मागच्या आठवड्यात शुक्रवारी (दि. ११ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी मणिपूरच्या हिंसाचारावर बोलत असताना त्यांनी मिझोराममध्ये १९६६ झाली झालेल्या हवाई हल्ल्याचा उल्लेख करून काँग्रेसलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपाच्या इतर नेत्यांनीही १९६६ ची आठवण काढून काँग्रेसवर टीकास्र सोडले. त्यामुळे मिझोराम आणि एकूणच ईशान्य भारतातील संघर्षाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मिझोराममध्ये १९६६ रोजी नेमके काय घडले होते? अशी कोणती परिस्थिती उद्भवली की केंद्र सरकारला आपल्याच देशाच्या भूमीवर हवाई हल्ला करावा लागला? या विषयीचा थोडक्यात घेतलेला आढावा…. १९६६ साली मिझोराममध्ये काय झाले? मिझो नॅशनल फ्रंट (MNF) या बंडखोरांच्या गटाने १९६६ या वर्षाच्या सुरुवातीलाच आसाममधील मिझो हिल्स नावाच्या परिसरावर स्वतःचा ताबा मिळवला होता. मिझो हिल्स हा भाग आता मिझोराम राज्यात मोडतो. याआधी मिझोराम हे राज्य आसामचाच भाग होते. बंडखोरांच्या गटाचा सामना करण्यासाठी एक आसाम रायफल्स बटालियन आणि सीमा सुरक्षा दल (BSF) कंपनीच्या तुकड्या तैनात केल्या होत्या, त्यांच्या जोडीला केंद्र सरकारने आणखी एक आसाम रायफल्सची बटालियन पाठविली. केंद्र सरकारच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या मिझो नॅशनल फ्रंटने (Mizo National Front) या भागातील सर्वात मोठे शहर असलेल्या 'आयझॉल' (Aizawl) वर ताबा मिळवण्यासाठी ऑपरेशन जेरिको (Operation Jericho) अमलात आणले. आधी आयझॉल आणि त्यानंतर संपूर्ण मिझो हिल्सवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न बंडखोरांनी केला. फेब्रुवारी संपता संपता संपूर्ण आयझॉल शहरावर मिझोच्या बंडखोरांचे नियंत्रण आले होते. सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज (CLAWS) या जर्नलमध्ये मिझो बंडखोरांवर एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस संस्थेचे सहसंशोधक अली अहमद यांनी हा लेख लिहिला आहे. अली अहमद यांनी एका लष्करी अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगतिले, "ऑपरेशन जेरिको हा एक 'मास्टरस्ट्रोक' होता, ज्यामध्ये लष्कराप्रमाणेच काटेकोर नियोजन करण्यात आले होते. इतक्या आत्मविश्वासपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय उपखंडात क्वचितच बंड झालेले पाहायला मिळाले असेल". ऑपरेशन जेरिकोबाबत म्हटले जाते की, लष्करातील निवृत्त जवान आणि आसाम रेजिमेंट बटालियनमधील शिस्तभंगाची कारवाई झालेले अनेक सैनिक मिझो नॅशनल फ्रंटला येऊन मिळाले होते. त्यामुळे ऑपरेशन जेरिकोमध्ये एक अचूक लष्करी नियोजन असल्याचे पाहायला मिळाले. हे वाचा >> समजून घ्या : आसाम-मिझोराम सीमासंघर्षाचं कारण काय?; पोलिसांनी का चालवल्या एकमेकांवर गोळ्या? सरकारने या बंडाला कसा प्रतिसाद दिला? बंडखोरांना हुसकावून लावण्यासाठी आगरतळा स्थित असलेल्या ६१ माऊंटन ब्रिगेडचे ब्रिगेडीयर (नंतर मेजर जनरल झाले) रुस्तम झाल कब्राजी यांना लष्कराकडून धाडण्यात आले. मेजर जनरल हे कॉर्प्स ऑफ सिग्नल्सचे (कॉर्प्स ऑफ सिग्नल - दळणवळण आणि लष्करी संवाद यासाठी नेमले गेलेले अधिकारी) पहिले अधिकारी होते, जे माऊंटन ब्रिगेडची कमान सांभाळत होते. बंडखोरांनी आयझॉल शहराचा ताबा मिळवल्यानंतर माऊंटन ब्रिगेड मिझो हिल्समध्ये पोहोचली होती. मिझो बंडखोरांनी आयझॉल शहरात असलेल्या 'वन आसाम रायफल्स'च्या मुख्यालयाला वेढा घातला. बंडखोरांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना ओलीस ठेवून स्थानिक तुरुंगातील सर्व कैदी मोकळे केले. शहरातील सरकारी कार्यालयातील खजिन्याची लूट केली गेली. बंडखोरांनी स्वतंत्र मिझो राष्ट्राची घोषणा करून आसाम रायफल्सला शरण येण्याचा प्रस्ताव दिला. याला तोंड देण्यासाठी आसाम रायफल्स बटालियनला हेलिकॉप्टरने कुमक पुरविण्याचा प्रयत्न झाला, पण मिझो बंडखोरांनी हेलिकॉप्टरलाही लक्ष्य केले. बंडखोरांच्या कडव्या प्रतिकाराला तोंड देत देत ब्रिगेडियर कब्राजी आयझॉल शहराच्या दिशेने पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना आयझॉलपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस द्यावे लागले. इतर बटालियनदेखील हळूहळू शहराच्या दिशेने कूच करत होत्या. हवाई दलाकडून हल्ला का झाला? लष्कराकडून प्रयत्न होऊनही बंडखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसल्यामुळे हवाई दलाला पाचारण करण्यास केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. ज्या क्षेत्राला स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आले होते, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात आले. ज्यामुळे स्थानिक लष्कराला पुढे सरकण्याची संधी मिळाली. १९६६ चा मार्च महिना संपता संपता ब्रिगेडियर कब्राजी यांनी आयझॉल शहर आणि आताच्या मिझोरामच्या बहुतांशी परिसरावर ताबा मिळवला होता. भारतीय हवाई दलाच्या कारवायांबाबत संशोधन करणारे तज्ज्ञ अंछित गुप्ता यांनी मिझो हिल्स ऑपरेशन्सवर पोस्ट लिहिलेल्या आहेत. ते म्हणाले की, हवाई दलाचे दोन स्क्वाड्रन्स (लढाऊ विमानांचा गट) २९ स्क्वाड्रन आणि १४ स्क्वाड्रन या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. २९ स्क्वाड्रनमध्ये पश्चिम बंगालच्या बागडोगरा तळावरील 'तुफानी' (फ्रेंच बनावटीचे लढाऊ विमान) आणि १४ स्क्वाड्रनमध्ये आसामच्या जोरहाट तळावरील 'हंटर्स' या लढाऊ विमानांचा समावेश होता. गुप्ता यांच्या मते, २ मार्च १९६६ रोजी मिझो नॅशनल फ्रंटने आसाम रायफल्सच्या मुख्यालयाला वेढा घातला आणि लुंग्लेइ व चंफाई (मिझोराम राज्यातील शहरे) येथील लष्करी तळावरील शस्त्रांची लूट केली. लष्करी सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी हवाई दलाला प्रामुख्याने बोलाविण्यात आले होते. गुवाहाटी आणि जोरहाट येथून 'डकोटास' आणि 'कॅरिबू' या वाहतूक विमानातून सामुग्री पुरविण्याची तयारी हवाई दलाने केली होती. एअर व्हाइस मार्शल वाय. व्ही. माळसे यांनी सिलचर (आसाम) शहरातील कुंभीग्राम येथे 'डकोटास'चे लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्याला २१ गोळ्या झेलाव्या लागल्या होत्या. गुप्ता यांच्या मते, या घटनेमुळे हवाई दलाला साधन सामुग्रीचा पुरवठा करण्याऐवजी प्रतिहल्ला करण्यास भाग पाडले. हवाई दलाचे प्रत्यक्ष मिशन सुरू झाले ५ मार्च १९६६ रोजी. लष्कराने ठावठिकाणा दिलेल्या लक्ष्यावर हवाई दलाकडून टी-१० रॉकेट आणि ३० एमएम कॅनन्समधून गोळ्यांचा मारा करण्यात आला. हे वाचा >> आसाम-मिझोराम सीमासंघर्षात महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी जखमी; वैभव निंबाळकरांना गंभीर दुखापत गुप्ता पुढे म्हणाले की, ७ मार्च रोजी बंडखोरांनी जंगलाला आग लावली, ज्यामुळे हवाई हल्ला करणे अवघड झाले. धुरामुळे लक्ष्यावर थेट मारा करणे हवाई दलासाठी अशक्य होते. पण, याही परिस्थितीमध्ये तुफानी विमानाने हल्ला सुरूच ठेवला. ८ मार्च रोजी लुंग्लेइ जिल्ह्यातील डेमगिरी उद्ध्वस्त करण्यात आले, येथूनच मिझो बंडखोरांना रसद पुरविण्यात येत होती. डेमगिरी उद्ध्वस्त झाल्यामुळे आसाम रायफल्सला बरीच मदत झाली. ११ मार्च रोजी लष्कारानेही आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. शत्रूवर स्मोक ग्रेनेडचा (धुरांचे बॉम्ब) मारा करत करत लष्कर पुढे पुढे सरकत होते. गुप्ता यांनी सांगितल्याप्रमाणे, १२ मार्च रोजी दिमागिरी येथे हवाई दलाने शेवटचा हल्ला केला, त्यानंतर १७ मार्च रोजी स्क्वाड्रनला आपल्या तळावर परतण्याचा संदेश देण्यात आला. मिझो ऑपरेशनमध्ये अतुलनीय पराक्रम गाजविल्याबद्दल फ्लाइट लेफ्टनंट (नंतर एअर चीफ मार्शल झाले) एस. के. सरीन यांनी रणांगणात दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांना १९७० रोजी वायू सेना पदक देऊन गौरविण्यात आले. ग्रुप कॅप्टन (नंतर व्हाइस मार्शल झाले) जॅस्पर बाऊच यांना अति विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. फ्लाइट लेफ्टनंट राजेंद्र नरीन पांडे यांनी मिझो ऑपरेशनदरम्यान बंडखोरांचा गोळीबार झेलत हेलिकॉप्टर उडविल्यामुळे त्यांना शौर्य चक्र देऊन गौरविण्यात आले. मिझोरामचे लोक ५ मार्चला व्यक्त करतात शोक अविश्वास प्रस्तावाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १९६६ रोजी भारतीय हवाई दलाला हल्ला करण्यासाठी भाग पाडण्यात आले होते. या घटनेचा निषेध म्हणून मिझोरामचे लोक आजही ५ मार्च रोजी शोक दिवस पाळतात. मिझोरामची घटना स्वतंत्र भारतातील पहिली आणि शेवटची अशी घटना आहे, जेव्हा हवाई दलाने आपल्याच भूमीवर बॉम्ब टाकले. मिझोरामचे (तेव्हाचा आसाम प्रांत) १९६६ साली झालेले बंड शमल्यानंतर तब्बल दोन दशकांनी १९८६ रोजी मिझोराम शांती करार करण्यात आला. त्यानंतर १९८७ रोजी मिझोरामला भारताचे २३ वे राज्य म्हणून मान्यता मिळाली. एकेकाळी बंड करणाऱ्यांना नंतर सीमा सुरक्षा दलात सामावून घेण्यात आले. त्यावेळी मिझो नॅशनल फ्रंटने सशस्त्र बंडखोरी केली होती, मात्र कालौघात त्यांनीही आपली पद्धत बदलली आणि याच नावाने राजकीय पक्षाची सुरुवात केली. आज मिझो नॅशनल फ्रंटची मिझोरामवर सत्ता आहे.