China Gold Purchases Reason: सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर इतके वाढले आहेत की, सर्वसामान्यांनी सोने कसे खरेदी करावे अशी चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी (८ ऑक्टोबर) भारतात दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख २१ हजार रुपयांहून अधिक झाल्याचे नोंदवण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याच्या किमतीने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी सोन्याच्या मागणीतही अभूतपूर्व वाढ होत आहे.
केवळ वैयक्तिक गुंतवणूकदार या वाढीस कारणीभूत नसून जगभरातील मध्यवर्ती बँकांमुळे (Central banks) ही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले आहे. २०२३-२४ मध्ये ७०,००० रुपये प्रति तोळा (सुमारे ११.६६ ग्रॅम) पेक्षा कमी असलेला सोन्याचा दर आज २०२५ मध्ये १.२५ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याला जागतिक आर्थिक तणाव, चलनवाढीचा दबाव आदी बाबी कारणीभूत आहेत. परंतु, या दरवाढीचे मूळ कारण काय? चीन मोठ्या प्रमाणात सोने का खरेदी करत आहे? चीनची रणनीती काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

चीनकडून सतत सोने खरेदी
- सोने साठवणुकीत चीन आघाडीवर आहे.
- पीपल्स बँक ऑफ चायना (The People’s Bank of China) ने २०२५ मध्येही सोन्याची जोरदार खरेदी सुरू ठेवली आहे.
- जानेवारी ते सप्टेंबर या काळात त्यांनी अंदाजे ३९.२ टन सोने विकत घेतले आहे.
- ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चीनचा एकूण सोन्याचा साठा २,२९८.५ टन इतका झाला आहे.
- सप्टेंबरमध्ये केवळ ०.४ टन सोने घेतले गेले असले तरी चीन दरमहा सरासरी दोन ते पाच टन सोन्याची खरेदी करत आहे आणि आपला साठा वाढवत आहे.
चीनच्या सोने खरेदीमागील धोरणात्मक कारणे
चीनच्या सततच्या सोने खरेदीमागे अनेक धोरणात्मक कारणे आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.
१. अमेरिकेच्या डॉलर्सवरील अवलंबित्व कमी करणे : चीनकडे मोठ्या प्रमाणात डॉलरचा साठा आहे, मात्र डॉलर्स केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर टिकून आहे आणि चीनला पूर्णपणे डॉलर्सवर अवलंबून राहायचे नाही. सोने कोणत्याही देशाच्या चलनावर अवलंबून नाही.
२. जगात वाढत चालेला तणाव (Geopolitical Uncertainties): रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे, अनेक देश आंतरराष्ट्रीय निर्बंध (sanctions) किंवा राजकीय दबावांना कमी परिणाम होणाऱ्या मालमत्ता सुरक्षित करत आहेत. एका वरिष्ठ विश्लेषकांच्या मते, “जागतिक अस्थिरतेच्या काळात सोने ढाल म्हणून काम करते.”
३. महागाई (Inflation) : चलनवाढीच्या चिंतेमुळे सोन्याचे आकर्षण वाढले आहे. २०२५ मध्ये सुरुवातीला सोन्याचा भाव सुमारे ३,९०० प्रति औंस डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. असे असतानाही सोने खरेदी कायम होती, कारण सोने एखाद्या आर्थिक कवचासारखे आहे. याव्यतिरिक्त, सोन्याचा साठा वाढवणे हा चीनसाठी आपल्या चलनाचे जागतिक स्थान बळकट करण्याचा एक मार्ग मानला जात आहे.
जागतिक साठवणुकीचा कल
चीनच नव्हे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तसेच रशिया आणि तुर्कस्तानमधील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही वर्षांत सोने खरेदी वाढवली आहे. २०२२ पासून जागतिक मध्यवर्ती बँकांनी एकत्रितपणे दरवर्षी १,००० टनांहून अधिक सोने खरेदी केले आहे. यामागील कारणे चीनच्या धोरणाप्रमाणेच आहेत. डॉलर्सवरील अवलंबित्व कमी करणे, भू-राजकीय जोखीम कमी करणे, महागाईपासून बचाव करणे आणि दीर्घकालीन आर्थिक रणनीती, ही प्रमुख कारणे आहेत.
भारताकडूनही सोने साठ्यात वाढ
भारतदेखील या दिशेने वाटचाल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपला सोन्याचा साठा सातत्याने वाढवला आहे, हा साठा ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत एकूण ८८० टन झाला आहे. यापैकी, सुमारे ५१२ टन सोने नागपूर आणि मुंबई येथे देशांतर्गत साठवले आहे, तर उर्वरित साठा बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्ससारख्या परदेशी संस्थांमध्ये ठेवला आहे. सोन्याचा वाटा भारताच्या एकूण परकीय चलन साठ्याच्या ११.७ टक्के आहे. गेल्या दशकात, भारताच्या सोन्याच्या साठ्यात सुमारे ५८ टक्के वाढ झाली आहे. हा साठा २०१५ मधील ५५७.७ टनांवरून २०२५ मध्ये ८८० टन झाला आहे. २०२२ पासून साठवणुकीचा वेग विशेषतः वाढला आहे.
चीनसाठी सोन्याचे महत्त्व
- मध्यवर्ती बँक आता जगातील सर्वात मोठ्या अधिकृत क्षेत्रातील सोनेधारकांपैकी एक आहे.
- चीनचे मासिक सोने खरेदीचे स्वरूप सातत्यपूर्ण राहिले आहे, यातून चीनचा एक पद्धतशीर दृष्टिकोन दिसून येतो.
- चीन महागाईपासून बचावासाठी आणि चीनच्या दीर्घकालीन साठा धोरणासाठी सोन्याला एक महत्त्वाचा घटक मानतो.
चीन आपला सोन्याचा साठा सार्वजनिकपणे जाहीर करत असला, तरी अनेक विश्लेषकांचा विश्वास आहे की वास्तविक साठा अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त असू शकतो; कारण अतिरिक्त साठा इतर सरकारी संस्थांद्वारे व्यवस्थापित केला जात असण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती बँका जागतिक स्तरावर सोन्याचा साठा का वाढवत आहेत?
चीनच्या खरेदी धोरणास एक व्यापक आंतरराष्ट्रीय ट्रेंड कारणीभूत आहे, ज्यात अनेक मध्यवर्ती बँका विविध आर्थिक जोखमींविरुद्ध बचाव म्हणून आपला सोन्याचा साठा वाढवत आहेत. सोन्याच्या साठवणुकीकडे होणारा हा जागतिक बदल मध्यवर्ती बँकेच्या साठा व्यवस्थापन तत्त्वज्ञानातील महत्त्वपूर्ण बदल दर्शवतो.