scorecardresearch

Premium

भारतीय संघ पाकिस्तानवरील वर्चस्व राखणार? पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढतीत कोणत्या तारांकितांवर लक्ष असणार?

क्रिकेटवेड्या भारतात एकदिवसीय विश्वचषकाला आतापर्यंत थंड असाच प्रतिसाद लाभला आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी शनिवारी मैदानावर उतरताच हे चित्र पूर्णपणे बदलेल हे निश्चित.

ICC World Cup India vs Pakistan, India vs Pakistan, India vs Pakistan World Cup Match, India Keeps Dominate Pakistan in World Cup
भारतीय संघ पाकिस्तानवरील वर्चस्व राखणार? पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढतीत कोणत्या तारांकितांवर लक्ष असणार? (छायाचित्र – द इंडियन एक्सप्रेस)

क्रिकेटवेड्या भारतात एकदिवसीय विश्वचषकाला आतापर्यंत थंड असाच प्रतिसाद लाभला आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी शनिवारी मैदानावर उतरताच हे चित्र पूर्णपणे बदलेल हे निश्चित. अहमदाबाद येथील सव्वा लाख आसनक्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे आणि दोन्ही संघांतील तारांकितांचे द्वंद्व पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये जागतिक दर्जाच्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. याच कारणास्तव या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तान यांची जागतिक क्रिकेटमधील सर्वांत बलाढ्य संघांमध्ये गणना केली जाते. परंतु, एकदिवसीय विश्वचषकात या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यांत भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. आतापर्यंत झालेले सातही सामने भारतानेच जिंकले आहेत. यापूर्वी २०१९मध्ये इंग्लंड येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानवर डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार ८९ धावांनी विजय साकारला होता. रोहित शर्माने ११३ चेंडूंत १४० धावांची खेळी अप्रतिम खेळी होती. त्याला कोहलीने ७७ धावांची खेळी करत मोलाची साथ दिली होती. आता रोहित आणि कोहली या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असतील.

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
Neeraj Chopra statement that India should organize world level athletics competition
भारताने जागतिक पातळीवरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे- नीरज चोप्रा
bharat jodo nyay yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आसाममध्ये भाजपाशी संघर्ष; ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांचे मात्र मौन, नेमकं कारण काय?
Why Indian Women Hockey Team Failed to Qualify for Olympics
भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश का आले?

हेही वाचा : आपत्तीची जोखीम कमी करणे म्हणजे नेमके काय? संयुक्त राष्ट्रांकडून आपत्तीची जोखीम कमी करण्याचा दिवस का साजरा केला जातो?

अहमदाबाद येथील खेळपट्टी कशी असू शकेल?

अहमदाबाद येथील खेळपट्टी फलंदाजी आणि जसजसा सामना पुढे जातो, तसतशी फिरकीला अनुकूल होत जाते. मात्र, फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्यास त्याला बाद करणे गोलंदाजांना अवघड जाते. हेच विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाहायला मिळाले होते. या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २८२ धावांचा टप्पा गाठला होता. इंग्लंडला आणखी मोठी मजल मारता आली असती, पण त्यांचे बरेचसे फलंदाज बेजबाबदार फटके मारून बाद झाले. याउलट न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे (१२१ चेंडूंत नाबाद १५१ धावा) आणि नवोदित रचिन रवींद्र (९६ चेंडूंत नाबाद १२३) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी मोठे फटके मारले, पण चेंडू आपल्या पट्ट्यात असेल तरच. त्यांच्या मोठ्या भागीदारीमुळे न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ गडी व ८२ चेंडू राखून धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यातही ज्या संघाचे फलंदाज अधिक जबाबदारीने खेळ करतील, त्यांना विजयाची अधिक संधी असेल.

रोहित आणि शाहीन यांच्यातील द्वंद्व किती महत्त्वाचे?

भारताचा कर्णधार रोहितने गेल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ८४ चेंडूंत १३१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा विश्वचषकात सर्वाधिक (६) शतकांचा विक्रम मोडीत काढला. त्याचे हे सातवे शतक ठरले आणि त्याने ही कामगिरी केवळ १९ डावांत केली आहे. आता पाकिस्तानविरुद्ध आपली लय कायम राखण्यासाठी रोहित उत्सुक असेल. अलीकडच्या काळात रोहित डावाच्या सुरूवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी करत आहे. मात्र सुरुवातीला त्याचे पदलालित्य तितकेसे आश्वासक नसते. अशा वेळी पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध त्याला सावध फलंदाजी करावी लागू शकेल. डावाच्या सुरुवातीला, विशेषतः वैयक्तिक पहिल्या-दुसऱ्या षटकात बळी मिळवण्यात आफ्रिदीचा हातखंडा आहे. त्यामुळे रोहितने शाहीनची सुरुवातीची षटके खेळून काढल्यास पुढे फलंदाजी करणे त्याला काहीसे सोपे जाईल.

हेही वाचा : विश्लेषण : क्युरेटिव्ह याचिकेत निकाल बदलू शकतो का?

भारताची अन्य कोणावर भिस्त?

भारताच्या फलंदाजीची भिस्त रोहितसह विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असेल. सलामीच्या लढतीत भारतीय संघ अडचणीत असताना कोहली आणि राहुल यांनी अप्रतिम खेळी करत भारताचा विजय साकारला होता. कोहलीने विश्वचषकातील पहिल्या दोनही सामन्यांत अर्धशतक झळकावले आहे. इतकेच नाही, तर कोहली आणि राहुल यांनी विश्वचषकापूर्वी झालेल्या आशिया चषकातही पाकिस्तानविरुद्ध शतके केली होती. त्यामुळे ते आत्मविश्वासानिशी मैदानात उतरतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. बुमराने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोनही संघांविरुद्ध पहिल्या स्पेलमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. आता बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या फलंदाजांना रोखण्यासाठी बुमराला आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तसेच खेळपट्टीवर चेंडू थांबून येत असल्यास शार्दूल ठाकूरच्या जागी अश्विनला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. मोहम्मद सिराजला पहिल्या दोन सामन्यांत फारसे यश मिळाले नाही. त्याचा कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा : Dr. Babasaheb Ambedkar १४ ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर दिन- बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली?

बाबर आणि शादाब यांनी कामगिरी सुधारणे पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचे?

पाकिस्तानसाठी रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, पाकिस्तानला कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार शादाब खानच्या कामगिरीची चिंता असेल. बाबरची विश्वातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. जागतिक एकदिवसीय क्रमवारीत बाबर अग्रस्थानी आहे. मात्र, विश्वचषकात बाबरला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्ध अनुक्रमे ५ आणि १० धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याचा भारताविरुद्ध मोठी खेळी करण्याचा मानस असेल. दुसरीकडे लेग-स्पिनर शादाब गेल्या काही काळापासून लय मिळवण्यासाठी झगडत आहे. त्याने या स्पर्धेत दोन सामन्यांत १६ षटकांत १०० धावा दिल्या आहेत. परंतु पाकिस्तानकडे दुसरा दर्जेदार आणि त्याच्याइतका अनुभवी फिरकीपटू नसल्याने शादाबचे संघातील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु बाबर आणि शादाबच्या अपयशानंतरही पाकिस्तानने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघानेही दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली आहे. त्यामुळे हा सामना निश्चित चुरशीचा होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will india keep dominating pakistan in odi world cup which players will be in focus during the match between traditional rivals print exp css

First published on: 14-10-2023 at 08:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×