Donald Trump on Nobel Peace Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. पहिल्या कार्यकाळात नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने ट्रम्प यांनी अनेकदा याबाबतची खंत बोलून दाखवली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मिटविल्याचा दावा करीत ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्काराबाबत गुरुवारी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं. विशेष म्हणज यावेळी पाकिस्ताननं ट्रम्प यांचं नाव सुचवण्यामागचं कारणही सांगितलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते? पाकिस्ताननं त्यांचं नाव नोबेल पुरस्कारासाठी का सुचवलं? ते जाणून घेऊ…
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी नोबेल शांतता पुरस्काराचा तब्बल सहा वेळा उल्लेख केल्याचं दिसून आलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘युद्ध’ थांबवलं तरी मला नोबेल पुरस्कार मिळणार नाही, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. इतकंच नाही तर, रशिया–युक्रेन, इस्रायल–इराण, सीरिया–कोसोवो यांसारख्या देशांमधील संघर्ष मिटविण्यासाठी मी काम केलंय, तरीही मला शांतता नोबेल पुरस्कार मिळणार नाही, असा उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केला. ट्रम्प यांच्या या विधानांवर अनेक देशांतून प्रतिक्रिया उमटल्या असून, भारताने मात्र त्यांचे युद्धविरामाचे दावे फेटाळले आहेत.
भारताने केलं ट्रम्प यांच्या दाव्याचं खंडण
पाकिस्तानबरोबरचा संघर्ष भारतीय आणि पाकिस्तानी या दोन्ही सैन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांमधील थेट चर्चेमुळे मिटला होता; ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अब्राहम कराराबाबतही मत व्यक्त केलं आहे. “मी पश्चिम आशियात अब्राहम करार घडवून आणला; जो यशस्वी झाला, तर अनेक देश यामध्ये सामील होतील आणि पश्चिम आशिया प्रथमच एकसंघ होईल. तरीही मला नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही”, असंही ते म्हणाले आहेत. अब्राहम करार हा ट्रम्प यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण करार होता, ज्यामध्ये इस्रायल आणि चार अरब देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आले होते.
आणखी वाचा : कोब्रासह विषारी सापांची होणार गणना? सरकारच्या या निर्णयामागचं कारण काय?
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव कुणी सुचवलं?
- नोबेल हा शांततात पुरस्कार नॉर्वेच्या संसदेने नियुक्त केलेल्या नोबेल समितीमार्फत दिला जातो.
- ‘New York Times’च्या माहितीनुसार, गेल्या दशकभरात ट्रम्प यांनी अनेकदा नोबेल पुरस्काराबद्दल उघडपणे मत व्यक्त केलेलं आहे.
- फेब्रुवारीमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी व्हाइट हाऊसमधील एका बैठकीत ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराबद्दल बोलून दाखवलं होतं.
- गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या रिपब्लिकन काँग्रेस वुमन क्लॉडिया टेनी यांनी अब्राहम करार घडवून आणल्याबद्दल ट्रम्प यांचं नाव या पुरस्कारासाठी सुचवलं होतं.
- नॉर्वेजियन नेत्यांनी आणि स्विडिशमधील राजकीय व्यक्तींनीही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचं नाव नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं होतं.
- फेब्रुवारी २०२४ मध्ये अमेरिकेतील कायदाशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका अनात अॅलोन-बेक यांनीही ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळायला हवा, असं म्हटलं होतं.
- फेब्रुवारीमध्ये ‘Fox News’ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेन्ट म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष मिटविणाऱ्या ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळायला हवा
- अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी अॅडव्हायझर माइक वॉल्ट्ज, अंतर्गत व्यवहार सचिव डग बर्गम आणि न्यूयॉर्कच्या प्रतिनिधी एलिस स्टीफॅनिक यांनीही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
- ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारीही या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तरीही हा प्रतिष्ठित पुरस्कार ट्रम्प यांच्या हातून निसटतच राहिला आहे.
- दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव सुचविलं आहे.

‘नोबेल’साठी पाकिस्ताननं ट्रम्प यांचं नाव का सुचवलं?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर स्नेहभोजनही केलं. त्यानंतर मुनीर यांनी ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं आणि त्यासाठी ठोस कारणही सांगितलं. “अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात ट्रम्प यांनी निर्णायक राजनैतिक हस्तक्षेप केला आणि प्रभावी नेतृत्व दाखवलं. या हस्तक्षेपामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव निवळला, युद्ध टळले आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे ट्रम्प यांना शांततेचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा”, असं पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणाले.
हेही वाचा : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? थायलंडच्या पंतप्रधानांवर राजीनाम्याची वेळ का आली?
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प इतके आग्रही का?
डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्कार मिळविण्याचा हट्ट हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी संबंधित असू शकतो. २००९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्याच्या अवघ्या नऊ महिन्यांतच ओबामा यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. जागतिक राजनैतिक संबंध व लोकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या त्यांच्या असाधारण प्रयत्नांबद्दल ओबामा यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना हा पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, २०१९ मध्ये ट्रम्प यांनी नोबेल समितीवर टीका करताना म्हटलं की, माझ्या खूप गोष्टींसाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. जर तो योग्य पद्धतीने दिला गेला असता, तर मला मिळाला असता; पण तसं झालं नाही.
नोबेल पुरस्कारावरून ट्रम्प का संतापले होते?
ओबामा हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांना लगेच हा पुरस्कार दिला गेला. त्यांनाही माहिती नव्हतं की, हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला, असा टोला ट्रम्प यांनी लगावला होता. २०२४ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतही ट्रम्प यांनी वारंवार ओबामा यांना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराचा उल्लेख करीत संताप व्यक्त केला होता. “जर माझं नाव ओबामा असतं, तर मला हा पुरस्कार १० सेकंदांत मिळाला असता”, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, पाकिस्तान आणि इतर देशांतील नेत्यांनी नाव सुचविल्यानंतर यावेळी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.