संदीप नलावडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर आता सर्बिया आणि कोसोव्हाे या दोन युरोपीय देशांमध्ये तणाव वाढला आहे. कोसोव्हाेच्या पोलिसांनी सर्बियाचे वर्चस्व असलेल्या भागात छापे टाकल्यानंतर आणि स्थानिक नगरपालिका इमारती जप्त केल्यानंतर या दोन्ही देशांतील वाद चिघळला आहे. कोसोव्होचे पोलीस व नाटोच्या नेतृत्वाखालील शांतता रक्षक आणि सर्बियातील स्थानिक नागरिक यांच्यात हिंसक चकमकी झाल्या असून दोन्ही बाजूंनी डझनभर नागरिक जखमी झाले आहेत. भरीस भर म्हणजे विख्यात टेनिसपटू नोव्हाक जोकोविचही या वादात उतरला असून, फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान त्याने आपल्या देशाला म्हणजे सर्बियाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या दोन्ही देशांतील ताज्या तणावाविषयी… सर्बिया आणि कोसोव्हाे यांच्यात वाद का आहेत? कोसोव्हाे हा मुख्यत: वांशिक अल्बेनियन लोकवस्तीचा देश आहे, जो पूर्वी सर्बियाचा प्रांत होता. २००८मध्ये या सर्बियापासून वेगळे होऊन कोसोव्हाेने आपले स्वातंत्र्य घोषित केले. मात्र सर्बियाला कोसोव्हाेचे स्वतंत्र होणे मान्य नाही. कोसोव्हाे हा आमच्याच देशाचा भाग असल्याचे सर्बिया आजही मानतो. मात्र कोसोव्हाेवर सर्बियाचे कोणतेही औपचारिक नियंत्रण नाही. कोसोव्हाेच्या स्वातंत्र्याला अमेरिकेसह सुमारे १०० देशांनी मान्यता दिली आहे. रशिया, चीन या देशांनी मात्र सर्बियाची बाजू घेतली आहे. भारतानेही सर्बियाला पाठिंबा दर्शविला आहे. १९९८-९९ मध्ये झालेल्या रक्तरंजित युद्धानंतर या दोन्ही प्रांतातील तणाव वाढला आणि बाल्कन प्रदेशात असंतोष निर्माण झाला. त्यावेळी १० हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर १० लाखांपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले होते. सध्याच्या तणावाचे कारण… सध्या कोसोव्हाेच्या पोलिसांनी सर्बियाचे वर्चस्व असलेल्या भागात छापे टाकले असून स्थानिक प्रशासनाच्या काही इमारती जप्त केल्या आहेत. एका बाजूला कोसोव्हाेचे पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील शांतता रक्षक आणि दुसरीकडे स्थानिक सर्बियन नागरिक यांच्यात हिंसक चकमकी झाल्या असून दोन्ही बाजूने अनेक जण जखमी झाले आहेत. सर्बियाने सीमेजवळ तैनात असलेल्या आपल्या सैन्याची कुमक वाढवली असून कोसोव्हाेने जर पुन्हा कुरघोडी केली तर त्यांचे अस्तित्व मिटवून टाकू, असा इशारा सर्बियाने दिला आहे. १९९८-९९च्या युद्धाच्या आठवणी ताज्या असल्याने दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या तणावाबाबत सर्बियाच्या मित्रदेशांची प्रतिक्रिया काय? सध्याच्या तणावाबाबत रशिया आणि चीन या सर्बियाच्या मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की कोसोव्होमधील परिस्थिती चिंताजनक आहे आणि यामुळे मध्य युरोपमध्ये आणखी एक संघर्ष होऊ शकतो. युरोपच्या मध्यभागी तणाव वाढवला जात असून काही राष्ट्रांना लक्ष्य केले जात आहे. लावरोव्ह यांचा रोख सर्बियाकडे होता. १९९९ मध्ये नाटोने युगोस्लाव्हियावर हल्ला केला होता. नाटोकडून आंतरराष्ट्रीय तत्त्वाचे उल्लंघन केले जात आहे, असे लावरोव्ह म्हणाले. चीनने या घडमोडींचे बारकाईने निरीक्षण करत असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निन यांनी ‘‘संबंधित देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करावा. तसेच प्रदेशिक शांततेसाठी जे खरोखर अनुकूल आह ते करावे,’’ असे आवाहन नाटोला केले आहे. कोसोव्होमध्ये वांशिक संघर्ष किती खोलवर आहे? कोसोव्हाेचा वाद शतकानुशतके जुना आहे. युगोस्लाव्हियाचे विघटन होण्याआधीपासून कोसोव्होमध्ये जातीय तणावाचे वातावरण आहे. १९८९ मध्ये स्लोबोदान मिलोसेविचने कोसोव्हो भागातील स्थानिक अल्बेनियन मुस्लीम जनतेची पिळवणूक करण्यास सुरुवात केली. कोसोव्होतील बहुसंख्य अल्बेनियन मुस्लीम कोसोव्हाेला आपला देश मानतात आणि सर्बियावर कब्जा आणि दडपशाहीचा आरोप करतात. जातीय अल्बेनियन बंडखोरांनी १९९८ मध्ये देशाला सर्बियन राजवटीतून मुक्त करण्यासाठी बंड केले. सर्बियाने येथील फुटीरतावादी चळवळ मोडून काढण्यासाठी कोसोव्होमधील नागरिकांची सर्रास कत्तल सुरू केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घेत सर्बियाला माघार घ्यायला लावले. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने ठराव मंजूर करून कोसोव्हो हा प्रदेश आपल्या अखत्यारीत घेतला. पुढील नऊ वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या राजवटीनंतर २००८ ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषणा करण्यात आली. कोसोव्हाेमध्ये अनेक मध्ययुगीन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन चर्च आहेत. सर्बियातील राष्ट्रवादी नागरिक या चर्चना राष्ट्रीय संघर्षाचे प्रतीक मानतात. त्यामुळे त्यांना कोसोव्हाेचा ताबा हवा आहे. वाद सोडवण्याचे प्रयत्न झाले आहेत का? सर्बिया आणि कोसोव्हो या देशांमधील संघर्ष मिटविण्यासाठी अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रयत्न केले गेले आहेत. मात्र त्यास अपयश आले आहे. या दोन्ही वैरराष्ट्रांमध्ये सामाईक जमीन शोधण्यासाठी सतत आंतरराष्ट्रीय प्रयत्न केले गेले आहेत. परंतु आतापर्यंत कोणताही अंतिम सर्वसमावेशक करार झालेला नाही. युरोपीय संघटनेने सर्बिया आणि कोसोव्होमधील संबंध सामान्य करण्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी केली आहे. वाटाघाटीदरम्यान अनेक करार झाले. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी क्वचितच झाली आहे. दोन्ही देशांतील मुख्य नेते कोण आहेत? कोसोव्हो आणि सर्बिया या दोन्ही राष्ट्रांचे नेतृत्व राष्ट्रवादी नेत्यांनी केले आहे, ज्यांनी तडजोडीची तयारी दर्शविली नाही. कोसोव्होचे नेतृत्व आल्बिन कुर्ती या चळवळीतील वक्तीकडे आहे. माजी विद्यार्थी आंदोलक नेता असलेल्या कुर्ती यांनी कोसोव्हाेच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांनी सर्बियामध्ये कारावासही भोगला आहे. युरोपीय संघटनेशी वाटाघाटी करण्यात ते आघाडीवर होते. अल्बेनियाबरोबर कोसोव्होच्या एकीकरणाचा कट्टर समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात आणि सर्बियाशी कोणत्याही तडजोडीच्या ते विरोधात आहेत. सर्बियाचे नेतृत्व लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्याकडे आहे, जे कोसोव्होमधील युद्धादरम्यान माहिती मंत्री होते. अतिराष्ट्रवादी विचारसरणीचे असलेले वुकिक आग्रह धरतात की कोणताही उपाय टिकण्यासाठी तडजोड आवश्यक असते. मात्र सर्बियाला काही फायदा झाल्याशिवाय स्थिरता येणार नाही, असे ते मानतात. पुढे काय होण्याची शक्यता? येत्या काही महिन्यांत वाटाघाटींना गती मिळले आणि तोडगा निघेल अशी आशा आंतरराष्ट्रीय अधिकारी व्यक्त करत आहेत. दोन्ही राष्ट्रांना युरोपीय संघटनेच्या सदस्यत्वाच्या दिशेने पुढे जायचे असल्यास संबंध सामान्य करणे आवश्यक आहे. कोणत्याही मोठ्या प्रगतीचा अर्थ दीर्घकाळ अस्थिरता, आर्थिक घसरण आणि संघर्षाची सतत शक्यता असणार नाही. सर्बियानेही माघार घेऊन नाटो सैनिकांशी संघर्ष थांबवला पाहिजे, असे काही आंतरराष्ट्रीय संघटनांना वाटत आहे. कोसोव्होमध्ये सर्बियाने लष्करी हस्तक्षेप केला तर त्यांचा तिथे तैनात असलेल्या नाटो शांतीरक्षकांशी संघर्ष होईल. sandeep.nalawade@expressindia.com