-रेश्मा राईकवार

जेव्हा जगण्यापासून करिअर, प्रेम – नाती हे सगळेच संदर्भ जागतिकीकरणाच्या झाकोळात अनेक बदल अनुभवत होते. तेव्हा लंडनमध्ये लहानाचा मोठा झालेला, पण मनाने भारतीय असलेला राज आणि लंडनमध्येच भारतीय कट्टर कुटुंबात वाढलेली, पुढारलेल्या विचारांची तरी आईवडिलांचा शब्द प्रमाण मानणारी सिमरन यांची प्रेमकथा प्रत्यक्षात सहजशक्य वाटलीच नसती. मात्र तेव्हा आदित्य चोप्रा नामक तरुण लेखक – दिग्दर्शकाने आपल्या आई वडिलांना न दुखावता, त्यांच्यात आपल्याबद्दल हळूहळू विश्वास निर्माण करत, त्यांना जिंकून घेत आपलं प्रेम मिळवणं शक्य आहे हे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ नामक प्रेमपटातून दाखवून दिलं. म्हणूनच कदाचित आज २७ वर्ष पूर्ण झाली या चित्रपटाला आणि तरीही ही प्रेमाची सुखांतिका काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे. 

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त…

प्रेमकथांचा बादशाह असलेला अभिनेता शाहरुख खान याने २ नोव्हेंबरला वयाची ५७ वर्ष पूर्ण केली. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत तो कायमच प्रेमपटांचा यशस्वी नायक म्हणून ओळखला गेला. राहुल किंवा राज हे त्याचे पडद्यावरचे नाव इतके लोकप्रिय झाले की कित्येक घरात त्यानंतर राहुल आणि राजच जन्माला आले. शाहरुखच्या कारकिर्दीत त्याचे सुरुवातीचे काही प्रयोगात्मक चित्रपट सोडले तर बाकीचे जवळपास सगळेच प्रेमपट आहेत आणि ते यशस्वीही आहेत. तरीही त्याच्या ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला भेट म्हणून आदित्य चोप्राने त्याचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला आणि शाहरुखला सुपरस्टार ही ओळख देणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हाच चित्रपट पुन्हा चित्रपटगृहातून प्रदर्शित केला. मुळात १९९५मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट खरंतर अजूनही चित्रपटगृहातून बाहेर गेलेला नाही. मुंबईतील ‘मराठा मंदिर’ चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांच्यासारख्या काही चित्रपटवेड्या माणसांनी हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात सुरूच ठेवला आहे. ‘लोकांना आजही या चित्रपटाचे वेड आहे. ते चित्रपट पाहायला येत नसते तर मी तो इतकी वर्ष का सुरू ठेवला असता’, असा प्रश्न विचारणारे देसाई आजही हा चित्रपट केवळ तीस ते चाळीस रुपये इतक्या माफक दरात दाखवतात. हा चित्रपट तेव्हापासून आजपावेतो का लोकप्रिय आहे, याची विविध कारणं आहेत. 

सगळे ‘दिलवाले…’च्याच प्रेमात का?

नव्वदच्या दशकात नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अनेक भारतीय परदेशात स्थायिक झाले होते. आर्थिक प्रगतीसाठी जगण्यातला बदल त्यांनी स्वीकारला असला तरी कौटुंबिक मूल्यांमधील तडजोड त्यांना मान्य नव्हती. तिथेच जन्माला आलेली त्यांची पुढची पिढी परदेशी संस्कृतीत हरवेल की काय, ही भीती आणि मायदेशाची, आपल्या लोकांची ओढ त्यांना अस्वस्थ करत होती. ‘एनआरआय’ अनिवासी भारतीयांची ही व्यथा, त्यांच्या जगण्यातला विरोधाभास ठळकपणे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटातून समोर आला आणि हे त्या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरलं. भारतीय मूल्यांवर जोर देणारी कथा हे या चित्रपटाचं दुसरं वैशिष्ट्य. आपल्या घरच्यांना प्रेम मान्य नसेल तर पळून जाण्याचा मार्ग त्यावेळीही परदेशात लहानाचे मोठे झालेल्या तरुण-तरुणींसाठी सहजशक्य होता. मात्र या चित्रपटाचा नायक त्याउलट आपण आपल्या आईवडिलांना प्रेमाने समजावण्याची भूमिका घेतो. आपलं प्रेम खरं असेल तर ते नक्की मान्य करतील, हा विश्वास आणि नाही मान्य केलं तरी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणार नाही हा निर्धार व्यक्त करणारा जोडीदार हा त्यावेळी आणि आजही तरुणींच्या मनातील आदर्श नवऱ्याच्या प्रतिमेत फिट बसणारा नायक आहे. खरं प्रेम की वडिलांच्या निर्णयाचा आदर या द्वंद्वातून गेलेल्या कित्येक तरुणी आजही आहेत. या चित्रपटातून मांडलेला सामाजिक आशय, संदर्भ, शाहरुख आणि काजोलसारख्या तरुण कलाकारांचा प्रसन्न वावर, अनुपम खेर-अमरीश पुरी-फरीदा जलाल या दिग्गज कलाकारांचा अप्रतिम अभिनय, जतिन -ललित यांचं श्रवणीय संगीत अशा सगळ्याच बाजूंमध्ये उत्तम ठरलेला हा चित्रपट अबालवृद्धांना आकर्षित करणारा ठरला.  शेवटच्या प्रसंगातील हाणामारी सोडली तर नाट्यमय प्रसंगांचा अतिरेक न करता निखळ मनोजरंनात्मक असा हा चित्रपट होता. आणि आजही कुठलाही ताण न घेता हा चित्रपट तितकाच आनंददायी अनुभव देतो त्यामुळेच आजची पिढीही आवडीने हा चित्रपट पाहते. 

शाहरुखच्या मते…

शाहरुख खानलाही एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटाच्या लोकप्रियतेमागचं कारण विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना तोवर प्रदर्शित झालेल्या बहुतांशी लोकप्रिय चित्रपटात एकतर प्रेमात त्या जोडप्याची हार होते वा त्यांना मृत्यूचा सामना करावा लागतो, अशाच स्वरूपाचे कथानक होते. या चित्रपटाने मात्र प्रेमी युगूलांना एक वेगळा विश्वास दिला, असं मत त्याने व्यक्त केलं. 

नवीन पिढीला का भावतो?

आत्ताच्या काळात प्रेम – लग्न या नातेसंबंधांच्या व्याख्याच बदलल्या आहेत. पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणा आला आहे. प्रेम वा लग्न यशस्वी झालं नाही तर कुढत न बसता नव्या नात्याची सुरुवात करताना कोणाला पूर्वीसारखं दडपण येत नाही. मात्र याच बदलामुळे एकनिष्ठ, निखळ – निर्व्याज प्रेम, आई-वडिलांबरोबरच कुटुंबातील प्रत्येकाबरोबर असलेलं आदराचं- प्रेमाचं तिखटगोड नातं जपण्याला जे महत्त्व होतं ते आता तितक्या सहजपणे चित्रपटांमधून दिसत नाही. त्यामुळे नव्या पिढीलाही हा चित्रपट तितकाच भावतो आहे. कौटुंबिक मूल्ये जपणारा लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पेक्षा ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाला अधिक यश मिळालं होतं. पण प्रेमकथेच्या बाबतीत मात्र राज आणि सिमरन यांची ही सदाबहार प्रेमाची सुखांतिकाच अजरामर ठरली आहे.

शाहरुख खानचे मार्केटमूल्य कमी झाले, म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख, आमिर आणि सलमान या प्राधान्याने नव्वदच्या दशकात उदयाला आलेल्या खानत्रयीची वैशिष्ट्ये आणि त्यांचे फॅनबेस स्वतंत्र आणि ठळक आहेत. आज पाव शतकानंतर त्यांना काही प्रमाणात कालबाह्यता आली असली, तरी तिघांची जादू कायम आहे. शाहरुख हा मुळात नेहमीच रोमँटिक हिरो म्हणून ओळखला गेला. त्याची ती प्रतिमा अमीट आहे. रोमँटिक हिरोंचे स्थान भारतीय चित्रपटविश्वात चिरंतन आहे. अर्थात सध्याच्या करनोत्तर काळात एकूणच थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची प्रवृत्ती कमी झाली असल्यामुळे ‘डीडीएलजे’ला किती प्रतिसाद मिळेल, हे तपासण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल.