Wiaan Mulder scores 367 runs against zimbawe at bulawayo: संधीचं सोनं कसं करावं याचं सप्रमाण उदाहरण सादर करत दक्षिण आफ्रिकेच्या वियान मुल्डरने इतिहास घडवला. झिम्बाब्वेविरुद्धच्या बुलावायो इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत मुल्डरने नाबाद ३६७ धावांची खेळी साकारली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम सार्वकालीन महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्यांनी २००४ मध्ये ४०० धावांची खेळी केली होती. मुल्डरने हा विक्रम मोडण्याची संधी होती मात्र लाराच्या सन्मानार्थ मुल्डरने तसं केलं नाही. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर कब्जा केला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना झाला. निवडसमितीने या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत फिरकीपटू केशव महाराजने नेतृत्वाची धुरा हाताळली. मात्र कसोटीदरम्यान महाराज दुखापतग्रस्त झाला. यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी मुल्डरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. या जबाबदारीचं कोणतंही दडपण न घेता मुल्डरने ३६७ धावांची मॅरेथॉन खेळी केली.
बॉलिंग ऑलराऊंडर मुल्डर तिसऱ्या क्रमांकावर कसा आला?
२७वर्षीय मुल्डरकडे डोमेस्टिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. बॉलिंग ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे. गोलंदाजीच्या बरोबरीने गरज पडल्यास फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असं त्याचं वर्णन केलं जातं. २०१७ मध्ये मुल्डरने दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे पदार्पण केलं. वनडेत चांगल्या कामगिरीचं फळ म्हणून २०१९ मध्ये त्याला टेस्ट पदार्पणाची संधी देण्यात आली. २०२१ मध्ये मुल्डरने दक्षिण आफ्रिकेसाठी टी२० पदार्पण केलं. कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, मार्को यान्सन, अँनरिक नॉर्किया असे एकापेक्षा एक गोलंदाज संघात असल्यामुळे मुल्डरला सातत्याने संधी मिळणं कठीण होतं. मात्र तरीही गोलंदाज म्हणूनच त्याची ओळख होती. फलंदाजी करताना तो सातव्या-आठव्या क्रमांकावर येत असे. त्यामुळे मोठी खेळी करण्याची संधी त्याला मिळत नसे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघव्यवस्थापनाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत मुल्डरला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा प्रयोग केला. मुल्डर यात फारसा यशस्वी झाला नाही. त्याने १५ धावांची खेळी केली. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतही मुल्डरला तिसऱ्या क्रमांकावरच पाठवण्यात आलं. यातही मुल्डरला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामना जिंकल्यामुळे मुल्डरच्या अपयशाची फारशी चर्चा झाली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या मुकाबल्यातही दक्षिण आफ्रिकेने मुल्डरवरच विश्वास ठेवला. अत्यंत दडपणाच्या अशा या सामन्यात मुल्डरने पहिल्या डावात ६ धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना मुल्डरने २७ धावांची छोटी पण आश्वासक खेळी केली. मुल्डर तिसऱ्या क्रमांकावर खेळल्यास दक्षिण आफ्रिकेला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येतो.
दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य गोलंदाजांना बॅकअप बॉलर म्हणूनही तो फिट बसतो. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्या सांभाळणाऱ्या मुल्डरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला संतुलन मिळालं. झिम्बाब्वेविरुदद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मुल्डरने १७ आणि १४७ धावांची खेळी साकारली. याबरोबरच त्याने ४ विकेट्सही पटकावल्या. दुसऱ्या सामन्यात नाबाद ३६७ धावांची खेळी करत मुल्डरने इतिहास घडवला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ संक्रमण स्थितीत; मुल्डर आला कामी
ग्रॅमी स्मिथ, हर्षेल गिब्ज, जॅक कॅलिस, शॉन पोलॉक, लान्स क्लुसनर, जॉन्टी ऱ्होड्स, फाफ डू प्लेसिस, एबी डीव्हिलियर्स, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल हे दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत. तेंबा बावूमाने युवा संघाची मोट बांधली आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टिकोनातून तिसरा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दक्षिण आफ्रिकेने गेल्या दोन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर मुल्डरसह ट्रिस्टन स्टब्ज, रायल रिकलटन, रायनार्ड व्हॅन टोंडर, टोनी द झोरी यांना संधी दिली आहे. सहा विशेषज्ञ फलंदाज, विकेटकीपर आणि चार गोलंदाज असं समीकरण खेळवल्यास फलंदाजी न येणाऱ्या मंडळींचं शेपूट वाढतं. अष्टपैलू मुल्डरच्या समावेशामुळे संघाला संतुलन मिळू लागलं. यामुळे हा प्रयोग कायम करण्यात आला.
टीम इंडियालाही हवा एक मुल्डर
टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय संघाची धुरा आता शुबमन गिलच्या हाती आली आहे. फलंदाजी करू शकेल असा गोलंदाज संघात असणं ही टीम इंडियाची गरज आहे. या दृष्टिकोनातून शार्दूल ठाकूरचा विचार करण्यात आला. मात्र कामगिरीत सातत्य, दुखापती आणि संघाचं समीकरण यामुळे शार्दूलला फारशी संधी मिळाल्याच नाहीत. भारतीय उपखंडात सामना असताना रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे त्रिकुट फलंदाजीतही योगदान देतं. मात्र विदेशात खेळपट्या फिरकीला साथ देणाऱ्या नसतात. अशावेळी फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरची उणीव भासते. हार्दिक पंड्याला दुखापती सतावत असल्यामुळे तो प्रामुख्याने वनडे आणि टी२० खेळतो. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाला मुल्डरसारख्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे.
आयपीएलमध्ये सहभाग
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत वियान मुल्डर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला. हैदराबादने इंग्लंडच्या ब्रायडन कार्सला संघात घेतलं होतं. मात्र तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुल्डरची निवड करण्यात आली. मुल्डरला यासाठी ७५ लाख रुपये मानधन मिळालं. हैदराबादने दोन लढतीत त्याला विशेषज्ञ गोलंदाज म्हणूनच खेळवलं.
४०० धावांचा विक्रम मोडण्याची होती संधी
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३६७ धावांवर असतानाच मुल्डरने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ६२६/५ धावांवर डाव घोषित केला. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने २००४ मध्ये ४०० धावांची अद्भुत खेळी साकारली होती. हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी मुल्डरकडे होती. मुल्डर या विक्रमापासून अवघ्या ३३ धावा दूर होता. अवघ्या अर्ध्या तासात मुल्डरने विक्रमाला गवसणी घातली असती. टेस्टचा हा दुसराच दिवस आहे. ही टेस्ट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाहीये. झिम्बाब्वेचा संघ कमकुवत मानला जातो. मुल्डरने ४०० धावांसाठी वेळ घेतला असता तर दक्षिण आफ्रिकेचं जिंकणं पक्कं आहे. मात्र कर्णधार मुल्डरने विक्रमांची पर्वा न करता डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.