24 January 2021

News Flash

कार्यकर्त्यांना लागले गणेश विसर्जनाचे वेध –

जोरदार पावसाने झोडपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवातील सात दिवसांनंतर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत.

| September 16, 2013 02:45 am

जोरदार पावसाने झोडपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवातील सात दिवसांनंतर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आता विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. ढोल-ताशा पथकांना पोलिसांनी घालून दिलेल्या बंधनाचे पालन करीत ३५ ढोलांचा समावेश करीत गणेशभक्तांना खिळवून ठेवण्याबरोबरच वैभवशाली मिरवणुकीने गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे. विविध मंडळांच्या आकर्षक रथांचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे.
मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक उत्सव मंडपातून सकाळी नऊ वाजता निघणार आहे. मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला आणि गणपतीला महापौर चंचला कोद्रे आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर साडेदहा वाजता प्रत्यक्ष मिरवणूक सुरू होईल. सुभाष देवळणकर यांच्या नगारावादनाचा गाडा, रमणबाग प्रशालेचे ढोलपथक, कामायनी संस्थेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथक, श्रीश्री रविशंकर प्रणीत आर्ट ऑफ लिव्िंहगचे पथक, रोटरी क्लबच्या सहकार्याने परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले पथक, प्रभात बँडपथक या पथकांचा सहभाग असलेल्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक चांदीच्या पालखीमध्ये श्रींची मूर्ती विराजमान असेल. गुलालाऐवजी अष्टगंधाचा वापर करण्यात येणार आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही दोन ढोल-ताशा पथके अग्रभागी असतील. पालखीमध्ये विराजमान असलेल्या श्रींच्या मूर्तीचे मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते हेच पालखीचे भोई असतील. सुभाष सरपाले यांनी आकर्षक फुलांनी सजवून निर्मिलेल्या ‘राज सिंहासन’ रथामध्ये श्री गुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती विराजमान होणार आहे. लोकसेवा सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांचे पथक, नादब्रह्म आणि शिवगर्जना ही दोन ढोल-ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. मंडळातर्फे यंदा गुलालाचा मर्यादित प्रमाणामध्ये वापर करण्यात येणार आहे.
कार्यकर्त्यांनी आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पुष्परथामध्ये श्री तुळशीबाग या मानाच्या चौथ्या गणपतीची मूर्ती विराजमान होणार आहे. गजलक्ष्मी, स्व-रुपवर्धिनी आणि हिंदू तरुण मंडळ या तीन पथकांसह आरोग्याविषयी जागृती करणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग असलेला ‘आरोग्य रथ’ या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकामध्ये येणार आहे. बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, ‘शौर्य’, ‘शिवमुद्रा’ आणि ‘श्रीराम’ ही पथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील.
आवर्तन, रुद्रगर्जना आणि श्रीराम पथक ही तीन पथके श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी असतील. पारंपरिक रथामध्ये श्रींची मूर्ती विराजमान असेल. विनोद येलारपूरकर यांनी फायबरमध्ये साकारलेल्या दाक्षिणात्य शैलीतील तिरुपती रथामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मूर्ती विराजमान असेल. संगम आणि न्यू गंधर्व ही बँडपथके आणि शिवगर्जना ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल.  फुलांनी सजविलेल्या ‘राजहंस’ रथातून श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्टची मिरवणूक निघणार आहे. ‘समर्थ प्रतिष्ठान’ आणि ‘शिवमुद्रा’ ही दोन पथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शेषात्मज गणेश रथामध्ये विराजमान होणार आहे. १५ फूट लांब आणि १५ फूट रुंदीच्या रथावर नागांच्या १७६ प्रतिकृतींचा समावेश असून मुख्य शेषाच्या पुढय़ात शिविलग आहे. विविध रंगांची उधळण करणारे ३० एलईडी पार, शंभर हॅलोजन आणि लहान आकारातील ७५ हजार बल्बचा वापर केलेली पारंपरिक विद्युत रोषणाई यामुळे हा रथ उजळून निघेल. विवेक खटावकर यांनी फायबर मोल्डमध्ये हे काम केले असून हा रथ राजस्थानी शैलीमध्ये रंगविण्यात आला आहे. काश्मिरी संस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या दल सरोवरातील शिकारा हाऊसबोटीची प्रतिकृती असलेला नितीन देसाई यांनी निर्मिलेल्या रथातून हुतात्मा बाबू गेनू मंडळाची मिरवणूक निघणार असून ‘ताल’ आणि ‘गजलक्ष्मी’ हा दोन पथके असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2013 2:45 am

Web Title: activist in last session of ganesh immersion preperation
Next Stories
1 देखावे पाहण्यामध्ये सरली शनिवारची रात्र –
2 शहरात गणेशोत्सवानिमित्त पीएमपीची रात्र सेवा सुरू
3 कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने दिली धार्मिक सलोख्याची परंपरा
Just Now!
X