Vitamin D deficiency India ड जीवनसत्त्व म्हणजेच व्हिटॅमिन डी (Vitamin D) हा आपल्याला चांगले आरोग्यमय जगण्यासाठी आवश्यक असा घटक आहे. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि तरीही जवळपास १० पैकी नऊ लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येत आहे, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. घराबाहेर न पडणे, सनस्क्रीनचा वापर आणि प्रदूषणामुळे आपल्या शरीराला हे जीवनसत्त्व शोषून घेण्यात अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे हाडे आणि रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. ड हे असे जीवनसत्त्व आहे, जे आपल्याला नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळते. मात्र, आधुनिक जीवनशैलीमुळे भारतात लोक फार कमी प्रमाणात घराबाहेर पडतात आणि हेच या समस्येचे मुख्य कारण असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची कारणे काय आहेत? या कमतरतेचा शरीरावर कसा विपरीत परिणाम होतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
अभ्यासात काय आढळून आले?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अभ्यासानुसार, ७० ते ९० टक्के भारतीयांमध्ये ड जीवनसत्त्वाची पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टर आता याला आपल्या काळातील सर्वांत मोठी पोषक तत्त्वांची कमतरता मानतात. ड जीवनसत्त्व हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. हे जीवनसत्त्व हाडे मजबूत करते आणि रोगप्रतिकार शक्ती व मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. जेव्हा त्याची पातळी खाली येते तेव्हा थकवा, निराशा, स्नायू दुखणे आणि वारंवार आजारी पडणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
सूर्यप्रकाश असूनही आपल्याला कमतरता का जाणवते?
- घराबाहेर न पडणे : शहरात राहणारे बहुतेक भारतीय दिवसातील प्रकाशात कार्यालये, क्लासरूम किंवा जिममध्ये घालवतात. काचेच्या खिडक्या जवळजवळ सर्व यूव्हीबी (UVB) किरणे थांबवतात. ही अशी उपयुक्त किरणे आहेत, जी त्वचेला ड जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात.
- सनस्क्रीन आणि कपडे : त्वचेच्या संरक्षणासाठी डर्मेटोलॉजिस्ट आजही सनस्क्रीन वापरण्याची शिफारस करतात; परंतु SPF ३० हे ९५ टक्क्यांपर्यंत यूव्हीबी किरणांना रोखू शकते. पूर्ण अंग झाकणारे कपडे आणि वायुप्रदूषण या कमतरतेत आणखी वाढ करतात.
- वायुप्रदूषण : ‘जर्नल ऑफ फोटोकेमिस्ट्री अँड फोटोबायोलॉजी बी’मधील एका अभ्यासात असे आढळले आहे की, मोठ्या भारतीय शहरांमध्ये उच्च PM 2.5 पातळीमुळे त्वचेपर्यंत पोहोचणारी यूव्हीबी किरणे ६० टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकतात.
राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आरआयएमएस) च्या आपत्कालीन विभागाचे डॉ. गगन गुंजन म्हणाले, “सूर्यप्रकाशाचा मर्यादित संपर्क ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका वाढवतो आणि रुग्णांना अनेकदा याची जाणीवही नसते. रोजच्या जीवनातील साधे बदल, जसे की दररोज सूर्यप्रकाश घेणे, संतुलित आहार आणि आवश्यक असल्यास पूरक आहार (सप्लिमेंट्स) घेणे फायद्याचे ठरू शकते. दररोज रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक १० पैकी पाच रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे निदान केले जाते.”
आरोग्यावर होणारे परिणाम
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेने हाडे कमकुवत होतात. तसेच याचा संबंध कमी रोगप्रतिकार शक्ती, हृदयविकार व मधुमेह यांसारख्या दीर्घकालीन आजारांशी जोडलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ (NIH)च्या एका पुनरावलोकनानुसार, शरीरातील जवळपास प्रत्येक पेशीमध्ये व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टर्स जनुके कसे कार्य करतात यावर प्रभाव टाकतात. जेव्हा हे रिसेप्टर्स ‘अंडर-ॲक्टिव्हेटेड’ राहतात, तेव्हा शरीरातील दाह (Inflammation) वाढतो, स्नायू कमकुवत होतात आणि मेंदूवरदेखील परिणाम होतो.
पुरेशा प्रमाणात मिळालेले ड जीवनसत्त्व श्वसनमार्गाच्या संसर्गाचा धोका कमी करू शकते. भगवान महावीर मणिपाल हॉस्पिटल्सचे सल्लागार अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभिनव मिश्रा यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “गेल्या काही वर्षांत ड जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक रुग्ण सतत अंगदुखी, सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनांसारख्या लक्षणांसह येतात.”
अगदी सकाळचा किंवा संध्याकाळचा प्रकाश पुरेसा यूव्हीबी पुरवत नाही. तरीही स्थान, ऋतू व हवेची गुणवत्ता यावर तुम्ही प्रत्यक्षात किती ड जीवनसत्त्व तयार करता हे अवलंबून असते.
अगदी सकाळचा किंवा संध्याकाळचा प्रकाश पुरेसा यूव्हीबी पुरवत नाही. तरीही स्थान, ऋतू व हवेची गुणवत्ता यावर तुमचे शरीर प्रत्यक्षात किती ड जीवनसत्त्व तयार करते हे अवलंबून असते.
किती सूर्यप्रकाश पुरेसा?
तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून किमान तीन वेळा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हात आणि पायांवर १५ ते २० मिनिटांपर्यंत थेट सूर्यप्रकाश घेणे गरजेचे आहे. अगदी सकाळचा किंवा संध्याकाळचा प्रकाश पुरेसा यूव्हीबी पुरवत नाही. तरीही स्थान, ऋतू व हवेची गुणवत्ता यावर तुमचे शरीर प्रत्यक्षात किती ड जीवनसत्त्व तयार करते हे अवलंबून असते. अनेक लोकांना तर, विशेषतः हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळत नाही. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)द्वारे आता अन्नसंवर्धन कार्यक्रमांतर्गत दूध, तृणधान्ये आणि खाद्यतेल यांसारख्या फोर्टिफाइड (पोषक तत्त्वे मिसळलेल्या) पदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे.
तुम्हाला सप्लिमेंट्सची गरज आहे का?
जर रक्त तपासणीमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी २० एनजी/एमएलपेक्षा कमी आढळली, तर डॉक्टर खासकरून अल्प मुदतीसाठी पूरक आहार सुरू करण्याचा सल्ला देतात. वयस्कर लोक, लठ्ठ व्यक्ती किंवा ज्यांचा सूर्यप्रकाशाशी मर्यादित संपर्क येतो, त्यांना याची गरज भासू शकते. मात्र, पूरक आहार स्वतःहून घेऊ नका, असे तज्ज्ञ सांगतात. कारण- त्याचे जास्त सेवन केल्यास कॅल्शियमची पातळी असुरक्षित प्रमाणात वाढू शकते आणि मळमळ किंवा किडनीच्या समस्या उदभवू शकतात, असे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे :
- सततचा थकवा किंवा अंगदुखी
- हाडांमध्ये वेदना किंवा वारंवार फ्रॅक्चर होणे
- केस गळणे किंवा निराशा
- वारंवार सर्दी किंवा संक्रमण
- अपुरी झोप
ही लक्षणे लवकर लक्षात येत नाहीत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक के. रमाधीन यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “आमच्याकडे दररोज जे रुग्ण येतात, त्यापैकी सुमारे ४० टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे आढळते. त्याबाबतची लक्षणे अनेकदा सहज दिसून येण्यासारखी नसतात आणि त्यामुळे चुकीचे निदान होण्याची शक्यता असते. अँटीबायोटिक्सचा अतिवापर केल्यानेदेखील व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण- अँटीबायोटिक्स जीवनसत्त्व तयार करणाऱ्या आतड्यातील जीवाणूंवर विपरीत परिणाम करतात.”
आरोग्यासाठी याचा अर्थ काय आहे?
ड जीवनसत्त्व हे सर्वांत सोप्या पद्धतीने मिळवता येणारे पोषक तत्त्व आहे आणि तरीही आपल्यापैकी बहुतांश लोकांमध्ये त्याची कमतरता जाणवते. आधुनिक जीवन आपल्याला घरामध्ये ठेवते, आपले शरीर ज्या विनामूल्य स्रोतावर अवलंबून आहे त्यापासून आपल्याला दूर ठेवते. काही मिनिटांचा जाणीवपूर्वक सूर्यप्रकाश, फोर्टिफाइड पदार्थांची थाळी आणि वर्षातून एकदा रक्त तपासणी यांद्वारे अनेक औषधे ज्या गोष्टी दुरुस्त करू शकत नाहीत, त्या दुरुस्त होऊ शकतात. ड जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी सरकारनेही अलीकडे काही पावले उचलली आहेत.