युरोपीय संघाच्या हवामान देखरेख सेवेचा उपक्रम असलेल्या ‘कोपर्निकस’ने प्रसिद्ध केलेल्या डेटानुसार, जून २०२३ ते मे २०२४ या संपूर्ण वर्षात अभूतपूर्व उष्णतेची नोंद झाली. तब्बल १२ महिन्यांचा उष्णतेचा प्रवाह धक्कादायक असला तरी आश्चर्यकारक नाही असे ‘कोपर्निकस’चे संचालक कार्लो बुन्तेम्पो यांचे म्हणणे आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाला त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांनी हवामान नरक (क्लायमेट हेल) असा शब्दप्रयोग वापरत जगासमोरील हवामान संकटाची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. 

‘कोपर्निकस’च्या अहवालात काय?

जून २०२३ चे मे २०२४ या एका वर्षाच्या कालावधीत प्रत्येक महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला. म्हणजे जून २०२३ हा आतापर्यंत सर्व जून महिन्यांमध्ये नोंदवलेल्या तापमानाच्या आधारे सर्वात उष्ण जून महिना असल्याचे दिसून आले. हा कल पुढील वर्षभर कायम राहिला. जुलै २०२३पासून प्रत्येक महिन्याचे तापमान औद्योगिकरणापूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत किमान १.५ अंश सेल्सियसने वाढले आहे. औद्योगिकीकरणापासून मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाचा वापर सुरू झाला. गेल्या १२ महिन्यांतील सरासरी जागतिक तापमान वाढ ही औद्योगिकरणपूर्व काळाच्या तुलनेत १.६३ अंश सेल्सियस इतकी असल्याचे दिसून आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>>विश्लेषण: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ इतके थंड का असतात?

‘कोपर्निकस’च्या संचालकांनी काय इशारा दिला?

‘कोपर्निकस’चे संचालक कार्लो बुन्तेम्पो म्हणाले की, मानवी जीवनशैलीमुळे उद्भवलेले हवामान संकट पाहता ही बाब धक्कादायक असली तरी आश्चर्यकारक नाही. पृथ्वीच्या तापमानावर सर्वाधिक परिणाम जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाचा होतो. जोपर्यंत हे इंधन म्हणजेच पेट्रोलियम इंधनाचा वापर अगदी कमी केला गेला नाही तर यापुढील कालावधी अधिक उष्ण असेल. इतका, की हे १२ महिनेदेखील तुलनेने शीतल वाटू लागतील.

गुटेरेस काय म्हणाले?

ज्या दिवशी ‘कोपर्निकस’ने आपला अहवाल प्रसिद्ध केला त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांनी न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात हवामान बदलाविषयी भाषण केले. जीवाश्म इंधन निर्माण कंपन्या या हवामान अराजकतेच्या ‘गॉडफादर’ आहेत असा संताप व्यक्त करत त्यांनी सर्व देशांना पेट्रोलियम उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आवाहन केले. झपाट्याने बिकट होणाऱ्या हवामान बदल संकटावर नियंत्रण मिळवावे अन्यथा अधिक धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे ते म्हणाले. एकीकडे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि दुसरीकडे जवळपास सर्व देशांनी या मुद्द्यावर दिलेल्या आश्वासनांकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे असा इशारा त्यांनी दिला.

तज्ज्ञांनी काय इशारा दिला?

‘इंपिरियल कॉलेज लंडन’च्या ‘ग्रँथम इन्स्टिट्यूट’चे संशोधक बेन क्लार्क यांचे म्हणणे असे आहे की, जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीतील तापमान नोंदींमुळे हे दिसून येते की, भविष्यात टोकाच्या उष्णतेमुळे मानवी जगण्याच्या क्षमतेलाच आव्हान मिळणार आहे. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, प्रत्येक ०.१ अंश सेल्सियस तापमानवाढीमुळे अधिकाधिक लोकांना उष्णतेचा धोका उद्भवतो आणि त्यामधून अनेकांना जीवही गमवावा लागू शकतो असे त्यांनी ‘सीएनएन’ला सांगितले. दुसरीकडे, जागतिक हवामान संघटनेने असे भाकित केले आहे की, २०२४ ते २०२८ यादरम्यान किमान एका वर्षात २०२३चा तापमानाचा विक्रम मोडला जाईल याची शक्यता ८६ टक्के आहे.

हेही वाचा >>>शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा?

पॅरिस करार

२०१५च्या पॅरिस कराराअंतर्गत सर्व देशांनी जागतिक तापमानवाढ औद्योगिकपूर्व तापमान पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सियस इतकी मर्यादित ठेवण्याचे मान्य केले. हे ध्येय एखाद्या विशिष्ट महिना किंवा वर्षापुरते मर्यादित नाही तर काही दशकांसाठी ठरवून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षभरातील वाढलेली उष्णतेची मर्यादा धोकादायक आहे असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग’चे हवामान विषयक प्राध्यापक रिचर्ड अॅलन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, हवामान बदलाचे परिणाम हळूहळू अधिक धोकादायक असल्याचे क्षितिजावर दिसत आहे आणि मागील वर्षभरात नोंदवलेले तापमान हे त्याचेच द्योतक आहे.

जगभरात उष्णतेची लाट

भारतामध्ये काहीच दिवसांपूर्व तापमानाने अनेकदा ५० अंशाची मर्यादा ओलांडली. राजस्थानातील फलोदी, चुरू, हरियातील सिरसा हे जिल्हे उष्णतेत होरपळून निघाले. त्याशिवाय महाराष्ट्रासह देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये पारा ४५ अंशाच्या पुढे जाणे ही बाबही आता आश्चर्याची उरलेली नाही. भारताबरोबरच बांगलादेश, अमेरिका, चीन, फिलीपाईन्स, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, मेक्सिको यासह दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांमधील अनेक देशांनी या वर्षभरात उष्णतेची लाट अनुभवली. त्यामध्ये शेकडो लोकांचे मृत्यू झाले. उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आगी लागण्याच्या घटना घडल्या. तसेच जंगलांना वणवे लागून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. मेक्सिकोमध्ये उष्णतेमुळे अनेक माकडे मरून पडल्याचे निदर्शनाला आले.

उष्णतेचा हवामानावर परिणाम

उष्ण हवा आणि तापलेले समुद्र याची परिणिती अधिक मुसळधार पाऊस आणि विनाशक वादळे यामध्ये होते. अमेरिका, ब्राझील, केनिया, संयुक्त अरब अमिराती या देशांनी अशी वादळे आणि मुसळधार पाऊस अनुभवला. अफगाणिस्तानात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सतत मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे वारंवार अचानक पूर येण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी होत आहे. विशेषतः मातीने बांधलेली घरे आणि इतर बांधकामे पडणे, रस्ते वाहून जाणे अशा प्रकारच्या नुकसानांमुळे अफगाणिस्तानसारख्या अतिशय गरीब देशातील संकटग्रस्त लोकांची परिस्थिती अधिक बिकट होते.

nima.patil@expressindia.com

Story img Loader