आंतरराष्‍ट्रीय बाजारात कापसाच्‍या भावात गेल्‍या महिनाभरात १५ ते २० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे आगामी हंगामात देशात काय स्थिती राहणार, त्‍याविषयी…

कापसाचे देशातील उत्‍पादन किती?

देशभरात सुमारे ११५ ते १३० लाख हेक्‍टरमध्‍ये कापसाची लागवड केली जाते. २०२३-२४ च्या हंगामात देशातील कापूस उत्पादन ३०९ लाख गाठींवर गेल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) व्‍यक्‍त केला आहे. २०२२-२३ च्‍या हंगामात ३१८ लाख गाठींचे उत्‍पादन झाले होते. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. मध्य भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक १८५ लाख गाठींपर्यंत उत्पादन पोहचल्‍याचा अंदाज आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूत ७३ लाख गाठी, तर उत्तरेकडील राज्यांमध्ये ४६ लाख कापूस गाठींचे उत्पादन झाल्‍याचा अंदाज आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारातील स्थिती काय?

गेल्‍या महिनाभरात आंतरराष्‍ट्रीय बाजारात कापसाचे दर हे १५ ते २० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. ऑस्‍ट्रेलियातून कापसाची आवक वाढल्‍याने तसेच चीनमधून कापसाची मागणी कमी झाल्‍याने ही स्थिती उद्भवल्‍याचे सांगितले जात आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत ऑस्‍ट्रेलियातील कापसाच्‍या उत्‍पादनात घट झाली आहे. दुसरीकडे, ब्राझीलमधून कापसाची आवक ही जुलैनंतर सुरू होईल, त्‍यामुळे बाजारावर त्‍याचा दीर्घकाळ परिणाम जाणवणार नाही. कापसाची साठवणूक करणाऱ्या काही बहुराष्‍ट्रीय कंपन्‍यांच्‍या निर्णयामुळे हे चढउतार दिसून येत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?

देशातील बाजारात कापसाचे भाव किती?

देशातील बाजारातही कापसाच्‍या दरात चढउतार सुरू आहेत. सुमारे ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपये प्रतिक्विन्टलच्‍या दरम्‍यान सध्‍या भावपातळी आहे. बाजारातील आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आता फार कमी कापूस शिल्‍लक आहे. गेल्‍या डिसेंबर महिन्‍यात बाजारात कापसाची आवक वाढली, तेव्‍हा राज्यात कापसाला सहा हजार ५०० ते सात हजार रुपये प्रतिक्विन्टल भाव मिळाला होता. यंदा मोसमी पावसाच्‍या अनियमिततेमुळे कापसाच्‍या उत्‍पादनात थोडी घट झाली. तरीही कापसाला अपेक्षित दर मिळू शकले नाहीत. कापसाचा दर्जाही काही भागात घसरला. त्‍याचाही परिणाम दरांवर झाला.

कापसाची आयात-निर्यात कशी?

जगभरात असलेले मंदीचे वातावरण, इस्रायल-हमास युद्धामुळे सुएझ कालव्यातून बंद असलेली वाहतूक, रशिया-युक्रेनमधील तणाव आणि जागतिक बाजाराच्या तुलनेत देशात मिळत असलेला चांगला दर या कारणांमुळे देशातून होणारी निर्यात रोडावली आहे. २०११ च्या सुमारास देशातून सुमारे ७० ते ८० लाख गाठींची निर्यात होत होती. मागील काही वर्षांत ही निर्यात ४२ लाख गाठींवर आली आहे. यंदा जेमतेम २० लाख गाठींची निर्यात होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, देशात २२ लाख गाठी कापूस आयात होण्‍याचा अंदाज आहे. २०२२-२३ च्‍या हंगामात १५.५० लाख गाठी आयात करण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यात थोडी वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक कशी होते? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, टेलिग्राम संदेशांपासून सावध कसे राहावे?

कापसाचा उत्‍पादन खर्च किती?

कोरडवाहू कापसाची उत्‍पादकता प्रतिएकर सरासरी ५ क्विन्टल असून उत्‍पादनखर्च प्रतिएकर किमान २० हजार रुपये आहे. ओलिताखालील कापसाचे उत्‍पादन एकरी ८ क्विन्टल आणि उत्‍पादनखर्च किमान २५ हजार रुपये आहे. २०२०-२१ मध्‍ये कापूस वेचणी मजुरी ही प्रतिकिलो ७ ते ८ रुपये होती, ती २०२३-२४ मध्‍ये प्रतिकिलो १२ ते १५ रुपयांपर्यंत वाढली आहे. रासायनिक खतांच्‍या किमती जवळपास ७ टक्‍क्‍यांनी वाढल्‍या आहेत. कीटकनाशकांच्‍या दरातही २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन दरवाढीची त्‍यात भर पडली आहे. त्‍यामुळे कापसाचा उत्‍पादन खर्च ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. त्‍या तुलनेत भाव मिळत नसल्‍याने शेतकरी अडचणीत आहेत.

पुढील हंगामात काय स्थिती राहणार?

यंदा पावसाळ्याच्‍या चार महिन्‍यांत देशात सरासरीपेक्षा जास्‍त म्‍हणजे १०६ टक्‍के पाऊस पडण्‍याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ही दिलासादायक बाब असली, तरी गेल्‍या हंगामात कापसाला अपेक्षित दर न मिळाल्‍याने कापूस उत्‍पादकांमध्‍ये निराशा आहे. त्‍याचा परिणाम लागवड क्षेत्रावर होऊ शकतो. नैसर्गिक आपत्‍तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. उत्‍पादनात घट होऊनही बाजारात योग्‍य दर मिळाले नाही, तर शेतकरी पर्यायी पिकांचा विचार करतात, हे दिसून आले आहे. भारत, चीन आणि अमेरिकेत कापसाचे उत्‍पादन घटले. भारतातही कमी कापूस शिल्‍लक आहे. उद्योगांना कापूस आयात करावा लागू शकतो. त्‍यामुळे आगामी काळात कापसाचे भाव वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्‍यासकांनी व्‍यक्‍त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mohan.atalkar@expressindia.com