युरोपीय देशांनी एकत्रितपणे विकसित केलेली मिटिऑर आणि ‘स्काल्प’ ही सध्याची सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. मिटिऑर हे ‘एमबीडीए’ या कंपनीने विकसित केलेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ‘एमबीडीए’ ही कंपनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांच्या एअरबस, लिओनार्दो आणि बीएई सिस्टिम्स या कंपन्यांच्या क्षेपणास्त्रनिर्मिती शाखांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली आहे. तर ‘स्काल्प’ हे एमबीडीए कंपनीनेच तयार केलेले, हवेतून जमिनीवर मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ‘स्काल्प’ हे नाव फ्रान्समध्ये वापरले जाते. त्याच क्षेपणास्त्राला ब्रिटनमध्ये स्टॉर्म शॅडो नावाने ओळखले जाते.

युरोपीय देशांनी त्यांच्या युरोफायटर टायफून, पॅनएव्हिया टॉरनॅडो, फ्रान्सच्या राफेल आणि स्वीडनच्या साब जेएस-३९ ग्रिपेन या लढाऊ विमानांवर बसवण्यासाठी मिटिऑर आणि ‘स्काल्प’ या क्षेपणास्त्रांची १९९०च्या दशकानंतर निर्मिती केली. या क्षेपणास्त्रांची उपयुक्तता पाहून अमेरिकेने  एफ-३५ लाइटनिंग या लढाऊ विमानासाठीही मिटिऑर आणि ‘स्काल्प’ क्षेपणास्त्रांची निवड केली आहे. ही विमाने ज्या देशांच्या हवाई दलांमध्ये वापरात आहेत त्या देशांनीही मिटिऑर आणि ‘स्काल्प’ ही क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात इजिप्त, कतार, सौदी अरेबिया, ब्राझील, स्पेन आदी देशांचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाने फ्रान्सच्या दसाँ कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा करार केला आहे. या राफेल विमानांबरोबर मिटिऑर आणि ‘स्काल्प’ ही क्षेपणास्त्रेही घेतली जाणार आहेत. त्याने भारतीय हवाई दलाची पाकिस्तान आणि चीनविरुद्ध मारक क्षमता बरीच वाढणार आहे.

मिटिऑर हे लढाऊ विमाने किंवा हेलिकॉप्टरवरून डागता येते आणि हवेतील लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकते. त्याचा पल्ला १०० किमीहून अधिक आहे. त्याला रॅमजेट इंजिन गती देते आणि त्यावर अति ज्वलनशील (हाय एक्प्लोझिव्ह ब्लास्ट फ्रॅगमेंटेशन) प्रकारची स्फोटके बसवली आहेत. त्याच्या अधिक पल्ल्यामुळे ते दृश्य क्षमतेच्या पलीकडील म्हणजे बियाँड व्हिज्युअल रेंज (बीव्हीआर) लक्ष्यांचा वेध घेण्यास समर्थ आहे. तसेच रॅमजेट इंजिनामुळे त्याचा वेग द्रवरूप किंवा घनरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मिटिऑरच्या तावडीतून लक्ष्य सुटून जाण्याची शक्यता नगण्य आहे.

‘स्काल्प’ हे क्रूझ क्षेपणास्त्र असून ते हवेतून डागून जमिनीवरील लक्ष्यांविरुद्ध वापरले जाते. त्याचा पल्ला ३०० सागरी मैल किंवा ५६० किलोमीटर इतका आहे.  त्यामुळे भारतीय हवाई दलाची मिराज, राफेल किंवा सुखोई विमाने सीमा न ओलांडता पाकिस्तान किंवा चीनच्या हद्दीतील लक्ष्यांवर मारा करू शकतात. त्यावर टबरेजेट इंजिनाचा वापर केला असून ते ताशी १००० किमीच्या वेगाने लक्ष्यावर तुटून पडते. त्याला दिशादर्शन करण्यासाठी जीपीएस, इन्फ्रारेड किरण आदी सुविधांचा वापर केला जातो. त्यावर बसवलेला कॅमेरा लक्ष्यावर आघात करेपर्यंतची छायाचित्रे नियंत्रण कक्षाला पाठवत राहतो. त्यानुसार त्याच्या प्रवासमार्गात बदल करता येतो. युरोपीय देशांनी ही क्षेपणास्त्रे लिबिया, येमेन आणि सीरियातील हल्ल्यांत वापरली. एप्रिल २०१८ मध्ये सीरियातील दमास्कस आणि होम्स येथील रासायनिक अस्त्रनिर्मिती केंद्रांवर हल्ला करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्रे वापरण्यात आली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com