scorecardresearch

स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा

स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेत विविध उपयंत्रणांचा समावेश आहे.

स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा

आधुनिक काळात क्षेपणास्त्रांचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला असून शत्रूकडून पहिले हल्ले क्षेपणास्त्रांनीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरे, लष्करी तळ आणि महत्त्वाची स्थळे शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात गरजेचे आहे. आजवर भारत यासाठी रशियन एस-३०० आणि एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालींवर अवलंबून आहे. यासह स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा (अँटि बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टीम) विकसित केली जात आहे. मात्र या यंत्रणेच्या अद्याप चाचण्या सुरू असून ती प्रत्यक्षात तैनात होण्यास काही अवधी जावा लागेल.

स्वदेशी क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेत विविध उपयंत्रणांचा समावेश आहे. शत्रूने डागलेले क्षेपणास्त्र जितक्या कमी वेळेत सोधले जाईल तितका ते नष्ट करण्यास अधिक वेळ मिळतो. त्यासाठी हेरगिरी यंत्रणा आणि शक्तिशाली रडार यांची आवश्यकता असते. या टप्प्यात स्वोर्डफिश लाँग रेज ट्रॅकिंग रडारचा वापर केला जाईल. हे रडार सध्या ८०० किमीवरील क्षेपणास्त्रे शोधण्यास सक्षम आहेत. त्याचा पल्ला वाढवून १५०० कि.मी. करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासह हवाई दलाच्या अक्स (एअरबोर्न अर्ली वॉर्निग अ‍ॅण्ड कंट्रोल सिस्टीम) प्रकारच्या विमानांचीही या कामात मदत होईल. त्यानंतर शत्रूचे आपल्या दिशेने येणारे क्षेपणास्त्र प्रत्यक्ष पाडण्यासाठी दोन टप्प्यांत व्यवस्था केली जात आहे. त्यात पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरील आवरणात (एक्झो-अ‍ॅटमॉस्फिअर) आणि वातावरणाच्या आतील आवरणात (एंडो-अ‍ॅटमॉस्फिअर) क्षेपणास्त्र पाडण्याची सोय असेल. दूरवरील क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी पृथ्वी एअर डिफेन्स (पीएडी) क्षेपणास्त्र वापरले जाईल. ते मूळ पृथ्वी क्षेपणास्त्रावर आधारित आहे. त्याचा पल्ला हवेत ८० ते १२० किमी असेल. त्यापेक्षा कमी उंचीवरील क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स (एएडी) क्षेपणास्त्र वापरले जाईल. त्याचा पल्ला १५ ते ३० किमी असेल.

या क्षेपणास्त्रांना दिशादर्शनासाठी इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टीम (आयएनएस) आणि रिडंडंट मायक्रो नेव्हिगेशन सिस्टीम (आरएमएनएस) यांचा वापर केला जाईल. शत्रूच्या क्षेपणास्त्राचा वेध घेण्यासाठी इन्फ्रारेड सीकर आणि इनर्शिअल गायडन्स प्रणालीचा वापर केला जाईल. लाँच कंट्रोल सेंटर (एलसीसी) आणि मिशन कंट्रोल सेंटर (एमसीसी)कडून सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाईल. ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपणानंतरही हवेत गरजेनुसार मार्ग बदलू शकतील. या यंत्रणांची अचूकता आणि खात्रीशीरपणा सुधारणे गरजेचे आहे. ही स्वदेशी प्रणाली काहीशी अमेरिकेच्या टर्मिनल हाय अल्टिटय़ूड एरिया डिफेन्स (थाड) प्रणालीप्रमाणे द्विस्तरीय (लेअर्ड डिफेन्स) आहे. मात्र हायपरसॉनिक वेगाने लक्ष्यावर तुटून पडणारी क्षेपणास्त्रे वेळेवर शोधून त्यांना हवेत दुसऱ्या क्षेपणास्त्राने पाडणे हे महाकठीण काम आहे. त्यात शंभर टक्के यश लाभण्याची शाश्वती कोणताच देश देऊ शकत नाही.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची ( Gaatha-shastranchi ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या