मध्ये अखेरची फाशी देण्यात आली होती. त्यावेळी २००८ मध्ये टोकियोच्या अकिहाबारा जिल्ह्यात झालेल्या चाकू हल्ल्यातील एका दोषी व्यक्तीला फाशी देण्यात आली होती. ताकाहिरो शिराईशीने केलेल्या या हत्या प्रकरणानंतर जपान सरकारने आणि सोशल नेटवर्किंग साइट्सनी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या अशा प्रकारच्या तरुणांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.