हरियाणाचे माजी गृह राज्यमंत्री, विद्यमान आमदार गोपाल कांडा आणि त्यांची सहकारी व सहआरोपी अरुणा चढ्ढा यांची २५ जुलै रोजी दिल्ली सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. आत्महत्या केलेल्या व्यक्तीने चिठ्ठीत ‘नाव लिहून ठेवले’ म्हणून आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. गीतिका शर्मा (२३) यांनी ५ ऑगस्ट २०२१ रोजी आत्महत्या केली होती. तत्कालीन मंत्री गोपाल कांडा यांच्या एमएलडीआर एअरलाईन्समध्ये त्या एअर होस्टेस म्हणून काम करत होत्या. कांडा आणि चढ्ढा यांच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या करत आहे, असा आरोप गीतिका यांनी दोन पानी सुसाईड नोटमध्ये केला होता. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या प्रकरणात गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता कशी झाली? सुनावणीदरम्यान कोणते युक्तीवाद झाले? न्यायालयाने निकालात काय सांगितले? याबद्दल घेतलेला हा आढावा….

कांडा आणि चढ्ढा यांच्यावर आरोप काय होते?

गोपाल कांडा आणि त्यांची सहकारी अरुणा चढ्ढा यांनी गीतिका शर्माला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप फिर्यादींनी केला होता. यासाठी दोन पानी सुसाईड नोट आणि आरोपींशी फोनवरून झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पुढे करण्यात आले. आरोपींनी गीतिका शर्मा यांच्याशी फोनवर बोलत असताना चारित्र्यावर पातळी सोडून आरोप केले. तसेच काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी गीतिका यांना एमडीएलआरच्या कार्यालयात पाठवावे, असे गीतिका यांच्या आईला सांगितले होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी गीतिका यांना एमडीएलआरमधून राजीनामा देण्यासाठी भाग पाडले आणि त्यानंतरही तिचा छळ सुरूच ठेवला.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…

हे वाचा >> एअर होस्टेस आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता होताच भाजपाकडून ऑफर; कोण आहेत आमदार गोपाल कांडा?

एमडीएलआरमधून राजीनामा दिल्यानंतर गीतिका शर्मा एमिरेटस् एअरलाइन्समध्ये रुजू झाल्या होत्या. मात्र, तिथूनही त्यांनी नोकरी सोडून पुन्हा एमडीएलआरमध्ये परतावे, यासाठी आरोपींनी दबाव टाकला. एमडीएलआरच्या कर्मचारी मोनल सचदेवा यांची खोटी स्वाक्षरी करून दोन्ही आरोपींनी ना हरकत प्रमाणपत्र जारी करून गीतिका शर्मा यांना पुन्हा एमडीएलआरमध्ये परतण्याचा मार्ग खुला केला. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आरोपींचा फोन यायचा तेव्हा गीतिका तणावग्रस्त होत असत. वर नमूद केलेले सर्व प्रकार छळवणुकीचे असल्याचा दावा फिर्यादींनी सुनावणीदरम्यान केला.

कांडा यांची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने काय सांगितले?

आरोपींनी मृत गीतिका शर्मा यांना आत्महत्या करण्यास चिथावणी दिली हे फिर्यादीने सिद्ध केले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. ‘आत्महत्येस प्रवृत्त करणे’ हा आरोप आत्महत्या करण्याच्या कारणाजवळ जाणारा असावा. आत्महत्या करण्यापूर्वी जर मृत व्यक्तीला आरोपीच्या चिथावणीवर विचार करण्यास वेळ मिळाला असेल तर त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे असे म्हणता येणार नाही. (२०१० ते २०१२ असा हा काळ आहे) आरोपीला दोषी ठरविण्यासाठी सुसाईड नोटवर फक्त नाव लिहून ठेवणे पुरेसे नाही, असेही न्यायालयाने म्हटले. आरोपीच्या विशिष्ट कृत्ये किंवा चिथवाणीमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले, हे सुसाइड नोटमध्ये स्पष्ट नमूद असायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले.

सुसाईड नोटमधील मजकुराचा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले, “मृत गीतिका शर्मा यांनी त्यांचे चारित्र्य कशाप्रकारचे आहे, हे उघड केले असले तरी आरोपींनी तिची कशी फसवणूक केली किंवा तिच्या विश्वासाला त्यांनी तडा कसा दिला आणि मृत गीतिका शर्मा यांनी आत्महत्या करावी या उद्देशाने आरोपींनी काय कृती केली, याबद्दलचे तथ्य सांगितलेले नाहीत.”

तसेच गीतिका शर्मा यांनी एमडीएलआर कंपनी सोडून एमिरेट्स एअरलाइन्समध्ये स्वतःहून नोकरी स्वीकारली होती आणि हे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता, हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. तसेच न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की, गीतिका यांनी २०१० मध्ये एमडीएलआर कंपनी सोडली आणि २०१२ साली त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या आणि एमडीएलआर कंपनी सोडण्याच्या घटनांमध्ये बरेच अंतर असून यादरम्यान चिथावणी देण्यासारखे काही आढळत नाही.

तसेच आरोपीचे कुटुंबीय आणि मृत गीतिका यांचे कुटुंबीय यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर आरोपींशी बोलल्यामुळे गीतिका तणावग्रस्त होत होत्या, हा फिर्यादी यांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. आरोपीने मृत गीतिका शर्मा यांना दिलेल्या भेटवस्तूबाबतचाही उल्लेख सुनावणीदरम्यान झाला. न्यायालयाने सांगितले की, कोणतीही समजूतदार किंवा विवेकी व्यक्ती तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात तणाव निर्माण करणाऱ्याकडून भेटवस्तू स्वीकारणार नाही किंवा अशा लोकांकडून काही फायदे घेणार नाही.

मोनल सचदेवा यांच्या स्वाक्षरीने खोटे ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. या खटल्यात या दाव्याचे महत्त्वाचे स्थान असताना फिर्यादी पक्षाने मोनल सचदेवा यांना साक्षीदार का केले नाही? याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. मोनल सचदेवा यांना साक्षीदार न केल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात काही गडबड झाली नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

गीतिका यांच्या आत्महत्येपूर्वी काय घडले?

गीतिका शर्मा यांच्या आत्महत्येच्या प्रसंगापर्यंत फिर्यादीने ज्या घटनांची माहिती सांगितली, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने दाखवून दिले. फिर्यादीने सांगितले की, आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी गीतिका शर्मा आपल्या चुलत भावासह मुंबई येथे एका फॅशन शोमध्ये उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. तिच्या चुलत भावाने न्यायालयात सांगितले की, दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे एकत्र विमानाने दिल्ली येथे परतले. यावर प्रतिवाद करत असताना बचाव पक्षाने सांगितले की, गीतिका शर्मा यांनी मुंबईला ज्या व्यक्तीसह प्रवास केला, त्याच्यासोबत तिचे शारीरिक संबंध होते. मुंबईहून परतल्यानंतर हे तिच्या कुटुंबीयांना कळले आणि कुटुंबीय व गीतिका या दोघांमध्ये वादावादी झाली. बचाव पक्षाने असेही सांगितले की, हे भांडणच कदाचित आत्महत्येसाठी कारणीभूत ठरले असावे.

तसेच गीतिका शर्मा यांच्या मुंबई-दिल्ली प्रवासाचा तपशील तपासल्यानंतर लक्षात आले की, दोन्ही वेळेस गीतिका यांनी एकटीनेच प्रवास केला होता. त्यांच्या चुलत भावाचे नाव विमान तिकिटावर नव्हते. त्यामुळे न्यायालयाने असा अर्थ काढला की, मृत गीतिका या मुंबईला दुसऱ्याच व्यक्तीसह होत्या, हे तथ्य लपविण्यासाठी फिर्यादींनी चुलत भावाला पुढे केले. तसेच आत्महत्येच्या आदल्या दिवशी गीतिका शर्मा यांच्या फोनवर सहा फोन आले होते. त्यातील तीन फोन त्यांचा भाऊ अंकित याचे होते; तर इतर तीन फोनची शहानिशा होऊ शकली नाही.

“कदाचित ४ ऑगस्ट २०१२ रोजी गीतिका शर्मा यांना ओळखणाऱ्या व्यक्तीनेच हे फोन केले असावेत आणि त्यांना आत्महत्या करण्यास चिथावणी दिली असावी. ज्यामुळे गीतिका यांनी आत्महत्या केली, हेदेखील नाकारता येत नाही”, असे निरीक्षण नोंदवित असताना त्या तीन फोन कॉल्सची चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.